गॅली नंतरच्या काळात गॅलिऑन या प्रकराच्या जहाजांचा वापर वाढल्याचे दिसून येते. ही अनेक मजले असलेली आणि ३ ते ५ शिडे असलेली वाऱ्याच्या जोरावर चालणारी जहाजे होती. १६ व्या शतकात अमेरिकी वसाहतींमधील सोने युरोपमध्ये आणण्यासाठी स्पेनच्या नौदलाने गॅलिऑन या प्रकारच्या जहाजांचाच वापर केला होता. १५८८ साली स्पॅनिश अर्माडा आणि सर फ्रान्सिस ड्रेक यांच्या नेतृत्वाखालील ब्रिटिश नौदल यांच्यात झालेल्या सुप्रसिद्ध युद्धात दोन्ही बाजूंच्या नौदलांत गॅलिऑनचचा भरणा होता. त्यातही ब्रिटिश वेगवान गॅलिऑननी स्पॅनिश अर्माडावर मात केली. त्यानंतर पुढील सुमारे २५० वर्षे स्क्वेअर-रिगिंग या प्रकरची शिडांची रचना असलेल्या गॅलिऑनचे नौदलांमध्ये वर्चस्व राहिले.

चीनमध्ये निओलिथिक काळापासून म्हणजे १०,००० ते ४००० वर्षे पूर्वीपासून नौदलाचा वापर होत होता. चीनमधील हान घराण्याच्या शासनकाळात टॉवर शिप किंवा फ्लोटिंग फोर्ट्र्रेस या प्रकारच्या युद्धनौका अस्तित्वात आल्या. या युद्धनौका अनेक मजल्यांच्या असत. त्यावर शोकडो सैनिक तैनात असत. त्यावर कॅटापुल्ट, ट्रेब्युशे आदी आयुधे बसवलेली असत.त्यातून शत्रूच्या नौकांवर मोठे दगड, पेटते गोळे आणि बाणांचा मारा केला जात असे. त्यांना शिडांची आणि वल्ह्य़ांची सोय असे. किन घराण्याचा शासक किन शी हुआंग याने चू राज्य जिंकून चिनी साम्राज्याच्या एकत्रीकरणाच्या वेळी टॉवर शिप्सचा पुरेपूर वापर केला होता.

ख्रिस्तपूर्व १५ व्या शतकात इजिप्तची सागरी शक्ती शिगेला पोहोचली होती. न्यू किंगडम नावाने ओळखल्या जाणाऱ्या काळात इजिप्शियन राणी हात्शेप्सुट हिने आफ्रिकेच्या पूर्व किनाऱ्यावर मोहिमा काढल्या. तसेच थॉटमस तिसरा याच्या काळात पूर्व भूमध्य समुद्रावर इजिप्तचे वर्चस्व स्थापन झाले. इजिप्शियन जहाजांची बांधणी मजबूत असे. शत्रूच्या माऱ्यापासून संरक्षणासाठी त्यांवर बरेच बुलवर्क केलेले असे.

सचिन दिवाण

sachin.diwan@expressindia.com