फ्लिंटलॉक पद्धतीच्या बंदुका आणि पिस्तुले साधारण दोन शतकभराहून अधिक काळ वापरात होती. मात्र त्यांच्याही त्रुटी आता उघड होऊ लागल्या होत्या. मॅचलॉकच्या तुलनेत फ्लिंटलॉक पावसाळी वातावरणात वापरणे सुलभ होते. मात्र दमट हवामानात फ्लिंटलॉकच्या पॅनमधील पावडरही ओलसर होऊन पेटत नसे. त्या वेळी गनपावडर कोरडी ठेवणे जिकिरीचे असले तरी गरजेचे होते. त्यावरूनच ‘किप युवर पावडर ड्राय’ (सदैव तयारीत किंवा सज्ज राहणे) हा वाक्प्रचार आला आहे. फ्लिंटलॉकच्या पॅनमधील पहिला पेट आणि चेंबरमधील स्फोट यात काहीसा कालापव्यय होत असे. त्याने लक्ष्य सावध होत असे. तसेच या पद्धतीत गोळ्या डागण्याचा वेग एका मिनिटाला तीन ते चार गोळ्यांच्या वर जात नसे. युद्धभूमीत गोळ्या डागण्याचा हा वेग जीवन किंवा मरणाचा प्रश्न बनत असे.

त्यामुळे बंदुकीत गनपावडर प्रज्वलित करण्याच्या आणखी नव्या तंत्राची गरज भासू लागली होती. त्यातूनच पर्कशन लॉक किंवा पर्कशन कॅप पद्धतीचा उगम झाला. एडवर्ड चार्ल्स होवार्ड यांनी १८०० साली मक्र्युरी फल्मिनेट नावाचे स्फोटक बनवले. नायट्रिक आम्लामध्ये पारा (मक्र्युरी) विरघळवून त्यात इथॅनॉल मिसळल्यावर मक्र्युरी फल्मिनेट तयार होते. हे मिश्रण अत्यंत स्फोटक असून साध्या धक्क्याने किंवा घर्षणाने त्याचा स्फोट होतो. होवार्ड यांनी हे स्फोटक बंदुकीतील गनपावडर पेटवण्यासाठी ‘प्रायमर’ म्हणून वापरून पाहिले. पण ते जरा जास्तच स्फोटक होते. स्कॉटलंडमधील हौशी शिकारी आणि संशोधक रेव्हरंड अलेक्झांडर जॉन फोरसिथ यांनी मक्र्युरी फल्मिनेटमध्ये काही अन्य रसायने मिसळून ते थोडे सौम्य बनवले. हे रसायन बंदुकीच्या नळीतील मुख्य गनपावडरला प्रज्वलित करण्यासाठी प्रायमर म्हणून वापरले जाऊ लागले.

पर्कशन लॉकची यंत्रणा समजावून सांगण्यास थोडी गुंतागुंतीची असली तरी तिने बंदुकांच्या तंत्रज्ञानात मोठा बदल घडवला. पर्कशन म्हणजे आघात. या पद्धतीत थोडेसे मक्र्युरी फल्मिनेट (पाऱ्याचे स्फोटक क्षार) धातूच्या एका लहानशा टोपीसारख्या (कॅप) दिसणाऱ्या भागात भरलेले असे. ती कॅप प्लगवर उलटी ठेवली जात असे. बंदुकीचा ट्रिगर दाबल्यानंतर हॅमर खाली येऊन कॅपच्या डोक्यावर आदळत असे. या आघाताने (पर्कशन) कॅपमधील मक्र्युरी फल्मिनेटचा स्फोट होत असे. त्यातून तयार झालेल्या ठिणग्या प्लगमधून बंदुकीच्या नळीमधील मुख्य गनपावडपर्यंत पोहोचून त्याचा स्फोट होत असे आणि त्याच्या जोराने गोळी बाहेर डागली जात असे. म्हणजेच पूर्वी गनपावडर पेटवण्यासाठी गारगोटीच्या (फ्लिंट) घर्षणातून ठिणग्या उत्पन्न केल्या जात होत्या. आता त्याऐवजी पर्कशन कॅपमधील स्फोटकातून ठिणग्या तयार होत होत्या.

पर्कशन कॅप किंवा लॉक पद्धत सर्व हवामानात खात्रीशीरपणे वापरता येत होती. तिने गनपावडर ताबडतोब आणि खात्रीने पेटत असे. मात्र कॅपमधील स्फोटक जर अधिक मात्रेने असेल तर कॅपचे तुकडे होऊन स्फोटाचा त्रास बंदूक चालवणाऱ्याला होत असे. त्यावरही लवकरच उपाय शोधण्यात आला. पर्कशन कॅपवर वरून आदळणारा हॅमर आतून थोडा पोकळ केला गेला. त्याने कॅप त्या पोकळीत बसत असे. त्यामुळे प्रायमरच्या स्फोटाच्या ठिणग्या बंदूक चालवणाऱ्याच्या डोळ्यात न उडता थेट फायरिंग चेंबपर्यंत पोहोचत असत. पुढे कॅपखालच्या प्लगमध्ये सुधारणा करून त्या जागी आतून पोकळ निपलसारखे भाग वापरात आले. त्यातूनही प्रायमरच्या ठिणग्या थेट गनपावडपर्यंत पोहोचत असत.

सचिन दिवाण sachin.diwan@ expressindia.com