16 January 2019

News Flash

माऊझर सी ९६ ‘ब्रूमहँडल’ पिस्तूल

 एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस रिव्हॉल्व्हरचा बराच प्रसार झाला होता

पॉल माऊझर यांच्या माऊझर सी ९६ ब्रूमहँडल (Mauser Construktion 96 Broom-handle) या सेमी-ऑटोमॅटिक पिस्तुलाने इतिहासात महत्त्वाचे स्थान पटकावले आहे.

एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस रिव्हॉल्व्हरचा बराच प्रसार झाला होता. त्यामुळे एका वेळी अनेक गोळ्या झाडण्याची क्षमता असलेल्या शस्त्रांची मागणी वाढू लागली होती. युद्धात ही बाब निर्णायक ठरत होती. त्यामुळे रायफलमध्येही सिंगल-शॉटऐवजी मल्टि-शॉट तंत्राला महत्त्व आले होते. रिव्हॉल्व्हरमध्ये पाच ते सहाच्या वर गोळ्या मावत नसत. त्यामुळे अधिक क्षमतेच्या पिस्तुलांच्या विकासाला चालना मिळाली. जर्मनीतील ह्य़ुगो बोरशार्ट (Hugo Borchardt) यांनी १८९३ साली ऑटोमॅटिक पिस्तुलाची प्राथमिक आवृत्ती बनवली होती. त्याचे पिस्तूल बोरशार्ट सी-९३ नावाने ओळखले जात होते. जर्मनीतीलच जॉर्ज लुगर यांनी बोरशार्ट यांच्या पिस्तुलात सुधारणा करून १९९८ साली लुगर पिस्तूल बाजारात आणले होते. त्याला चांगली मागणी होती.

माऊझर यांनी १८७८ साली झिगझ्ॉग नावाचे रिव्हॉल्व्हर बाजारात आणले होते. त्याच्या रिव्हॉल्व्हिंग चेंबरवर इंग्रजी झेड अक्षराच्या आकारात खाचा होत्या. त्यावरून त्याला झिगझ्ॉग नाव पडले. पण ते बाजारात फारसे खपले नाही. त्यानंतर माऊझर यांनी फिडेल, फ्रेडरिक आणि जोसेफ फिडरले (Fidel, Friedrich, Josef Feederle) या बंधूंच्या मदतीने १८९६ साली सी-९६ पिस्तुल बनवले. त्यात एका वेळी १० गोळ्या मावत असत. ते सेमी-ऑटोमॅटिक प्रकारचे पिस्तूल होते. माऊझर यांनी पॉट्सडॅम येथे कैसर विल्हेम दुसरे यांना सी-९६ पिस्तुलाचे प्रात्यक्षिक दाखवले होते. त्यांनाही ते आवडले. मात्र जर्मन सेनादलांसाठी त्याची निर्मिती केली गेली नाही. माऊझर सी ९६ पिस्तूल त्यावेळी काळाच्या पुढे असल्याचे मानले जाते.

पुढे लुगर आणि ब्राऊनिंग पिस्तुलांमुळे ऑटोमॅटिक पिस्तुले स्वीकारण्याची मानसिकता बनली आणि माऊझर यांच्या सी ९६ पिस्तुलाला मागणी आली. त्याचे हँडल जमीन लोटण्यासाठी वापरायच्या झाडूसारखे होते. म्हणून हे पिस्तूल ब्रूम-हँडल नावाने अधिक गाजले. १८९६ ते १९३९ दरम्यान सी-९६च्या दहा लाख प्रती तयार झाल्या होत्या.

ब्रिटनचे माजी पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांनी तरुणपणी सैन्यात सेकंड लेफ्टनंट असताना आफ्रिकेतील सुदान येथील युद्धात माऊझर सी-९६ ब्रूमहँडल पिस्तूल वापरले होते. त्याने त्यांचे प्राण वाचवल्याची आठवण ते सांगत. लॉरेन्स ऑफ अरेबियाने ते वापरले होते. रशियाच्या बोल्शेव्हिक क्रांतिकारकांमध्ये ते प्रसिद्ध होते. तसेच भारतीय स्वातंत्र्यलढय़ात ऑगस्ट १९२५ मध्ये रामप्रसाद बिस्मिल आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी काकोरी कटामध्ये रेल्वेतील खजिना लूटताना त्यांचा वापर केला होता. चिनी साम्यवादी जनरल झु डे यांनी नानचांग उठावात हेच पिस्तूल वापरले होते.

पहिल्या महायुद्धादरम्यान माऊझर यांनी लुगर कंपनीचा ताबा घेतला. त्यानंतरही माऊझर कंपनीने ऑटोमॅटिक रायफल, रणगाडाविरोधी बंदूक, शिकारीच्या आणि खेळातील नेमबाजीच्या बंदुकांचे उत्पादन केले. माऊझर बंधूंपैकी विल्हेम यांचे १८८२ साली तर पॉल यांचे १९३० मध्ये निधन झाले. पण त्यांनी घालून दिलेली दर्जेदार उत्पादनांची परंपरा आजही कायम आहे.

sachin.diwan@expressindia.com

First Published on February 13, 2018 4:32 am

Web Title: mouse c96 broomhandle pistol