जॉन मोझेस ब्राऊनिंग यांना बंदुकांच्या जगातील लिओनार्दो द विंची म्हणून ओळखले जाते. ७१ वर्षांच्या आयुष्यात त्यांनी विविध प्रकारच्या १०० बंदुकांची डिझाइन बनवली आणि त्यांच्या नावावर १२८ पेटंट जमा आहेत. त्यातील काही बंदुका मूळ डिझाइनच्या सुधारित आवृत्ती असल्या तरी अनेक बंदुका पूर्णपणे नव्या संकल्पनांवर आधारित होत्या. त्यांच्या बंदुकांनी जगाच्या इतिहासावर मोठी छाप पाडली असली तरी अनेक जणांना त्या बंदुकांच्या रचनाकाराचे नाव माहीत नाही, कारण त्यापैकी बहुतांश बंदुकांचे आराखडे त्यांनी अन्य कंपन्यांना निर्मितीसाठी विकले होते.

जॉन मोझेस ब्राऊनिंग यांचा जन्म १८५५ सालचा. त्यांचे कुटुंब अमेरिकेतील युटाह प्रांतातील ऑगडेन या ठिकाणचे. वडील जोनाथन हेदेखील बंदूक निर्माते. त्यांनी तयार केलेली रिपिटर रायफल प्रसिद्ध होती. वयाच्या २३ वर्षी जॉन ब्राऊनिंग यांच्या पाहण्यात अन्य एका व्यक्तीने तयार केलेली बंदूक आली. ती पाहून त्यांना जोरात हसू आले आणि ते उद्गारले की, यापेक्षा चांगली बंदूक तर मी तयार करू शकतो. आणि त्यांनी खरोखरच स्वत: बंदूक तयार केली. ती मॉडेल १८८५ सिंगल शॉट रायफल नावाने प्रसिद्ध झाली. त्या बंदुकीने विंचेस्टर रिपिटिंग आम्र्स कंपनीचे अधिकारी टी. जी. बेनेट इतके प्रभावित झाले की, ते कनेक्टिकटहून ऑगडेन येथे जॉन ब्राऊनिंग यांना भेटायला आले. तेथे जॉन यांचे बंधू मॅक, एड, सॅम आणि जॉर्ज यांनी त्यांचा कारखाना आणि दुकान थाटले होते. विंचेस्टर कंपनीने ब्राऊनिंग यांच्या मॉडेल १८८५ रायफलचे हक्क ८००० डॉलरला विकत घेतले आणि तिचे विंचेस्टर कंपनीच्या कनेक्टिकट येथील कारखान्यात उत्पादन सुरू झाले. हीच ती प्रसिद्ध विंचेस्टर मॉडेल १८८५ सिंगल शॉट रायफल. येथूनच जॉन ब्राऊनिंग आणि विंचेस्टर यांच्या सहकार्याची कहाणी सुरू झाली.

दुसऱ्याच वर्षी ब्राऊनिंग यांनी डिझाइन केलेल्या विंचेस्टर मॉडेल १८८६ लिव्हर अ‍ॅक्शन रिपिटिंग रायफलचे उत्पादन सुरू झाले. या बंदुकीसाठी ब्राऊनिंग यांनी ५० हजार डॉलर मिळाले होते. ती विंचेस्टरच्या सर्वोत्तम मॉडेल्सपैकी एक मानली जाते. १८८७ साली जॉन ब्राऊनिंग दोन वर्षांसाठी ख्रिस्ती मिशनरी बनून सफरीवर गेले. परत आल्यावर त्यांनी राहिलेले काम भरून काढत तीन वर्षांत २२ पेटंट्सची नोंद केली.

विंचेस्टर कंपनीने ब्राऊनिंग यांना एकदा आव्हान दिले होते. त्यांना तातडीने बंदुकीच्या नव्या डिझाइनची गरज होती. ब्राऊनिंग यांनी जर तीन महिन्यांत नवी बंदूक डिझाइन केली तर विंचेस्टरने त्यांना १० हजार डॉलर देण्याचे आमिष दाखवले. हे काम दोन महिन्यांत केले तर १५ हजार डॉलर मिळणार होते. ब्राऊनिंग यांनी एका महिन्यात नवी बंदूक तयार करून दिली आणि २० हजार डॉलर वसूल केले. ही नवी बंदूक विंचेस्टर मॉडेल १८९२ म्हणून गाजली.

पुढील दोन वर्षांत विंचेस्टरने ब्राऊनिंग यांची ११ मॉडेल्स विकत घेतली. त्यात मॉडेल १८९४, मॉडेल १८९५ आणि मॉडेल १८९७ पंप अ‍ॅक्शन रिपिटिंग शॉटगनचा समावेश होता. विंचेस्टर मॉडेल १८९५ अमेरिकेचे माजी अध्यक्ष थिओडोर (टेडी) रुझवेल्ट यांची आवडती बंदूक होती. ते तिला ‘बिग मेडिसिन’ म्हणत.

सचिन दिवाण sachin.diwan@ expressindia.com