सचिन दिवाण sachin.diwan@ expressindia.com

काही लढाया ओळखल्या जातात त्या विशिष्ट शस्त्रांसाठी. १९९१ सालचे आखाती युद्ध (ऑपरेशन डेझर्ट स्टॉर्म) ‘स्कड’ आणि ‘पॅट्रियट’ क्षेपणास्त्रांची जुगलबंदी आणि हवा तसा मार्ग बदलणारे ‘टॉमहॉक’ क्रूझ क्षेपणास्त्र यांच्यासाठी स्मरणात राहिले आहे. हे युद्ध म्हणजे २१ व्या शतकातील ‘स्पेस एज’ तंत्रज्ञानाच्या रणांगणावरील आगमनाची नांदी होती आणि ‘टॉमहॉक’ क्रूझ क्षेपणास्त्र हे त्या नाटय़ातील नायकाच्या भूमिकेत होते.

टॉमहॉक म्हणजे अमेरिकेतील अ‍ॅपाचे इंडियन आदिवासींकडून वापरली जाणारी एक कुऱ्हाड. क्षेपणास्त्राने हे नाव जरी जुन्या काळातील उचलले असले तरी प्रत्यक्षात ते अत्याधुनिक संगणक, संरक्षण आणि अंतराळ  तंत्रज्ञानाच्या मिलाफाचे उत्तम उदाहरण आहे. आण्विक किंवा पारंपरिक स्फोटकांनिशी ते साधारण १५०० ते २५०० कि.मी. अंतरावरील लक्ष्याचा अचूक भेद करू शकते. आजवरचे हे सर्वाधिक अचूक क्षेपणास्त्र आहे. क्षेपणास्त्राची अचूकता किंवा नेम चुकण्याची शक्यता मोजण्यासाठी ‘सक्र्युलर एरर प्रॉबेबिलिटी’ (सीईपी) हे एकक वापरतात. जर्मनीने दुसऱ्या महायुद्धात वापरलेल्या ‘व्ही-१’ या जगातील पहिल्या क्षेपणास्त्राची ‘सीईपी’ १७ किमी होती. टॉमहॉकच्या बाबतीत ती केवळ ६.२५ मीटर म्हणजे २० ते ३० फूट आहे.

इतकी अचूकता साधण्यासाठी वापरलेले तंत्रज्ञानही तितकेच उच्च प्रतीचे आहे. टॉमहॉकची सर्व यंत्रणा संगणकीकृत आहे. क्षेपणास्त्रात बसवलेली मायक्रोप्रोसेसर चिप सर्व प्रक्रिया हाताळते. त्यात क्षेपणास्त्राच्या मार्गाचा नकाशा ‘फीड’ केलेला असतो. त्याला दिशादर्शनासाठी कृत्रिम उपग्रहांवर आधारित ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम (जीपीएस) यंत्रणा मदत करते. टॉमहॉकच्या अखेरच्या टप्प्यात ‘टेरकॉम’ (टेरेन कंटूर मॅचिंग) नावाची यंत्रणा त्याला दिशादर्शन करते. त्यामध्ये क्षेपणास्त्राचा मार्ग जमिनीवरून विशिष्ट उंची ठरवून देऊन आखता येतो. तसेच क्षेपणास्त्र वाटेत येणाऱ्या टेकडय़ा, डोंगरदऱ्या आदी खुणांपासून किंवा ऐन वेळी नियंत्रण कक्षाने केलेल्या सूचनांप्रमाणे मार्ग बदलत प्रवास करू शकते. क्षेपणास्त्र डागल्यापासून लक्ष्यावर धडकेपर्यंतच्या प्रवासातील ध्वनिचित्रफीत नियंत्रण कक्षाला पाठवत असते. १९९१ साली युद्धाचे वार्ताकन करणाऱ्या एका पत्रकाराने टॉमहॉक क्षेपणास्त्र तो थांबलेल्या हॉटेलला वळसा घालून जाताना पाहिल्याचा किस्सा सांगितला आहे. क्रूझ क्षेपणास्त्र जमिनीजवळून ग्लायडरसारखी प्रवास करतात. त्यामुळे ती शत्रूच्या रडारवर दिसण्याची शक्यता कमी असते. आधुनिक युद्धात शत्रूची रडार यंत्रणा आणि हवाई संरक्षण प्रणाली पहिल्या हल्ल्यात निकामी करून शत्रूला आंधळे व अपंग बनवून पुढील युद्ध करणे हे तंत्र सर्वमान्य होत आहे. हे काम टॉमहॉक क्रूझ क्षेपणास्त्रांनी नेमके पार पाडले होते. एक प्रकारे पुढील युद्धांची दिशाच त्यातून ठरली होती.

रशियाचे पी-८०० ओनिक्स हे युद्धनौकाविरोधी अत्याधुनिक क्रूझ क्षेपणास्त्र आहे. त्याचा पल्ला ६०० किमी असून ते रॅमजेट तंत्रज्ञानावर आधारित आहे. भारत आणि रशियाने संयुक्तरीत्या विकसित केलेल्या ब्रह्मोस क्षेपणास्त्रासाठी ओनिक्स हे क्षेपणास्त्र पाया म्हणून वापरले आहे. जर्मनीचे टॉरस, तुर्कस्तानचे सोम, पाकिस्तानचे बाबर हीदेखील आधुनिक क्रूझ क्षेपणास्त्रे आहेत. क्रूझ क्षेपणास्त्रे ध्वनीपेक्षा कमी (सबसॉनिक) किंवा ध्वनीपेक्षा अधिक (सुपरसॉनिक) वेगाने प्रवास करतात. आता काही क्रूझ क्षेपणास्त्रे हायपरसॉनिक वेगाने (ध्वनीच्या पाचपटपेक्षा अधिक वेग) प्रवास करतात. आधुनिक युद्धात त्यांचे महत्त्व वाढतच जाणार आहे.