दुसऱ्या महायुद्धात जर्मनीने हायड्रोजन पेरॉक्साइडचा इंधन म्हणून वापर करून त्यावर पाणबुडय़ा चालवण्याचा प्रयत्न केला होता. युद्धानंतर ब्रिटनने जर्मनीची कल्पना उचलून तसाच प्रयत्न करून पाहिली. त्यातून पाणबुडीला अधिक काळ पाण्याखाली राहण्याची क्षमता प्रदान करण्याचा प्रयत्न होता. पण ते फारच खर्चीक आणि बेभरवशाचे ठरले. पण पाणबुडीवर बसू शकतील इतक्या लहान अणुभट्टय़ा (मिनिएचराइज्ड न्यूक्लिअर रिअ‍ॅक्टर) तयार झाल्यानंतर ही समस्या संपली. अणुभट्टय़ांनी पाणबुडय़ांना अमर्याद शक्ती प्रदान केली असली तरी त्या हाताळण्यास तितक्याच धोकादायक होत्या. तंत्रज्ञानातील सुधारणेबरोबर तो धोका कमी होत गेला.

अमेरिकेने १९५४ साली नॉटिलस ही पहिली अणुशक्तीवर चालणारी पाणबुडी नौदलात दाखल करून त्या क्षेत्रातील स्पर्धेला सुरुवात केली होती. ब्रिटिशांनी १९६० साली अमेरिकेकडून अणुभट्टी घेऊन पहिली अणुपाणबुडी बनवली. तिला नाव ड्रेडनॉट असे दिले. अमेरिकेने १९५८ साली पोलरिस क्षेपणास्त्राची चाचणी घेतली. हे क्षेपणास्त्र पाणबुडीतून डागता येत असे. ते पाणबुडी पाण्याखाली असताना डागले की पाण्याच्या बाहेर येऊन जमिनीवरील लक्ष्याचा वेध घेते. त्या प्रकाराला सबमरीन लॉन्च्ड बॅलिस्टिक मिसाइल (एसएलबीएम) म्हणतात. १९६१ पर्यंत पोलरिसने सज्ज १० पाणबुडय़ा अमेरिकी नौदलात होत्या. तर १९६४ पर्यंत त्यांची संख्या २३ वर गेली. फ्रान्सने अमेरिकेवर विसंबून न राहता स्वत:च्या पाणबुडय़ा आणि क्षेपणास्त्रे बनवली.

सोव्हिएत युनियनकडे १९६० पर्यंत  पारंपरिक पाणबुडय़ांची संख्या मोठी असली तरी त्यानंतर त्यांनी अणुपाणबुडय़ांवर भर देण्यास सुरुवात केली. रशियाच्या पहिल्या अणुपाणबुडय़ा नोव्हेंबर वर्गातील (वर्ग किंवा क्लास म्हणजे एकाच प्रकारचे डिझाइन असलेल्या नौका) होत्या. रशियाने १९६३ नंतरच्या दशकात यांकी वर्गातील ३४ पाणबुडय़ा बनवल्या. रशियाने १९८३ साली सर्वात मोठी टायफून वर्गातील पाणबुडी बनवली. दरम्यान अमेरिकेने पोलरिसच्या जागी ट्रायडेंट क्षेपणास्त्रांनी सज्ज पाणबुडय़ा बांधल्या होत्या. ब्रिटिशांनी व्हॅनगार्ड वर्गातील पाणबुडय़ा बांधल्या.

अणुपाणबुडीचे एसएसबी आणि एसएसबीएन असे प्रकार आहेत. एसएस म्हणजे सबमरीन शिप, बी म्हणजे बॅलिस्टिक आणि एन म्हणजे न्यूक्लिअर. एसएसबी प्रकारच्या पाणबुडय़ा पारंपरिक असून त्यावर अणुबॉम्ब बसवलेली क्षेपणास्त्रे डागण्याची सोय असते. तर एसएसबीएन या पाणबुडय़ा अणुशक्तीवर चालतात आणि त्या अण्वस्त्रधारी क्षेपणास्त्रे डागू शकतात.

sachin.diwan@ expressindia.com