02 March 2021

News Flash

गाथा शस्त्रांची : पॅलाडीन, क्रुसेडर आणि भविष्यातील तोफखाना

दुसऱ्या महायुद्धानंरच्या जगात युद्धे खूपच गतिमान झाली.

अमेरिकी एम-१०९ ए -६ पॅलाडीन

गनपावडरच्या शोधापूर्वी शत्रूवर बाणांचा आणि दगडगोळ्यांचा मारा करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या बॅलिस्टा, कॅटापुल्ट, ओनेगर, ट्रेब्युशे आदी यंत्रांपासून सुरुवात झालेल्या तोफखान्याने १५ व्या शतकात गनपावडरचा वापर होऊ लागल्यानंतर लवकरच घातक रूप घेतले. धातूकला, रसायनशास्त्र यांचा विकास झाल्यानंतर तोफा अधिक सफाईदार झाल्या. औद्योगिक क्रांतीनंतरच्या जगात तोफखान्याने खऱ्या अर्थाने विक्राळ रूप धारण केले. तत्पूर्वीच्या युद्धांमध्ये तोफखान्याने जीव घेतलेल्या सैनिकांचे प्रमाण १० ते १५ टक्के असे. ते पहिल्या महायुद्धापर्यंत ७० टक्क्य़ांवर गेले. पहिल्या महायुद्धात सोम आणि व्हर्दनच्या लढायांमध्ये तोफखान्याने मानवी हानीचा उच्चांक साधला गेला. दुसऱ्या महायुद्धात तोफखाना अधिक गतिमान बनला.

दुसऱ्या महायुद्धानंरच्या जगात युद्धे खूपच गतिमान झाली. विमाने आणि रणगाडय़ांचा सामना करण्यासाठी अँटि-टँक आणि अँटि-एअरक्राफ्ट आर्टिलरीचा उदय झाला. त्या वेगाशी जुळवून घेण्यासाठी सेल्फ-प्रोपेल्ड आर्टिलरीचा जन्म झाला. शत्रूच्या  तोफगोळ्यांचा वेध घेऊन तोफांचे स्थान ओळखणे आणि त्या नष्ट करण्याचे तंत्र (म्हणजेच अँटि-बॅटरी फायरिंग) सुधारले. त्यामुळे तोफा डागून लगेच जागा बदलण्याची क्षमता (शुट अँड स्कुट अ‍ॅबिलिटी) महत्त्वाची ठरली. या विचारधारेवर आधारित अनेक सेल्फ-प्रोपेल्ड तोफा बनवल्या गेल्या. त्यात अमेरिकेच्या एम-१०८, एम-१०९ आणि एम-११० या श्रेणीतील तोफा महत्त्वाच्या होत्या.

अमेरिकेने एम-१०९ मालिकेतील ए-६ या मॉडेलला पॅलाडीन असे नाव दिले. हा तोफगाडा (सेल्फ-प्रोपेल्ड गन) सध्या अमेरिकेच्या ताफ्यातील सर्वात आधुनिक मानण्यात येतो. पॅलाडीन युद्धभूमीवर ताशी ५६ किमीच्या वेगाने सलग ३५० किमी प्रवास करू शकतो. त्याच्या तोफेचा पल्ला ३० किमीपर्यंत आहे. त्यातून एका मिनिटात ४ तोफगोळे डागता येतात. या तोफगाडय़ाची संपूर्ण यंत्रणा स्वयंचलित आणि संगणक व ग्लोबल पोझिशनिंग सिस्टिमसारख्या (जीपीएस) कृत्रिम उपग्रह तंत्रज्ञानावर आधारित आहे.

पॅलाडीनचे वैशिष्टय़ म्हणजे त्याची ‘मल्टिपल राऊंड्स सायमल्टेनिअस इम्पॅक्ट’ प्रणाली. त्यात तोफेतून एकामागोमाग एक गोळे डागून ते सर्व एकाच वेळी एकाच लक्ष्यावर पाडता येतात. त्यामुळ ेअशा तोफांना ‘वन गन बॅटरी’ म्हटले जाते. तोफखान्यात बॅटरी म्हणजे ६ ते ८ तोफांचा समूह. एक बॅटरी जितके गोळे डागू शकते तितके ही एकटी तोफ डागू शकते म्हणून  ‘वन गन बॅटरी’ असे म्हटले जाते. अशीच क्षमता ब्रिटनच्या एएस-९०, जर्मनीच्या पँझरहॉबिट्झ-२०००, दक्षिण आफ्रिकेच्या डेनेल जी-६, फ्रान्सच्या सीझर, रशियन मिस्टा २ एस १९, स्लोव्हाकियाच्या सुझान आणि स्वीडनच्या आर्चर या सेल्फ-प्रोपेल्ड तोफांमध्येही आहे. या तोफा म्हणजे तोफखान्याच्या आजवरच्या विकासातील उच्चतम बिंदू आहेत.

अमेरिकेचा भविष्यातील तोफ बनवण्याचा क्रुसेडर हा प्रकल्प सध्या थांबला आहे. पण त्यांने आगामी तंत्रज्ञानाची दिशा दाखवली आहे. भविष्यात तोफगोळे तोफेतून बाहेर फेकण्यासाठी आतासारखी घनरूप स्फोटके वापरली जाणार नाहीत. त्याऐवजी तोफेच्या बॅरलमध्ये द्रवरूप स्फोटके एरोसोलच्या रूपात वापरली जातील.

भविष्यातील रूप कसेही असले तरी तोफखान्याचा प्रभाव ओसरणार नाही. म्हणूनच जोसेफ स्टालिनने तोफखान्याचा उल्लेख ‘द गॉड ऑफ वॉर’ असा केला होता.

sachin.diwan@expressindia.com 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 1, 2018 5:00 am

Web Title: palladine crusader and future artillery
Next Stories
1 अमेरिकी एम-१९८ आणि एम-७७७ तोफा
2 वादग्रस्त, पण खात्रीशीर बोफोर्स आणि भविष्यवेधी आर्चर
3 रिकॉइललेस गन आणि आरपीजी
Just Now!
X