21 April 2019

News Flash

गाथा शस्त्रांची : वेग : ताशी ३६०० किमी फक्त!

अमेरिका १९६० च्या दशकात बी-७० वाल्किरी या अतिवेगवान बॉम्बर विमानाची निर्मिती करत होती.

सोव्हिएत युनियनचे मिग-२५ ‘फॉक्सबॅट’ अमेरिकेचे एसआर-७१ ब्लॅकबर्ड

अमेरिका १९६० च्या दशकात बी-७० वाल्किरी या अतिवेगवान बॉम्बर विमानाची निर्मिती करत होती. त्याला टक्कर देण्यासाठी रशियाने मिग-२५ ची निर्मिती केली. बी-७० प्रकल्प पुढे बारगळला. पण त्याने मिग-२५ च्या विकासाला चालना दिली. आपल्या प्रदेशात घुसलेल्या शत्रूच्या विमानांबद्दल रडार केंद्रावरून सूचना मिळताच हवेत झेपावून अल्पावधीत प्रचंड वेगाने उंची गाठून त्यांना पाडणे या कामासाठी मिग-२५ ची रचना झाली होती.

हे अतिउंचावरील इंटरसेप्टर विमान होते. ‘नाटो’ संघटनेने त्याला ‘फॉक्सबॅट’ असे नाव दिले. जगातील सर्वात वेगवान विमानांमध्ये त्याची गणती होते. ते ध्वनीच्या वेगाच्या तिप्पट वेगाने, म्हणजे ताशी ३२०० किमी इतक्या वेगाने प्रवास करू शकत असे. एका मिनिटात १५,२४० मीटर (५०,००० फुट) इतक्या वेगाने ते हवेत अधिकाधिक २४,३८५ मीटर (८०,००० फूट) इतकी उंची गाठत असे. त्याची शक्तिशाली तुमान्स्की आर-३१ टबरेजेट इंजिने ११,००० किलो थ्रस्ट उत्पन्न करत असत. त्याचा पल्ला ११२५ किमी होता आणि त्यावर एए-६ अक्रिड, एए-७ अपेक्स किंवा एए-८ अफिड ही हवेतून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रे होती.

भारतीय हवाईदलाकडेही ६ मिग-२५ विमाने होती. त्यांच्या उंची आणि वेग गाठण्याच्या क्षमतेमुळे ती उत्तम हेरगिरी विमाने म्हणून वापरात आली. प्रचंड वेगामुळे मिग-२५ चा तळ देशात बराच आत म्हणजे बरेली येथे ठेवला होता. एकदा भारतीय मिग-२५ विमानांच्या वैमानिकांनी पाकिस्तानवर जाणूनबुजून ध्वनीच्या वेगाची मर्यादा पार करून मोठा आवाज घडवला. पाकिस्तानकडे पाठलागासाठी इतकी वेगवान विमाने नाहीत हे माहीत असल्याने भारतीय वैमानिक त्यांना खिजवून सहज परतले होते. असेच खोडकर उद्योग रशियन मिग-२५ विमानांनी इजिप्तमधून इस्रायलवर हेरगिरी करताना केले होते.

अमेरिकेचे एसआर-७१ ब्लॅकबर्ड हेदेखील ध्वनीच्या तिप्पट (ताशी ३६२० किमी) वेगाने अधिकाधिक ३०,००० मीटर (१ लाख फूट) उंचीवरून हेरगिरी करण्यासाठी बनवले होते. त्यासाठी त्याची रचना आणि आकार बराच वेगळा होता. वेग, हवेचा दाब आणि उष्णता सहन करण्यासाठी त्यात टायटॅनियम धातूचा वापर केला होता. हवेत लपून राहण्यासाठी त्यावर शत्रूच्या रडारच्या लहरी शोषून घेणारा विशिष्ट काळा रंग होता. त्यावरून त्याला ब्लॅकबर्ड नाव मिळाले. हवाई छायाचित्रणासाठी त्यावर अत्याधुनिक कॅमेरे आणि संवेदक (सेन्सर) होते.

sachin.diwan@expressindia.com

 

First Published on August 18, 2018 4:10 am

Web Title: the fastest plane on planet earth