प्राचीन काळापासून घोडा या दिमाखदार, ईमानी, वेगवान आणि ताकदवान प्राण्याने माणसाची युद्धात साथसंगत केली आहे. सैनिकांना स्वार होण्यासाठी, वेगाने हालचाली आणि वाहतूक करण्यासाठी, रसद आणि युद्धसामग्री वाहून नेण्यासाठी अशा अनेक कामांसाठी घोडय़ांचा प्रभावी वापर होत होता. पण मशिनगन आणि तोफांच्या युगात त्यांची उपयुक्तता संपुष्टात आली. घोडय़ांना आधुनिक पर्याय म्हणून प्रथम मोटरसायकल वापरात आली. तिच्याही काही मर्यादा होत्या. त्यामुळे आधुनिक रणभूमीवर घोडय़ाची सर्व कामे करू शकेल अशा यंत्राचा शोध सुरू होता. त्यातूनच जीप हे दणदणीत आणि बहुउद्देशीय वाहन साकारले.

जून १९४० मध्ये अमेरिकी ऑर्डनन्स डिपार्टमेंटचे चीफ इंजिनिअर विल्यम बिसले यांनी अशा वाहनाचे कच्चे कल्पनाचित्र तयार केले होते. त्यानंतर अमेरिकेच्या सैन्याने तसे वाहन विकसित करण्यासाठी मानके जाहीर करून १३५ मोटार कंपन्यांकडून प्रस्ताव मागवले. पण त्याला दोनच कंपन्यांनी प्रतिसाद दिला – अमेरिकन बँटम आणि विलीज ओव्हरलँड. सैन्याने नव्या वाहनासाठी खूप कठोर निकष लावले होते आणि चाचण्यांसाठी पहिले प्रारूप (प्रोटोटाइप) सादर करण्यासाठी केवळ ४९ दिवसांची मदत दिली होती. त्यावेळी अमेरिकन बँटम कंपनी डबघाईला आली होती आणि कंपनीकडे केवळ १५ कर्मचारी होते. त्यातील एकही इजिनिअर नव्हता. पण कंपनीला नशीब काढण्यासाठी ही संधी दिसत होती. त्यांनी डेट्रॉइटहून कार्ल प्रोब्स्ट या कुशल इंजिनिअरची नेमणूक केली आणि अहोरात्र झटून काम केले. अखेरच्या दिवशी सायंकाळी पाच वाजता मुदत संपणार होती. त्याच्या केवळ अर्धा तास आधी बँटम कंपनीने त्यांचे प्रारूप सैन्याला सादर केले. सैन्याने त्याच्या कसून चाचण्या घेतल्या आणि ते वाहन त्यांच्या पसंतीस उतरले.

हे प्रारूप विलीज ओव्हरलँड आणि नंतर स्पर्धेत उतरलेल्या फोर्ड मोटर कंपनीला पाहायला मिळाले होते. त्यांनीही तशाच स्वरूपाची प्रारूपे सादर केली. सैन्याचा निवड करताना गोंधळ उडाला आणि त्यांनी सुरुवातीला काही वाहने तयार करण्याचे कंत्राट तिन्ही कंपन्यांना वाटून दिले. नंतर मात्र उत्पादन क्षमता अधिक असल्याने आणि युद्धाची गरज ओळखून विलीज आणि फोर्डला मोठय़ा ऑर्डर मिळाल्या. १९४० ते १९४५ दरम्यान ६ लाख ४० हजार जीपचे उत्पादन झाले आणि सर्व मित्रदेशांनी त्या वापरल्या. दुसरे महायुद्ध जिंकून देणाऱ्या तीन प्रमुख साधनांमध्ये जीपचा समावेश केला जातो.

जीपच्या नावाचा किस्साही मजेदार आहे. त्या काळात अमेरिकी व्यंगचित्रकार ई. सी. सेगर यांच्या ‘थिंबल थिएटर’ आणि ‘पॉपेय द सेलर’ या कॉमिक स्ट्रिप्समध्ये ‘युजीन द जीप’ नावाचे एक पात्र होते. या विचित्र प्राण्याला अतिमानवी शक्ती प्राप्त होत्या. तो कुठूनही प्रवास करू शकत असे. त्यावरून सैनिकांनी या वाहनाला ‘जीप’ असे नाव दिले होते. विलीज कंपनीने १९४१ साली अमेरिकी ‘कॅपिटोल’ (संसद) इमारतीच्या पायऱ्यांवरून वर-खाली जीप चालवण्याचे प्रात्यक्षिक दाखवले होते. त्यावेळी जीप चालक आयर्विग हाउजमान यांना पत्रकार कॅथरीन हिलीयर यांनी विचारले की, हे कोणते वाहन आहे. त्यावर चालकाने ‘जीप’ असे उत्तर दिले. त्याने फोर्ड होलाबर्ड येथे सैनिकांकडून या वाहनाचा उल्लेख ‘जीप’ असा करताना ऐकले होते. त्यावर हिलीयर यांनी ‘वॉशिंग्टन डेली न्यूज’ वर्तमानपत्रात लेख लिहिला. त्यात या वाहनाचा उल्लेख जीप असा केला होता. त्यावरून जीप हे नाव प्रचलित झाले.

sachin.diwan@ expressindia.com