सचिन दिवाण

द्रवरूप इंधनावर आधारित टायटन क्षेपणास्त्रे सेवेतून निवृत्त करत असताना अमेरिकेने मिनिटमन या मालिकेतील क्षपणास्त्रे विकसित केली. दूरवर अण्वस्त्रहल्ला करण्यासाठी १९६० च्या दशकापासून आजवर अमेरिकेची या क्षेपणास्त्रांवर मुख्य भिस्त आहे. मिनिटमन क्षेपणास्त्रांच्या निर्मितीत अनेक प्रकारचे नवे तंत्रज्ञान वापरण्यात आले होते.

मिनिटमन-१ हे क्षेपणास्त्र सर्वप्रथम १९६२ साली तैनात करण्यात आले. १७ मीटर लांबीचे आणि तीन टप्प्यांचे मिनटिमन-१ हे अमेरिकेचे घनरूप इंधनावर आधारित पहिले आंतरखंडीय क्षेपणास्त्र होते. ते द्रवरूप इंधनावर चालणाऱ्या क्षेपणास्त्रांपेक्षा अधिक सुरक्षित आणि वेगाने कार्यान्वित करता येणारे होते. त्याचा पल्ला ६५०० सागरी मैल होता. ते पूर्णपणे जमिनीखालील बंकर किंवा सिलोमध्ये ठेवून डागता येणारे पहिलेच क्षेपणास्त्र होते.

१९६६ ते १९७३ या काळात मिनिटमन-१ ची जागा मिनिटमन-२ या क्षेपणास्त्रांनी घेतली. प्रॉपल्शन प्रणालीत केलेल्या सुधारणांमुळे त्याचा पल्ला ८००० मैल किंवा १३,००० किमीपर्यंत वाढला होता. ते १.२ मेगाटनचा हायड्रोजन बॉम्ब वाहून नेऊ शकत होते. शत्रूच्या क्षेपणास्त्रविरोधी यंत्रणेला चकवा देण्यासाठी त्यावर इलेक्ट्रॉॅनिक जॅमर आणि अन्य उपकरणे बसवली होती.

मिनिटमन-३ ही सुधारित आवृत्ती १९७० ते १९७५ या काळात तैनात करण्यात आली. मिनिटमन-३ क्षेपणास्त्रांचे वैशिष्टय़ म्हणजे त्यावर मल्टिपल इंडिपेंडंटली टार्गेटेबल रि-एंट्री व्हेईकल (एमआयआरव्ही) हे तंत्रज्ञान वापरले होते. म्हणजे या एका क्षेपणास्त्रावर प्रत्येकी १७० किलोटन क्षमतेचे तीन हायड्रोजन बॉम्ब बसवले होते आणि ते एकाच वेळी तीन वेगवेगळ्या लक्ष्यांवर टाकता येत होते. काही मिनिटमन-३ क्षेपणास्त्रांवर १९८०च्या दशकात प्रत्येकी ३३५ किलोटन क्षमतेचे तीन हायड्रोजन बॉम्ब बसवण्यात आले. या तंत्रज्ञानामुळे कमी क्षेपणास्त्रे वापरून अधिक लक्ष्यांचा वेध घेता येणे किंवा एकाच लक्ष्यावर अधिक अणुबॉम्ब टाकणे शक्य झाले. त्याने अमेरिकेला सोव्हिएत युनियनच्या तुलनेत आघाडी मिळवून दिली.

१९८६ ते १९८८ या काळात ५० मिनिटमन-३ क्षेपणास्त्रांच्या जागी पीसकिपर ही क्षेपणास्त्रे तैनात केली गेली. या वेळेपर्यंत अण्वस्त्रे आणि आंतरखंडीय क्षेपणास्त्रांचा प्रसार खूपच वाढला होता. तो रोखण्यासाठी अमेरिका आणि सोव्हिएत युनियनमध्ये १९९० च्या दशकाच्या सुरुवातीला स्ट्रॅटेजिक आम्र्स रिडक्शन ट्रीटी (स्टार्ट-१ आणि स्टार्ट-२) हे करार झाले. त्यानुसार १९९५ पर्यंत मिनिटमन-२ क्षेपणास्त्रे आणि २००२ ते २००५ पर्यंत पीसकिपर क्षेपणास्त्रे निवृत्त करण्यात आली. सध्या अमेरिकेकडे साधारण ४५० मिनिटमन-३ प्रकारची, एकच अण्वस्त्र बसवलेली आंतरखंडीय क्षेपणास्त्रे आहेत. ती अमेरिकी हवाई दलाच्या व्योमिंग, नॉर्थ डकोटा आणि मोंटाना या तळांवर तैनात आहेत.

sachin.diwan@ expressindia.com