अमेरिकी सैन्याची १९६० आणि १९७० च्या दशकात व्हिएतनाम युद्धात विषुववृत्तीय सदाहरित जंगलांमध्ये सैनिक आणि युद्धसामग्री वाहून नेण्यासाठी मुख्य भिस्त होती ती हेलिकॉप्टरवर. मात्र उड्डाण घेताना आणि जमिनीवर उतरताना हेलिकॉप्टरने वेग कमी केला की शत्रू असॉल्ट रायफल, मशीनगन किंवा रॉकेट लाँचरने हेलिकॉप्टरवर सहज मारा करू शकत असे आणि हेलिकॉप्टरचा कमी जाडीचा पत्रा त्या माऱ्यापुढे तग धरत नसे. त्यामुळे हेलिकॉप्टरलाही मारक क्षमता प्रदान करणे गरजेचे होते.

तत्पूर्वी अमेरिकी सैन्याकडे जनरल इलेक्ट्रिक या कंपनीने तयार केलेल्या २० मिमी व्यासाच्या एम ६१ व्हल्कन नावाच्या मोठय़ा मशीनगन उपलब्ध होत्या. त्यांची थोडी लहान आकाराची, ७.६२ मिमी व्यासाच्या गोळ्या झाडू शकणारी एम १३४ ही आवृत्ती १९६३ साली विकसित करण्यात आली. मूळ व्हल्कन मशीनगनपेक्षा ती आकाराने लहान होती म्हणून तिला मिनीगन म्हटले जाऊ लागले. त्यानंतर अमेरिकेच्या ह्य़ूज ओएच-६ केयूज, बेल ओएच-५८ किओवा, बेल एएच-१ कोब्रा आणि बेल यूएच-१ इरोक्विस या हेलिकॉप्टरवर बसवलेल्या मिनीगन व्हिएतनामची जंगले पिंजून काढून साम्यवादी गनिमांना टिपू लागल्या. हेलिकॉप्टरच्या दरवाजातून खाली मशीनगनच्या फैरी झाडणारा ‘डोअर गनर’ अनेक चित्रपटांत गाजू लागला.

मिनीगन १९६० च्या दशकात तयार झाली असली तरी ती ज्या संकल्पनेवर आधारित होती ती शतकभरापूर्वी १८६० च्या दशकात गॅटलिंग गनच्या रूपात अस्तित्वात आली होती. रिचर्ड गॅटलिंग यांनी त्यांच्या अनेक बॅरल्सच्या मशीनगनला हाताऐवजी इलेक्ट्रिक मोटरच्या मदतीने चालवण्याचाही प्रयत्न केला होता. तशी गॅटलिंग गन तात्त्विकदृष्टय़ा मिनिटाला ३००० गोळ्या झाडू शकत असे. पण प्रत्यक्षात मशीनगनला ती क्षमता प्राप्त झाली, ती शंभर वर्षांनंतर मिनीगनच्या रूपात. इलेक्ट्रिक मोटरवर चालणारी मिनीगन एका मिनिटात २००० ते ६००० इतक्या वेगाने गोळ्यांचा वर्षांव करू शकते. तिला एकूण सहा नळ्या (बॅरल) आहेत. त्यातून एकामागून एक गोळ्या बाहेर पडतात. त्यामुळे एका बॅरलला पुन्हा गोळी झाडण्यापूर्वी थंड होण्यास काही अवधी मिळतो. त्याचा फायदा एकत्रित सलग गोळीबार करण्यास होतो.

मिनीगनच्या लष्कर, हवाई दल आणि नौदलासाठीच्या आवृत्ती विकसित झाल्या. युद्धनौकांवर शत्रूची विमाने किंवा क्षेपणास्त्रे पाडण्यासाठीही त्यांचा वापर होतो. मिनीगनच्या रूपात सैनिकांच्या हाती तुफान मारक क्षमता आली आहे. बंदुकांच्या आजवरच्या विकासक्रमातील तो सर्वोच्च बिंदू आहे. त्या दृष्टीने मिनीगन हे अद्वितीय शस्त्र आहे.

sachin.diwan@expressindia.com