सतराव्या-अठराव्या शतकात एकाच डेकवर तोफा बसवलेल्या वेगवान युद्धनौकांना फ्रिगेट म्हटले जात असे. मात्र एकोणिसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत (१८५० च्या दरम्यान)  तसे म्हणणे बंद झाले, कारण त्यावेळी सर्वच प्रकारच्या नव्या युद्धनौका तशाच प्रकारे बांधल्या जाऊ लागल्या. त्यात ग्लुअ, वॉरियर आदी नौकांचा समावेश होता. त्यातून फ्रिगेटची कामे करणाऱ्या नव्या प्रकारच्या नौकांचा उदय झाला. मुख्य ताफ्याच्या पुढे जाऊन टेहळणी  करणे (स्काऊटिंग अँड फ्लिट रेकोनेसन्स), आपल्या देशाच्या व्यापारी जहाजांचे रक्षण करणे शत्रूच्या व्यापारी जहाजांवर धाडी टाकणे (कॉमर्स प्रोटेक्शन अँड रेडिंग) अशी  या नव्या नौकांची प्रमुख कामे होती. त्या शक्यतो मुख्य युद्धनौकांपेक्षा (बॅटलशिप) आकाराने लहान असत. प्रत्येक वेळी तसे असेलच असे नाही. मात्र या नौका खूप वेगवान असत. त्यामुळे त्यांना क्रुझर असे नाव मिळाले.

लवकरच क्रुझर नौकांचे तीन उपप्रकार अस्तित्वात आले. सर्वात मोठय़ा क्रुझरना आर्मर्ड किंवा बॅटल क्रुझर म्हटले जात असे. त्यांचा आकार साधारण मुख्य युद्धनौकेइतकाच असे. त्यावर बरेच जाडजूड चिलखती आवरण असे आणि त्यांच्यावरील तोफाही मोठय़ा असत. नंतर त्या इतक्या मोठय़ा बनत गेल्या की १९०१ सालची ब्रिटिश क्रुझर लेव्हिअ‍ॅथन ही मुख्य युद्धनौकांपेक्षा लांबीला अधिक होती. सर्वात लहान आकाराच्या क्रुझरना चिलखती आवरण शक्यतो नसे. त्यांना लाइट क्रुझर म्हटले जात असे. त्या किनाऱ्याजवळच्या कारवायांसाठी, बंदरे आणि वसाहतींच्या रक्षणसाठी वापरल्या जात. मध्यम आकाराच्या क्रुझरना प्रोटेक्टेड क्रुझर म्हटले जात असे. त्यांना माफक प्रमाणात चिलखती संरक्षण पुरवलेले असे. त्यांच्यावरील कोळशाच्या कोठारांची रचना अशा प्रकारे केलेली असे की त्यानेच या नौकांना शत्रूच्या तोफगोळ्यांपासून संरक्षण मिळेल.

लवकरच लाइट क्रुझर या सर्वात जास्त वापरल्या जाणाऱ्या क्रुझर नौका बनल्या. त्या बांधणीला सोप्या आणि स्वस्त होत्या. सर्वात वेगवान होत्या. जर्मनीची १९१४ साली बांधलेली रिगेन्सबर्ग ही लाइट क्रुझर साधारण ५ टन वजनाची आणि ताशी २० नॉट्स वेगाने जाणारी होती. तिने पहिल्या महायुद्धात चांगली कामगिरी केली. अमेरिकेची ऑलिम्पिया ही मध्यम आकाराची प्रोटेक्टेड क्रुझर होती. तिने १८९८ सालच्या मनिला उपसागराच्या लढाईत अ‍ॅडमिरल डय़ुय यांची ध्वजनौका (फ्लॅगशिप) म्हणून काम केले. ब्रिटनची लेव्हिअ‍ॅथन ही आर्मर्ड क्रुझर १४ टन वजनी होती. तिच्यावर ९०० खलाशी आणि सैनिक मावत. त्यावर विविध आकाराच्या ३५ तोफा आणि २ टॉर्पेडो टय़ूब्ज होत्या. तरीही तिचा वेग ताशी २३ नॉट्स इतका होता.

sachin.diwan@ expressindia.com