युद्धनौका जशा लोखंडी आवरणामुळे अधिक मजबूत बनत गेल्या तसे त्यांना नष्ट करण्याचे मार्गही अधिक विध्वंसक बनत गेले. एकोणिसाव्या शतकाच्या मध्यास (म्हणजे १८५०च्या आसपास) समुद्रसुरुंगांचा वापर वाढला होता. क्रिमियन युद्धात त्याचे प्रत्यंतर आले होते. त्याच्या बरोबरीने अन्य साधनेही वापरली जात होती. त्यात टॉर्पेडो किंवा पाणतीराचा प्रामुख्याने समावेश होता.

त्यावेळी टॉर्पेडो हा शब्द आतासारखा पाणतीरासाठी वापरला जात नव्हता. अनेक प्रकारच्या पाणसुरुंगांना मिळून टॉर्पेडो ही संज्ञा सामान्यपणे वापरली जात असे. पाण्याखाली स्वयंचलितपणे प्रवास करणारी कोणतीही स्फोटके टॉर्पेडो म्हणून ओळखली जात. त्या काळात स्पार टॉर्पेडो नावाचा प्रकार अस्तित्वात होता. त्यात  नौकेच्या टोकाला लांब खांबाला स्फोटके बसवलेली असत. ती शत्रूच्या नौकेवर नेऊन धडकवली जात. पण खऱ्या अर्थाने आधुनिक टॉर्पेडो तयार केला तो १८६६ साली रॉबर्ट व्हाइटहेड या ऑस्ट्रियात राहणाऱ्या ब्रिटिश तंत्रज्ञाने. त्यांनी तयार केलेला टॉर्पेडो व्हाइटहेड टॉर्पेडो म्हणून ओळखला गेला.  व्हाइटहेड यांचा टॉर्पेडो ४.८ मीटर (१६ फूट) लांब होता. त्याच्या पुढील निमुळत्या भागात ३४ किलोग्रॅम (७६ पौंड) स्फोटके भरलेली होती. त्यात प्रामुख्याने गनकॉटनचा समावेश होता. त्यांनी टॉर्पेडोचा प्रोपेलर चालवण्यासाठी कॉम्प्रेस्ड-एअर-इंजिनचा वापर केला. टोर्पेडोला पाण्यात अपेक्षित खोलीवर ठेवण्यासाठी क्षितिजसमांतर रडरला जोडलेल्या हायड्रोस्टॅटिक प्रेशर गेजचा वापर केला होता. त्याचा पल्ला ३०० मीटर किंवा ९८० फूट इतकाच होता.

युद्धनौकेच्या पुढील किंवा बाजूच्या भागावर बसवलेल्या विशेष नळ्यांमधून (टॉर्पेडो टय़ूब) टॉर्पेडो डागला जात असे. तो पाण्यात पडून ठरावीक खोलीवरून शत्रूच्या नौकेवर जाऊन धडकत असे. त्याने त्याच्या पुढील भागातील स्फोटकांचा स्फोट होऊन नौका नष्ट होत असे. १८८०च्या दशकात ब्रिटनमध्ये ब्रेनन टॉर्पेडो वापरात होता. त्याला किनाऱ्यावरून पाण्यात डागले जात असे आणि त्याला जोडलेल्या तारांनी नियंत्रित केले जात असे. ऑस्ट्रियन तंत्रज्ञ लुडविग ऑब्री यांनी १८९६ साली व्हाइटहेड टॉर्पेडोवर गायरोस्कोप बसवला. त्याने टॉर्पेडो पाण्यात सरळ रेषेत प्रवास करण्यास व त्याचा पल्ला वाढवण्यास मदत झाली.

सुरुवातीला टॉर्पेडो हे कमी पल्ल्याचे आणि शत्रूच्या युद्धनौकांपासून बंदराचे आणि तेथे नांगरलेल्या नौकांचे रक्षण करण्यासाठी वापरले जात. पुढे त्यांची शक्ती आणि पल्ला वाढल्यानंतर ते खोल समुद्रातील युद्धातही वापरले जाऊ लागले. टॉर्पेडोच्या रूपाने सागरी युद्धात एका विध्वंसक शस्त्राचा उदय झाला होता.

sachin.diwan@ expressindia.com