25 April 2019

News Flash

पहिले महायुद्ध : तोफखान्याचे युग

या युद्धात भाग घेतलेल्या एकूण सैनिकांमध्ये तोफखान्याचे सहा लाख सैनिक होते.

पाशंडीलची युद्धभूमी : तोफगोळ्यांनी मोडलेली झाडे, जलमय खड्डे आणि रक्तामांसाचा चिखल

पहिले महायुद्ध खऱ्या अर्थाने तोफखान्याचे युद्ध होते. त्यापूर्वी कधी नव्हे इतकी निर्णायक भूमिका तोफखान्याने या युद्धात बजावली होती. त्यापूर्वीच्या युद्धांमध्ये तोफखान्याने बळी घेतलेल्या सैनिकांचे प्रमाण एकूण हानीच्या १० ते १५ टक्के इतकेच होते. पहिल्या महायुद्धात मरण पावलेल्या एकूण सैनिकांपैकी ७० टक्के बळी एकटय़ा तोफखान्याने घेतले होते. या युद्धात भाग घेतलेल्या एकूण सैनिकांमध्ये तोफखान्याचे सहा लाख सैनिक होते.

क्रिमियन युद्ध, अमेरिकी गृहयुद्ध, फ्रँको-प्रशियन युद्ध, बोअर युद्ध, रशिया-जपान युद्ध या संघर्षांमधून तोफखान्याचा वाढता वापर झाला होता. अनेक देशांना तोफखान्याचे महत्त्व पटून त्यांनी त्याच्या विकासावर भर दिला होता. त्यातून तोफखाना अधिकाधिक प्रभावी आणि विध्वंसक बनला होता. पहिल्या महायुद्धाच्या अनेक लढायांमध्ये त्याचे प्रत्यंतर आले.

एप्रिल १९१७ मध्ये फ्रान्समधील व्हिमी रिज येथील जर्मन सैन्यावर कॅनडाच्या सैन्याने हल्ला केला. त्यात कॅनडाने तोफखान्याचा प्रभावी वापर करत जर्मन सैन्याला मागे रेटले. या युद्धानंतर तोफखान्याचे महत्त्व तर अधोरेखित झालेच, पण कॅनडाच्या राष्ट्रीय अस्मितेला नवी झळाळी प्राप्त झाली.

दुसऱ्या महायुद्धाच्या अखेरीस अमेरिकेचे अध्यक्ष झालेले हॅरी ट्रमन पहिल्या महायुद्धात म्यूझ-अर्गोनच्या लढाईत तोफखान्याचे कॅप्टन म्हणून लढले होते.

मार्च १९१५ मध्ये दार्दानील्सच्या सामुद्रधुनीत झालेल्या लढाईत तुर्कस्तानच्या तोफखान्याने ब्रिटिश आणि फ्रेंचांचे गॅलिपोली येथे सैन्य उतरवण्याचे मनसुबे उधळून लावले. या कारवाईच्या नियोजनात ब्रिटनचे भावी पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांचा फर्स्ट लॉर्ड ऑफ द अ‍ॅडमिराल्टी म्हणून मोठा सहभाग होता. मात्र त्यातील अपयशानंतर चर्चिल यांची पदावनती (डिमोशन) करण्यात आली होती.

पहिल्या महायुद्धातील  सोम, व्हर्दन आणि पाशंडील (यीप्रची तिसरी लढाई) येथील लढायांमध्ये तोफखान्याने अपरिमित हानी घडवली. या लढायांमध्ये मनुष्यहानीने उच्चांकी पातळी गाठली. फ्रान्समधील सोम आणि व्हर्दन येथे १९१६ साली साधारण एकाच काळात झालेल्या लढायांत प्रत्येकी दहा लाखांवर सैनिक मारले गेले. सोम येथील जर्मन मोर्चेबंदी उद्ध्वस्त करण्यासाठी ब्रिटन, फ्रान्स आदींनी हल्ल्याआधी आठ दिवस सलग तोफखान्याचा मारा करून साडेतीन लाखांवर तोफगोळे डागले होते. तरीही पायदळाच्या हल्ल्याच्या पहिल्या दिवशी ५७,००० ब्रिटिश सैनिक जखमी झाले. त्यातील २०,००० मरण पावले. व्हर्दन येथील संपूर्ण कारवाईत १२ दशलक्ष तोफगोळे डागले गेले. म्हणजे एका दिवसाला २२,००० इतके तोफगोळे  डागले.

बेल्जियममधील पाशंडील येथील लढाईत जिंकलेली जमीन आणि मरणारे सैनिक यांचे गुणोत्तर होते दर दोन इंच जमिनीसाठी एक सैनिक. यापूर्वी युद्ध इतके संहारक कधीच नव्हते. त्यातील मोठा वाटा तोफखान्याचा होता. तोफखान्याचे युग अवतरले होते.

सचिन दिवाण sachin.diwan@ expressindia.com

 

First Published on April 14, 2018 1:42 am

Web Title: ordnance role during first world war