शीतयुद्धाच्या काळात, १९५० आणि १९६० च्या दशकात जेव्हा क्षेपणास्त्रे फारशी विकसित झाली नव्हती तेव्हा शत्रूवर अणुबॉम्ब टाकण्यासाठी (न्यूक्लिअर डिलिव्हरी व्हेईकल म्हणून) प्रामुख्याने लांब पल्ल्याच्या बॉम्बर विमानांचाच पर्याय उपलब्ध होता. त्यासाठी अमेरिका आणि सोव्हिएत युनियन अशा दोन्ही गटांतील देशांनी अतिउंचावरून हजारो किलोमीटर लांब प्रवास करू शकतील अशी विमाने विकसित केली. त्या विमानांना स्ट्रॅटेजिक न्यूक्लिअर बॉम्बर म्हटले जाते.

शक्तिशाली रडार, जमिनीवरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रे यांच्या विकासानंतर त्यांना अतिउंचावरून कारवाया करणे अवघड झाले. मग त्यातील बरीच विमाने कमी उंचीवरून शत्रूच्या प्रदेशात लघु पल्ल्याची अण्वस्त्रधारी क्षेपणास्त्रे सोडण्यासाठी परिवर्तित केली गेली. पुढे आंतरखंडीय क्षेपणास्त्रांनी या विमानांना कालबाह्य़ ठरवले. ब्रिटिश व्हॅलियंट, व्हल्कन आणि व्हिक्टर ही मालिका (व्ही-बॉम्बर्स), अमेरिकेची बोइंग बी-४७ स्ट्रॅटोजेट, बी-५० आणि बी-५२ स्ट्रॅटोफोट्र्रेस मालिका, रशियन टय़ुपोलेव्ह टीयू-१६ बॅजर, टीयू-९५ बेअर, म्यासिश्चेव्ह एम-४ बायसन ही त्या काळातील प्रमुख स्ट्रॅटेजिक बॉम्बर विमाने होती.

अमेरिकेचे बोइंग बी-५२ जून १९५५ मध्ये हवाई दलात सामील झाले. ते प्रामुख्याने सोव्हिएत युनियनवर अण्वस्त्रे टाकण्यासाठी तयार केले होते. त्याची ८ प्रॅट अँड व्हिटनी  टबरेजेट इंजिने त्याला अफाट शक्ती प्रदान करतात. हे विमान साधारण ८००० मैल अंतरावर २७,२०० किलो (६०,००० पौंड) वजनाचे बॉम्ब आणि अन्य शस्त्रसंभार वाहून नेऊ शकते. विविध सुधारणा करून बी-५२ एकविसाव्या शतकातही वापरात आहेत.

टय़ुपोलेव्ह टीयू-९५ बेअर ही विमाने सोव्हिएत हवाई दलात १९५७ साली दाखल झाली. कुझनेत्सोव्ह टबरेप्रॉप प्रकारची इंजिने असलेले हे एकमेव विमान होते. याचा पल्ला १५,००० किमी (९३०० मैल) आहे. बी-५२ प्रमाणेच हेही विमान २१ व्या शतकापर्यंत वापरात राहिले.

ब्रिटिश व्हल्कन विमानाचे पहिले उड्डाण १९५२ साली झाले. ही विमाने ३७०० किमीच्या त्रिज्येत प्रभावीपणे कामगिरी करू शकत. पाणबुडीतून डागली जाणारी पोलरिस क्षेपणास्त्रे वापरात आल्यावर व्हल्कन कालबाह्य़ झाली. ब्रिटनने १९८२ साली अर्जेटिनाविरुद्ध अटलांटिक महासागरातील फॉकलंड बेटांवर पारंपरिक बॉम्बहल्ला करण्यासाठी व्हल्कन विमाने वापरली. त्या काळची ती सर्वात दीर्घ पल्ल्याची (८००० सागरी मैल) बॉम्बफेकी मोहीम होती.