दुसऱ्या महायुद्धात जमिनीवरील लढायांमध्ये अल-अलामीन आणि स्टालिनग्राडला जितके महत्त्व आहे तितकेच ते प्रशांत महासागरात मिडवे बेटांजवळील सागरी संग्रामाला आहे. ४ ते ७ जून १९४२ रोजी मिडवे येथील संग्रामात अमेरिकी नौदलाने जपानच्या पराभवाने प्रशांत महासागरातील युद्धाचे पारडे फिरले.

जपानने ७ डिसेंबर १९४१ रोजी मिडवेजवळील अमेरिकेच्या हवाई बेटांवरील पर्ल हार्बर नाविक तळावर अचानक हल्ला करून अमेरिकेच्या बहुतांश युद्धनौका बुडवल्या. मात्र अमेरिकेच्या विमानवाहू नौका बाहेर असल्याने वाचल्या. त्यानंतर  अमेरिकेने ‘डुलिटल रेड’ म्हणून ओळखली गेलेली प्रत्त्युत्तराची कारवाई केली. त्यापाठोपाठ जपानची ऑस्ट्रेलियाकडची आगेकूच रोखण्यासाठी  कोरल सी या ठिकाणी झालेल्या सागरी लढाईचा फायदा झाला.

मुख्य संग्राम मिडवे येथे झाला. पर्ल हार्बर हल्ल्याचे सूत्रधार जपानी अ‍ॅडमिरल इसोरोकू यामामोटो यांनी अ‍ॅडमिरल चुईची नागुमो यांच्या नेतृत्वाखाली कागा, अकागी, हिरयू आणि सोरयू या चार विमानवाहू नौका, त्यावरील २५६ विमाने, ११ युद्धनौका आणि अन्य अनेक नौका व पाणबुडय़ांचा ताफा दिला होता. तर अमेरिकेचे अ‍ॅडमिरल चेस्टर निमिट्झ यांनी रिअर अ‍ॅडमिरल फ्रँक फ्लेचर आणि रिअर अ‍ॅडमिरल रेमंड स्प्रुआन्स यांच्या नेतृत्वाखाली यॉर्कटाऊन, एंटरप्राइज आणि हॉर्नेट या तीन विमानवाहू नौका, त्यांच्यावरील २३३ विमाने, जवळच्या बेटांवरून मदतीला येणारी १२७ विमाने, तसेच अनेक युद्धनौकांचा ताफा दिला होता.

अमेरिकी लेफ्टनंट कमांडर जेम्स रॉशफर्ट यांनी जपानी संदेशवहनाची सांकेतिक लिपी समजून घेतली होती आणि त्यातून त्यांना जपानच्या हालचालींची माहिती मिळाली होती. जपानच्या कागा नौकेवर ३० फायटर, २३ बॉम्बर आणि ३० टॉर्पेडो बॉम्बर विमाने होती. तर हिरयू, सोरयू आणि अकागीवर प्रत्येकी २१ फायटर, २१ बॉम्बर आणि २१ टॉर्पेडो बॉम्बर विमाने होती. जपानच्या विमानांत प्रामुख्याने झिरो ए६एम३ या मॉडेलची लढाऊ विमाने होती. ती डाइव्ह-बॉम्बर आणि फायटर अशा भूमिकांमध्ये वापरता येत होती. तर अमेरिकेच्या नौकांवर प्रामुख्याने ग्रुमान एफ४एफ-३ वाइल्कॅट आणि डाँटलेस एसबीडी डाइव्ह बॉम्बर विमाने होती.

जपानची योजना मिडवे बेटे जिंकण्याची होती. तत्पूर्वीच अमेरिकेच्या ताफ्याने त्यांना गाठून हल्ला केला. सुरुवातीला जपानच्या झिरो विमानांनी अमेरिकेच्या विमानांवर मात केली. पण जपानने अर्धी विमाने मिडवे बेटांवर हल्ल्यासाठी पाठवली होती. ती परत आल्यावर उतरवून घेण्यासाठी नौकांचे डेक रिकामे हवे होते. तोवर अमेरिकेच्या हल्ल्याची बातमी आली. त्यामुळे उरलेल्या विमानांवर मिडवे बेटांवर हल्ला करण्यासाठी मोठे बॉम्ब बसवायचे की अमेरिकी युद्धनौकांवर हल्ल्यासाठी टॉर्पेडो बसवायचे यात जपानी अधिकाऱ्यांचा गोंधळ उडाला. त्यात बॉम्ब, टॉर्पेडो व परत येणाऱ्या विमानांमध्ये भरण्यासाठी डेकवर इंधनही तयार होते. अमेरिकी हल्ल्यात त्या साऱ्याने पेट घेतला आणि जपानने चारही विमानवाहू नौका, २ क्रूझर, ३ डिस्ट्रॉयर, २२९ विमाने आणि ३५०० नौसैनिक गमावले. तर अमेरिकेने यॉर्कटाऊन ही विमानवाहू नौका, १ डिस्ट्रॉयर, १५० विमाने आणि ३०७ सैनिक गमावले.

sachin.diwan@ expressindia.com