सीमेवरील सैन्यदलांसह देशातील कायदा-सुव्यवस्था राखणाऱ्या पोलीस आणि निमलष्करी दले आदी यंत्रणांना शस्त्रांचा वापर करावा लागतो. युद्धात शत्रुसैन्याला ठार मारणे हे सर्वसंमत ध्येय असते. मात्र देशांतर्गत सुरक्षा यंत्रणांना तशी मुभा क्वचितप्रसंगीच देता येते. शहरातील दहशतवादी हल्ले, अपहरण यांसारखे गुन्हे किंवा हिंसक आदोलने, मोर्चे आदी प्रसंगी शक्यतो जीव न घेता गुन्हेगारांना पकडण्याचा किंवा आंदोलकांना काबूत आणण्याचा प्रयत्न असतो. अशा वेळी नॉन-लिथल वेपन्स उपयोगी ठरतात.

त्यापैकी सामान्य परिचयाची शस्त्रे म्हणजे लाठीमार, अश्रुधूर, मिरीची पूड डोळ्यांत फवारणे, पाण्याच्या जोरदार फवाऱ्याचा मारा करणे किंवा रबरी गोळ्या झाडणे. हे उपायही पूर्णपणे धोकामुक्त नाहीत. रबर बुलेट्स म्हणून वापरल्या जाणाऱ्या बंदुकीच्या गोळ्या म्हणजेही धातूच्या गाभ्यावर रबरी वेष्टन चढवलेल्या गोळ्या असतात. त्या कमी अंतरावरून वर्मी लागल्या तर जीव जाऊ शकतो.

त्याऐवजी इन्फ्रा साऊंडसारखी शस्त्रे वापरता येतात. मानवी कान ठरावीक मर्यादेतील ध्वनिलहरीच ऐकू शकतात किंवा डोळ्यांना ठरावीक तरंगलांबीचाच (वेव्हलेंथ) प्रकाश दिसतो. त्याच्या पलीकडील प्रकाशाला अवरक्त (इन्फ्रारेड) आणि अतिनील (अल्ट्रा व्हायोलेट) किरण म्हणतात. तसेच ध्वनीतही इन्फ्रा साऊंड आणि अल्ट्रा साऊंड असे प्रकार आहेत. त्यातील इन्फ्रा साऊंडमध्ये विलक्षण गुणधर्म आहेत. विशिष्ट तरंगलांबी किंवा वारंवारितेचा (फ्रिक्वेन्सी) इन्फ्रा साऊंड वापरल्यास माणसांना उलटय़ा, जुलाब, डोकेदुखी, मानसिक अस्वस्थता आणि नैराश्य अशी लक्षणे जाणवू लागतात. हा परिणाम तात्पुरता असतो. काही वेळाने प्रभावित माणसे पुन्हा पूर्ववत होतात. ध्वनी ही एक ऊर्जा आहे. ती हवी त्या दिशेला प्रवाहित करता येते आणि तिचा एक शस्त्र म्हणून वापर करता येतो. ध्वनी असल्यामुळे तो दिसण्याचा प्रश्न नाही. मानवी कानांच्या मर्यादेपलीकडचा असल्याने ऐकू येणार नाही. त्यामुळे दंगलीच्या वेळी कोणाला काय होत आहे हे कळणार तर नाही, पण अपेक्षित परिणाम मात्र साधला जाईल.

याशिवाय त्वचेचा दाह करणारे वायू आणि रसायने उपलब्ध आहेत. नेट गन हा एक साधा आणि फारसा त्रासदायक नसलेला प्रकार आहे. त्यात बंदुकीतून लक्ष्यावर जाळी फेकली जाते. लक्ष्य केलेली व्यक्ती जाळ्यात अडकून तिच्यावर नियंत्रण आणता येते. ‘स्टिकी फोम गन’मधून डिंकासारखा चिकट फेसाळ पदार्थ लक्ष्यावर सोडता येतो. याचा वापर केलेली व्यक्ती हातपाय अंगाला चिकटून जागीच थिजून जाते. अमेरिकेच्या सँडिया नॅशनल लॅबोरेटरीत हा संशोधन प्रकल्प साकारला होता. त्यानंतर सोमालियातील संयुक्त राष्ट्रांच्या शांतीसेनेत सहभागी झालेल्या अमेरिकेच्या मरिन कोअरच्या सैनिकांनी त्या ऑपरेशन युनायटेड शिल्डदरम्यान वापरल्या.

इलेक्ट्रोशॉक गनमधून एका वायरला जोडलेली पिनसारखी टोकदार वस्तू वेगाने बाहेर फेकली जाते. काही अंतरावरील व्यक्तीच्या अंगात ती सुई घुसते आणि तिच्या स्नायूंना हलका विद्युत झटका देते. तर काही वेळा त्वचेचा दाह होण्याचीही सोय करता येते. त्याने भांबावलेल्या व्यक्तीला नियंत्रणात आणणे सोपे जाते. इलेक्ट्रोमॅग्नेटिक पल्स गन्समधून विद्युत चुंबकीय स्पंदने फेकली जातात. त्याने मोबाइल, टीव्ही, संगणक अशी इलेक्ट्रॉनिक उपकरणे निकामी होतात. त्याने आंदोलकांच्या संदेशवहनावर आणि माहिती प्रसारणावर नियंत्रण ठेवता येते. या उपकरणांचा सरसकट वापर करणे धोकादायक ठरू शकते. याशिवाय अशा तंत्रज्ञानाच्या वापराबाबत कायदेशीर आणि नैतिक प्रश्नही आहेत.

सचिन दिवाण

sachin.diwan@expressindia.com