चीनमध्ये साधारण नवव्या शतकात गनपावडरचा शोध लागल्यानंतर त्याचा युद्धात वापर होण्यास बारावे शतक उजाडले. १५ व्या शतकापासून बंदुकांच्या विकासाला प्रारंभ झाला. सुरुवातीला मॅचलॉक मस्कट, फ्लिंटलॉक, पर्कशन लॉक आणि नंतर धातूचे आवरण असलेले एकत्रित काडतूस असे टप्पे आले. रायफलिंग आणि अन्य तंत्रांच्या विकासाने बंदुकांची अचूकता वाढली. रिव्हॉल्व्हर, पिस्तूल, शॉटगन, रायफल, मशिनगन, सब-मशिनगन, कार्बाइन, असॉल्ट रायफल, बुलपप डिझाइन असा प्रवास करत बंदुका आजच्या स्वरूपापर्यंत उत्क्रांत झाल्या.

या सर्व प्रवासात त्यांनी आघाडीच्या सैनिकांचे मुख्य शस्त्र म्हणून भूमिका पुरेपूर वठवली. बंदुकांची ही भूमिका कायम असली तरी त्यांचे स्वरूप सतत बदलत आहे. याच उत्क्रांतीमधील सर्वात आधुनिक आणि भविष्यवेधी टप्पे आहेत ‘ऑब्जेक्टिव्ह इंडिव्हिज्युअल कॉम्बॅट वेपन’ (ओआयसीडब्ल्यू) आणि हेक्लर अँड कॉखने तयार केलेली जी-११ ही ‘केसलेस अ‍ॅम्युनिशन’ वापरणारी बंदूक.

‘ओआयसीडब्ल्यू’ हा अमेरिकेचा सैनिकांना अत्याधुनिक रायफल पुरवण्याचा संशोधन प्रकल्प होता. त्याची मूळ संकल्पना अशी होती की आडोसा घेऊन लपलेल्या शत्रूसैनिकांच्या डोक्यावर हवेत स्फोट घडवणारे हातबॉम्ब (एअर बर्स्ट ग्रेनेड्स) आणि गोळ्या एकाच वेळी झाडू शकणारी बंदूक विकसित करणे. त्यानुसार ‘ओआयसीडब्ल्यू’मध्ये ५.५६ मिमी व्यासाच्या नेहमीच्या गोळ्या झाडणारी मुख्य बंदूक आहे. तिच्यावर एअर बर्स्ट ग्रेनेड्स झाडणारा ग्रेनेड लाँचर आणि त्यावर नेम धरण्यासाठीची दुर्बीण बसवली आहे. हे ग्रेनेड्स नेहमीपेक्षा आकाराने लहान पण स्फोटक क्षमतेने अधिक असतील.

हेक्लर अँड कॉख जी-११ रायफलमध्ये केसलेस अ‍ॅम्युनिशन म्हणजे धातूचे आवरण नसलेल्या गोळ्या वापरल्या जातात. धातूची गोळी, गनपावडर, प्रायमर यांना एकत्र ठेवणाऱ्या धातूच्या आवरणाऐवजी घनरूप गनपावडरमध्येच गोळी आणि प्रायमर बसवलेला असतो. त्यामुळे गोळीचे वजन कमी होते आणि गोळी झाडल्यावर उरणारे काडतुसाचे मोकळे आवरण बाहेर फेकण्याची सोय करण्याची गरज उरत नाही. काही अडचणींमुळे या दोन्ही बंदुका सध्या केवळ प्रायोगिक तत्त्वावर अस्तित्वात आहेत.

नवीन तंत्रांचा शोध सुरू असला तरी सध्याची ‘पर्कशन’ शस्त्रांची प्रणाली पूर्णपणे बदलेपर्यंत कोल्ट, स्मिथ आणि वेसन, रेमिंग्टन, कलाशनिकोव्ह आदींनी शोधलेली बंदुकांची तत्त्वे अबाधित राहतील.

सचिन दिवाण – sachin.diwan@ expressindia.com