08 March 2021

News Flash

मनोवैज्ञानिक युद्धतंत्र

‘नॉट द गन्स, नॉट द हँड्स, बट द माइंड्स बिहाईंड देम फाइट’

‘नॉट द गन्स, नॉट द हँड्स, बट द माइंड्स बिहाईंड देम फाइट’ (शस्त्रे किंवा ती धारण करणारे हात नव्हेत, तर त्यामागची मने लढत असतात), असे म्हटले जाते. त्यामुळे युद्ध जिंकण्यासाठी शत्रूशी प्रत्यक्ष लढण्याला जितके महत्त्व आहे तितकेच त्याचे मनोबल खच्ची करून त्याची लढण्याची इच्छा मारणे, यालाही महत्त्व आहे. त्यासाठी मनोवैज्ञानिक युद्धतंत्र (सायकोलॉजिकल वॉरफेअर किंवा सायवॉर) हा प्रकार वापरला जातो.

मनोवैज्ञानिक युद्धात प्रत्यक्ष युद्ध आणि आर्थिक दबाव यांच्यासह प्रचारतंत्र वापरले जाते. त्यातून शत्रूच्या सैनिकांवर आणि जनतेवर मानसिक दबाव आणला जातो. शत्रूसैनिकांना शरण येण्याचे आवाहन केले जाते. त्यांचे सरकार किंवा शासनयंत्रणा कशी कुचकामी किंवा जुलुमी असून तिची साथ देणे कसे गैर आहे, हे त्यांच्या मनावर ठसवण्याचे प्रयत्न केले जातात. युद्धात कैद केलेल्या शत्रूसैनिकांच्या मनावर अशा बाबी ठसवून त्यांचे मतपरिवर्तन केले जाते. या अपप्रचाराचा शत्रूच्या कामगारांवर परिणाम होऊन त्यातून औद्योगिक उत्पादन कमी होण्यास मदत होते.

युद्धाचे हे तंत्र अगदी प्राचीन काळापासून वापरले जात आहे. सायरस द ग्रेट याने बॅबिलॉनविरुद्ध, झेझ्रेसने ग्रीकांविरुद्ध तर मॅसिडॉनचा दुसरा फिलिप याने अथेन्सविरुद्ध असे मनोवैज्ञानिक युद्धतंत्र वापरले होते. चेंगिझ खानदेखील त्याच्या सैन्यात मोठय़ा प्रमाणात मंगोल घोडेस्वार असल्याच्या अफवा उठवून विजय सुकर करत असे. अमेरिकी यादवी युद्ध, दोन्ही महायुद्धे, कोरिया आणि व्हिएतनाममधील युद्धे यात मनोवैज्ञानिक युद्धतंत्र मोठय़ा प्रमाणावर वापरले गेले. चीनचा माओ-त्से-तुंग, क्युबाचे नेते फिडेल कॅस्ट्रो आणि व्हिएतनामचे नेते हो-ची-मिन्ह अशा साम्यवादी शासकांकडूनही त्याचा खुबीने वापर करण्यात आला. शीतयुद्धाच्या काळात अमेरिकी आणि सोव्हिएत युनियनमध्ये अशा प्रकारचे युद्ध जोरात सुरू होते.

आधुनिक काळात तंत्रज्ञानाच्या आणि संपर्कव्यवस्थेच्या प्रगतीनंतर मनोवैज्ञानिक युद्धाच्या अनेक पद्धती विकसित झाल्या. मानसिक युद्धाचे हे तंत्र अधिक व्यावसायिक पद्धतीने वापरले जाऊ लागले. रशियन राज्यक्रांतीदरम्यान लिआँ ट्रॉटस्की आणि नाझी राजवटीत गोबेल्स यांनी हे तंत्र प्रभावीपणे वापरले. यात पत्रके, जाहिराती, वर्तमानपत्रे, रेडिओ, टेलिव्हिजन, पुस्तके अशा साधनांचा वापर केला जातो. आता त्यात फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सअ‍ॅप, यूटय़ूब अशा समाजमाध्यमांची भर पडली आहे. नागरिकांवर सतत एकाच विचारांचा मारा करून हळूहळू खोटय़ा गोष्टीही खऱ्या वाटू लागतात. त्यांच्या वर्तनात अपेक्षित बदल घडू लागतात. याचा एखाद्या देशातील राज्यव्यवस्था उलथून टाकण्यासाठी वापर करता येऊ शकतो. ‘अरब स्प्रिंग’ नावाने ओळखल्या गेलेल्या २०१० सालानंतर टय़ुनिशिया, इजिप्त आदी देशांतील जनआंदोलनांमागे अशा प्रकारचे मनोवैज्ञानिक युद्धतंत्र मोठय़ा प्रमाणावर कार्यरत होते. आता अमेरिकेसह अनेक देश सायबर आणि इलेक्ट्रॉनिक युद्धाची साधने वापरून शत्रूच्या माहिती-प्रसारण व्यवस्थेवर हल्ला करण्याच्या योजना बनवत आहेत. त्यातून प्रत्यक्ष युद्धातील विजयाचा मार्ग सुकर केला जाईल.

सचिन दिवाण

sachin.diwan@expressindia.com

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 27, 2018 12:49 am

Web Title: psychological warfare
Next Stories
1 हवामानाचा शस्त्रासारखा वापर
2 नॉन-लिथल वेपन्स
3 सायबर युद्ध
Just Now!
X