News Flash

गाथा शस्त्रांची : कोरियातील युद्ध : एफ-८६ सेबर आणि मिग-१५

एमई-२६२ ची मागे वळलेल्या पंखांची (स्वेप्ट बॅक विंग्ज) रचना सेबर आणि मिग-१५ मध्ये स्वीकारली होती.

सोव्हिएत मिग-१५ व अमेरिकी एफ-८६ सेबर 

उत्तर आणि दक्षिण कोरिया यांच्यात १९५० ते १९५३ दरम्यान झालेले युद्ध हा शीतयुद्धातील पहिला प्रत्यक्ष संग्राम. उत्तर कोरियाच्या बाजूने सोव्हिएत युनियन आणि साम्यवादी चीन तर दक्षिण कोरियाच्या बाजूने अमेरिका आणि बहुराष्ट्रीय फौजा असा सामना होता. यानिमित्ताने साम्यवादी आणि भांडवलशाही अशा दोन भिन्न विचारसरणी आणि त्यांची लढाऊ जेट विमाने एकमेकांना प्रथमच भिडत होती. कोरियन द्वीपकल्पाच्या आसमंतातील अमेरिकी एफ-८६ सेबर आणि सोव्हिएत मिग-१५ या विमानांच्या लढती (एरियल डॉगफाइट्स) हे समीकरण पक्के आहे.

वास्तविक या दोन्ही विमानांचे मूळ नाझी जर्मनीच्या मेसरश्मिट एमई-२६२ या पहिल्या जेट लढाऊ विमानात आढळते. एमई-२६२ ची मागे वळलेल्या पंखांची (स्वेप्ट बॅक विंग्ज) रचना सेबर आणि मिग-१५ मध्ये स्वीकारली होती. त्याने हवेचा अवरोध कमी होऊन वेग वाढला होता. सेबर आणि मिग-१५ मधील आणखी एक साम्य म्हणजे त्यांचे इंजिन मूळच्या ब्रिटिश जेट इंजिनावरून विकसित केले होते. दुसऱ्या महायुद्धात ब्रिटन, अमेरिका आणि सोव्हिएत युनियन जर्मनीविरुद्ध एकत्र लढत असताना ब्रिटिशांनी या मित्र देशांना जेट इंजिनाचे तंत्रज्ञान दिले होते. त्यावरूनच सेबरचे जनरल इलेक्ट्रिक जे-४७ जीई-१७ बी हे टबरेजेट इंजिन आणि मिग-१५ चे क्लिमोव्ह व्हीके-१ टबरेजेट इंजिन विकसित केले होते.

शीतयुद्धाच्या काळात अमेरिकेकडून सोव्हिएत तंत्रज्ञानाला कमी लेखले जात असे. मात्र सेबरचा जेव्हा मिग-१५ विमानांशी मुकाबला झाला तेव्हा अमेरिकेसाठी तो एक धक्काच होता. आर्टेम मिकोयान आणि मिखाईल गुरेविच यांनी १९४७ मध्ये डिझाइन केलेले मिग-१५ हे सेबरपेक्षा तसूभरही कमी नव्हते, किंबहुना काकणभर सरसच होते. (मिकोयान आणि गुरेविच यांच्या नावातील इंग्रजी आद्याक्षरे घेऊन मिग हे नाव तयार केले आहे.)

अतिउंचावरून प्रवास करणाऱ्या अमेरिकी अण्वस्त्रधारी बॉम्बर विमानांना (स्ट्रॅटेजिक बॉम्बर) हवेत लढून पाडण्यासाठी फायटर-इंटरसेप्टर म्हणून मिग-१५ ची रचना झाली होती. त्यामुळे त्यात वेग, उंची गाठण्याची आणि संहारक क्षमता यावर भर होता. मिग-१५ चा वेग ताशी १०७५ किमी इतका होता. एका मिनिटाला ३५०० मीटर (११,४८० फूट) या वेगाने मिग-१५ अधिकतम १५,५०० मीटर (५०,८५५ फूट) उंची गाठू शकत असे. त्यावर तीन कॅनन आणि रॉकेट्स होती. सेबर हे मध्यम उंचीवर सोव्हिएत फायटर विमानांचा मुकाबला करण्यासाठी एअर सुपेरिऑरिटी फायटर म्हणून तयार केले होते. सेबरचा वेग ताशी ११३८ किमी होता आणि त्याच्या पंखांचे क्षेत्रफळ जास्त होते. त्याचा सेबरला डॉगफाइट्समध्ये उपयोग झाला. दोन्ही विमानांची तौलनिक क्षमता साधारण बरोबरीची होती. पण त्यांच्या वापरामागील संकल्पना आणि वैमानिकांचे कौशल्य याने निकालात फरक पडला. सेबरचे अमेरिकी वैमानिक उत्तम प्रशिक्षित होते. सोव्हिएत मिग-१५ चिनी आणि उत्तर कोरियाच्या तुलनेने कमी प्रशिक्षित वैमानिकांच्या हाती होती. इतिहासात या दोन्ही विमानांचा उल्लेख एकत्रच केला जातो.

sachin.diwan@ expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 10, 2018 12:29 am

Web Title: korean war jet fighters
Next Stories
1 गाथा शस्त्रांची : दुसऱ्या महायुद्धानंतरची लढाऊ जेट विमाने
2 गाथा शस्त्रांची : बी-२९ : जपानवर अणुबॉम्ब टाकणारे विमान
3 गाथा शस्त्रांची : एमई-२६२ आणि जेट युगाची सुरुवात