‘इन्सास’ आणि एक्सकॅलिबर रायफल्स 

तिला आजवर संमिश्र यश आणि प्रतिसाद मिळाला आहे.

भारतीय सैन्यदलांत वापरात असलेल्या ७.६२ मिमी व्यासाच्या एसएलआर रायफल १९८०च्या दशकापर्यंत जुन्या होऊन त्या बदलण्याची गरज निर्माण झाली होती. त्याला देशांतर्गत पर्याय तयार करण्याच्या प्रयत्नांतून १९९०च्या दशकात ‘इन्सास’(इंडियन स्मॉल आम्र्स सिस्टिम) नावाची स्वयंचलित बंदूक निर्माण झाली. तिला आजवर संमिश्र यश आणि प्रतिसाद मिळाला आहे.

‘इन्सास’ची रचना पुणे येथील आर्मामेंट रिसर्च अँड डेव्हलपमेंट एस्टाब्लिशमेंट (एआरडीई) या संस्थेने केली असून त्यांची निर्मिती ऑर्डनन्स फॅक्टरीज बोर्डाच्या तिरुचिरापल्ली, कानपूर आणि ईशापूर येथील कारखान्यांकडून केली जाते. ‘इन्सास’च्या असॉल्ट रायफल आणि लाइट मशिनगन (एलएमजी) अशा आवृत्ती उपलब्ध आहेत. त्यात ५.५६ मिमी व्यासाच्या आणि ४५ मिमी लांबीच्या गोळ्या वापरल्या जातात. या रायफलचा प्रभावी पल्ला (इफेक्टिव्ह रेंज) ४०० मीटर असून ती एका मिनिटाला ६०० ते ६५० या वेगाने गोळ्या झाडू शकते. तिच्या मॅगझिनमध्ये २० ते ३० गोळ्या मावतात. ‘इन्सास’च्या रचनेत जगातील अनेक प्रमुख रायफल्सचे गुणधर्म समाविष्ट केले आहेत. तिचे मूळ डिझाइन रशियन एके-४७ रायफलवर आधारित आहे. ‘इन्सास’चे लाँग स्ट्रोक पिस्टन आणि रोटेटिंग बोल्ट एके-४७ प्रमाणे आहेत. त्यातील मॅन्युअल गॅस रेग्युलेटर बेल्जियमच्या एफएन-एफएनएल रायफलप्रमाणे आहे. जर्मन हेक्लर अँड कॉख एचके-३३ रायफलप्रमाणे इन्सासचे चार्जिग हँडल डाव्या बाजूला आहे. इन्सासचे प्लास्टिकचे पारदर्शक मॅगझिन ऑस्ट्रियाच्या श्टायर-एयूजी रायफलसारखे आहे. तर तिचा पॉलिमरचा दस्ता (बट) आणि पुढील पकड (फोरहँड ग्रिप) इस्रायलच्या गलिल रायफलसारखी आहे.

इन्सास रायफल्स १९९८ साली भारतीय सेनादलांत वापरात आल्या. त्यासह नेपाळ, भूतान आणि ओमानच्या सैन्यानेही त्या स्वीकारल्या. नेपाळमधील माओवादी क्रांती, भारत-पाकिस्तानमधील १९९९ चे कारगिल युद्ध आणि भारतातील माओवादी संषर्घ यांत इन्सास रायफलचा वापर झाला. मात्र, नेपाळच्या आणि भारताच्या सैन्याने इन्सासच्या कामगिरीवर असमाधान व्यक्त केले.

इन्सास लढाईत ऐनवेळी जॅम होते, म्हणजे तिच्या गोळ्या बंदुकीत अडकून राहतात. तिच्या प्लास्टिकच्या मॅगझिनला तडे (क्रॅक्स) जातात. वापरावेळी इन्सासमधून गरम तेल बाहेर पडून (लिकेज) सैनिकांच्या डोळ्यांत उडते. या कारणांमुळे सैन्याने इन्सासला अद्याप खात्रीशीर रायफल म्हणून पूर्णपणे स्वीकारलेले नाही आणि इन्सासला पर्याय म्हणून नव्या परदेशी रायफलचा शोध सुरू केला आहे.   इन्सासवर आधारित अत्याधुनिक एक्सकॅलिबर नावाची असॉल्ट रायफल, कालांतक नावाची मायक्रो असॉल्ट रायफल आणि अमोघ नावाची कार्बाइन तयार करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यांचा पल्ला अनुक्रमे ४००, ३०० आणि २०० मीटर असेल. तसेच ऑर्डनन्स फॅक्टरी त्रिची येथे त्रिची असॉल्ट रायफल बनवली गेली आहे. यासह संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ) मल्टि-कॅलिबर इंडिविज्युअल वेपन सिस्टिम (एमसीआयडब्ल्यूएस) नावाची रायफल विकसित करत आहे. त्यात एकाच बंदुकीतून ५.५६, ६.८ आणि ७.६२ मिमी व्यासाच्या गोळ्या झाडण्याची सोय असेल. यातील एकाही रायफलला अद्याप पूर्ण यश लाभलेले नाही.

सचिन दिवाण

sachin.diwan@expressindia.com

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Excalibur rifle