सचिन दिवाण

नापाम बॉम्बस्फोटाच्या पाश्र्वभूमीवर भाजलेली काही लहान मुले वेदनेने विव्हळत, जिवाच्या आकांताने रस्त्यावरून पळत दूर जात आहेत. त्यात मध्यभागी किम फुक नावाची ९ वर्षांची मुलगी कपडे जळाल्याने संपूर्ण नग्नावस्थेत अंगावरच्या जखमा वागवत पळताना दिसत आहे.

असोसिएटेड प्रेस (एपी) या वृत्तसंस्थेचे त्या वेळी विशीत असलेले छायाचित्रकार निक ऊट यांनी दक्षिण व्हिएतनामच्या त्रांग बांग गावात ८ जून १९७२ रोजी टिपलेले हे छायाचित्र दुसऱ्या दिवशी ‘द न्यूयॉर्क टाइम्स’च्या पहिल्या पानावर छापून आले आणि जगात अमेरिकेविरुद्ध आणि अमेरिकी जनतेत व्हिएतनाम युद्धाविरुद्ध वातावरण तापू लागले. चित्रातील मुलगी नग्नावस्थेत दिसत असल्याने प्रथम संपादक श्लील-अश्लीलतेच्या कारणाने ते छापण्याबाबत संभ्रमावस्थेत होते. पण या छायाचित्राला मानाचा ‘पुलित्झर’ पुरस्कार आणि १९७३ सालचा ‘वर्ल्ड प्रेस फोटो ऑफ द इयर’ पुरस्कार मिळाला. आज जगाच्या इतिहासातील महत्त्वाच्या छायाचित्रांमध्ये त्याची गणना होते.

युद्धात दक्षिण व्हिएतनाममधील त्रांग बांग हे गाव उत्तर व्हिएतनामच्या सैन्याने जिंकून घेतले होते. त्यावर दक्षिण व्हिएतनामच्या सैन्याने हवाई हल्ला करून नापाम बॉम्ब टाकले होते. त्यात किम फुक ६० टक्के भाजली होती. अनेक महिन्यांच्या उपचारांनंतर ती जगली. क्युबा आणि नंतर कॅनडात पती आणि दोन मुलांसह स्थायिक झाली. त्यांनी शांततेचा आणि क्षमाशीलतेचा पुरस्कार केला.

नापाम म्हणजे नॅप्थेनिक आणि अ‍ॅलिफॅटिक काबरेक्झिलिक आम्लांच्या मिश्रणाचे अ‍ॅल्युनिनिअम क्षार किंवा साबण. ते गॅसोलिनची जेली करण्यासाठी वापरतात. त्या मिश्रणालाही नापाम म्हणतात. नापाम बॉम्बमधील गॅसोलिन जेली स्फोटानंतर  विस्तृत प्रदेशावर पसरून अधिक काळ जळत राहते. त्या आगीचे तापमान साधारण ८०० ते १००० अंश सेल्सिअस इतके असते. हे अत्यंत घातक शस्त्र आहे.

sachin.diwan@expressindia.com