News Flash

गाथा शस्त्रांची : अफगाणिस्तान युद्धातील सोव्हिएत एमआय-२४ हिन्द

मजबूत बांधणी आणि परिणामकारकता ही सोव्हिएत शस्त्रास्त्रांची वैशिष्टय़े एमआय-२४ मध्येही पाहायला मिळतात.

सोव्हिएत एमआय-२४ हिन्द

सचिन दिवाण

अमेरिकेने व्हिएतनाम युद्धात हस्तक्षेप करून जसे हात पोळून घेतले तशीच गत १९७९ ते १९८९ या दशकात सोव्हिएत युनियनची अफगाणिस्तानमध्ये झाली. अफगाणिस्तानच्या उजाड, डोंगराळ प्रदेशात सोव्हिएत फौजांनी रणगाडे आणि चिलखती वाहने वापरून पाहिली. पण तेथील भौगोलिक परिस्थिती रणगाडय़ांच्या वापरास अनुकूल नव्हती. मुजाहिद्दीन गनिमी योद्धय़ांनी ‘आरपीजी’च्या (रॉकेट प्रोपेल्ड ग्रेनेड लाँचर) मदतीने रणगाडय़ांना रोखले. त्यानंतर सोव्हिएत सैन्याची भिस्त प्रामुख्याने मिल एमआय-८ ही वाहतूक हेलिकॉप्टर आणि एमआय-२४ या लढाऊ हेलिकॉप्टरवर होती. मात्र मुजाहिद्दीनांनी स्ट्रेला आणि स्टिंगर क्षेपणास्त्रे मिळवल्यानंतर पारडे सोव्हिएत फौजांच्या विरोधात झुकत गेले.

एमआय-२४ हेलिकॉप्टर हे जगातील एक उत्तम लढाऊ हेलिकॉप्टर असून त्याला ‘नाटो’ संघटनेने ‘हिंद’ असे नाव दिले होते, तर त्याची निर्यातीसाठीची आवृत्ती एमआय-३५ म्हणून ओळखली जाते. भारतासह सोव्हिएत प्रभावाखालील सुमारे ५० देशांत हे हेलिकॉप्टर वापरले जाते. विविध देशांच्या सैनिकांनी त्याला फ्लाइंग टँक (उडता रणगाडा), क्रोकोडाइल (त्यावरील कॅमोफ्लाज रंगसंगतीमुळे), ग्लास (काचेच्या डबल बबल-शेप्ड  कॉकपिट कॅनॉपीमुळे) अशी नावे बहाल केली होती. भारतीय हवाईदलाच्या पठाणकोट येथील तळावर एमआय-३५ तैनात असून तेथील दहशतवादी हल्ल्यावेळी त्यांच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला होता.

सोव्हिएत तंत्रज्ञ आणि डिझायनर मिखाईल मिल यांच्या नेतृत्वाखाली १९४७ साली हेलिकॉप्टर उत्पादन कंपनी स्थापन झाली. त्यांची एमआय मालिकेतील अनेक हेलिकॉप्टर गाजली. १९६०च्या दशकात सोव्हिएत युनियनला लढाऊ आणि वाहतूक अशा एकत्रित भूमिकेत वापरण्यासाठी हेलिकॉप्टरची गरज होती. त्यातून एमआय-२४ची निर्मिती झाली. त्याचे पहिले उड्डाण १९६९ साली झाले आणि १९७०च्या दशकात एम-२४ सोव्हिएत हवाईदालत दाखल झाले.

मजबूत बांधणी आणि परिणामकारकता ही सोव्हिएत शस्त्रास्त्रांची वैशिष्टय़े एमआय-२४ मध्येही पाहायला मिळतात. त्याच्या बांधणीत टायटॅनियमच्या मिश्रधातूंचा वापर केला आहे. हेलिकॉप्टरवर खास चिलखती आवरण आहे. ते अर्धा इंच व्यासाच्या मशीनगनच्या गोळ्या थोपवू शकते. कॉकपिटची काच  शत्रूच्या ३७ मिमी व्यासाच्या कॅननचा मारा सहन करू शकते. त्याची दोन इसोतोव्ह टीव्ही-३-११७ टबरेशाफ्ट इंजिने त्याला ताशी ३३५ किमीचा वेग आणि ७५० किमीचा पल्ला मिळवून देतात. त्यावर १२.७ मिमी व्यासाची मशीनगन, २३ मिमीची कॅनन, रॉकेट आणि ग्रेनेड लाँचर आणि रणगाडाभेदी क्षेपणास्त्रे बसवता येतात. तसेच ते आठ सैनिकांना त्यांच्या शस्त्रास्त्रांसह वाहून नेऊ शकते.  अफगाणिस्तानसह सिएरा लिओन, आयव्हरी कोस्ट, लिबिया आदी संघर्षांत ती वापरली गेली.

sachin.diwan@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 18, 2018 1:51 am

Web Title: soviet mi 24 hind in afghanistan war
Next Stories
1 सोव्हिएत एमआय-८ आणि एमआय-१७
2 व्हिएतनाममधील टेहळणी, वाहतूक हेलिकॉप्टर
3 अमेरिकेचे बेल एएच-१ कोब्रा लढाऊ हेलिकॉप्टर
Just Now!
X