पहिल्या महायुद्धातील पराभवानंतर व्हर्सायच्या तहानुसार जर्मनीच्या शस्त्रनिर्मितीवर अनेक र्निबध लादले गेले. पण तरीही त्यातून पळवाटा शोधून जर्मनीने छुप्या मार्गाने शस्त्रनिर्मिती सुरूच ठेवली. जर्मनीतील क्रुप उद्योगसमूहाचा शस्त्रास्त्रनिर्मितीत मोठा वाटा होता. युद्धोत्तर काळातील बंधनांमुळे जर्मनीत कामकाज चालवणे अवघड बनले होते. त्यातून मार्ग काढण्यासाठी क्रुप कंपनीने स्वीडनमधील बोफोर्स या शस्त्रनिर्मिती कंपनीशी संधान बांधले आणि स्वीडनमध्ये शस्त्रास्त्रांवरील संशोधन सुरू ठेवले.

त्यातूनच तयार झाली ७५ मिमी फ्लॅक तोफ. जर्मन सैन्याला त्याहून अधिक क्षमतेची तोफ हवी होती. मग तिच्यात सुधारणा करून ८८ मिमी व्यासाची फ्लॅक १८ ही तोफ आकारास आली. मुळात ही विमानवेधी तोफ होती.  तिचा ९.२ किलो वजनाचा गोळा ८२० मीटर प्रती सेकंद इतक्या वेगाने प्रवास करून ८००० मीटर (२६,२४५ फूट) इतक्या उंचीवरील विमाने पाडू शकत असे. तिचा १९३३ साली स्पेनमधील गृहयुद्धात काही प्रमाणात वापर झाला. फ्लॅक १८ तोफेच्या अखंड बॅरलऐवजी नंतर अनेक तुकडे जोडून तयार केलेले बॅरल बसवण्यात आले. त्यामुळे संपूर्ण बॅरल बदलण्याऐवजी बॅरलचा खराब झाला असेल तितकाच भाग बदलता येत असे. या मॉडेलला फ्लॅक ३६ असे नाव मिळाले. तिच्या फायर-कंट्रोल डेटा ट्रान्समिशन यंत्रणेत सुधारणा करून फ्लॅक ३७ ही आवृत्ती तयार झाली. जर्मन तंत्रज्ञांनी ही तोफ गुप्तपणे अशा खुबीने बनवली होती की ती विमानवेधी भूमिकेसह रणगाडाविरोधी तोफ म्हणूनही वापरता येत असे. दुसऱ्या महायुद्धात पोलंडमधील लढाईत ही तोफ शत्रूचे रणगाडे भेदू लागली तेव्हा तिच्या या क्षमतेची जगाला माहिती झाली.

जून १९४० मध्ये इटलीच्या सैन्याला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी जर्मन फिल्ड मार्शल एर्विन रोमेल (डेझर्ट फॉक्स) यांच्या नेतृत्वाखालील आफ्रिका कोअर उत्तर आफ्रिकेच्या वाळवंटात उतरले. रोमेलच्या सैन्याने पँझर रणगाडय़ांसह फ्लॅक ८८ मिमी तोफांचा प्रभावी वापर करत सहारा वाळवंटातील टय़ुनिशिया, लिबिया आदी प्रदेश काबीज करत लवरकच इजिप्तपर्यंत धडक मारली आणि सुएझ कालव्यासह ब्रिटनच्या भारतातील साम्राज्याला धोका उत्पन्न केला. पँझर रणगाडय़ांचा प्रताप साऱ्या जगाला माहिती आहे. पण फ्लॅक तोफांची करामत तितकीशी जगासमोर आली नाही. पण खुद्द रोमेलचे पुढील उद्गार या तोफेची महती सांगण्यास पुरेसे आहेत – ‘The struggle in the desert is best compared to a battle at sea. Whoever has the weapons with the greatest range has the longest arm. The longest arm has the advantage. We have it in the 88 mm gun..’

पुढे १९४२ साली अल-अलामिन येथील लढाईत रोमेलला माघार घ्यावी लागली तरी फ्लॅक तोफांच्या कामगिरीने विरोधी ब्रिटिश आणि अमेरिकी सैन्याकडूनही वाहवा मिळवली.

sachin.diwan@expressindia.com