अन्य क्षेत्रांत प्रगती न करता केवळ शस्त्रास्त्र उत्पादनात आघाडी घेतली आहे, असे देश क्वचितच पाहायला मिळतील. आधुनिक काळात, वैज्ञानिक आणि तांत्रिक प्रगतीनुसार शस्त्रनिर्मिती हा वैयक्तिक कौशल्याचा नव्हे तर सामुदायिक प्रयत्नांचा भाग बनला आहे. त्यासाठी मोठय़ा प्रमाणावर नैसर्गिक आणि मानवी संसाधनांची, तसेच आर्थिक शक्तीची गरज लागते. शेतीप्रधान संस्कृतीत जी राज्ये ही संसाधने मोठय़ा प्रमाणात गोळा करू शकली त्यांचीच साम्राज्ये बनू शकली.

औद्योगिक क्रांतीनंतर कच्चा माल, प्रशिक्षित मनुष्यबळ आणि आर्थिक पाठबळ उभे करू शकणारे देशच शस्त्रनिर्मितीत आघाडी घेऊ शकले. पहिल्या महायुद्धापूर्वी जर्मनीत पोलाद आणि रसायननिर्मिती उद्योग वेगाने पसरला होता. दुसऱ्या महायुद्धात युरोप आणि जगातील अन्य युद्धक्षेत्रांपासून दूरवर असलेली अमेरिका जगाची उत्पादनकर्ती बनली आणि त्याच जोरावर युद्धानंतर महासत्ता बनली. चांगला रणगाडा बनवण्यासाठी प्रथम उत्तम प्रतीची कार बनवणारे कारखाने असावे लागतात. शैक्षणिक, संशोधन, औद्योगिक आणि आर्थिक सुविधांचा पुरेपूर विकास झाल्याशिवाय प्रभावी शस्त्रनिर्मिती करणे दुरापास्त आहे. ही किमया ज्यांनी साधली ते देश आज शस्त्रनिर्मितीत आणि व्यापारात आघाडीवर आहेत.

लॉकहीड मार्टिन, बोईंग, बीएई सिस्टीम्स, रेथिऑन, नॉरथ्रॉप ग्रुमान, जनरल डायनॅमिक्स, एअरबस, युनायटेड टेक्नोलॉजीज कॉर्पोरेशन, लिओनार्दो एसपीए, एल-३ टेक्नोलॉजीज या जगातील सर्वात मोठय़ा शस्त्रास्त्रनिर्मिती कंपन्या आहेत. स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिटय़ूटच्या (सिप्री) अहवालानुसार २०१८ साली जागतिक संरक्षणखर्च १.७ ट्रिलियन (१७३९ अब्ज) डॉलर होता. हे प्रमाण जागतिक ‘जीडीपी’च्या २ टक्क्य़ांहून थोडे अधिक आहे. जगात २०१६ साली किमान ८८.४ अब्ज डॉलरचा शस्त्रास्त्र व्यापार झाला. जागतिक शस्त्रव्यापारात २०१३ ते २०१७ या काळात २००८ ते २०१३ या काळापेक्षा १० टक्क्यांनी वाढ झाली.

२०१३ ते २०१७ या काळात अमेरिका, रशिया, फ्रान्स, जर्मनी, चीन, ब्रिटन, स्पेन, इस्रायल, इटली आणि नेदरलँड्स हे प्रमुख शस्त्रास्त्र निर्यातदार देश होते. जागतिक शस्त्र निर्यातीत अमेरिका, रशिया, फ्रान्स, जर्मनी आणि चीन या पाच देशांचा वाटा ७४ टक्के होता. भारत, सौदी अरेबिया, इजिप्त, संयुक्त अरब अमिराती, चीन, ऑस्ट्रेलिया, अल्जेरिया, इराक, पाकिस्तान आणि इंडोनेशिया हे प्रमुख आयातदार देश होते. जागतिक शस्त्रास्त्र आयातीमध्ये भारताचा वाटा सर्वाधिक, म्हणजे १२ टक्के होता. भारत आजही एकूण गरजेपैकी साधारण ७० टक्के शस्त्रे आयात करतो. भारताबरोबर आणि अंतर्गत संघर्ष सुरू असूनही पाकिस्तानच्या शस्त्र आयातीत ३६ टक्के घट झाली आहे.

शस्त्रास्त्रांमध्ये बंदुका, पिस्तुले आदी लहान शस्त्रांचा व्यापार तुलनेने दुर्लक्षित राहतो. अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनलच्या अहवालानुसार जगात दरवर्षी साधारण ८० लाख नव्या बंदुका-पिस्तुले तयार होतात आणि १५ अब्ज काडतुसांचे उत्पादन होते. यातून उद्भवलेल्या संघर्षांमध्ये शीतयुद्धाच्या समाप्तीपासून २०१७ पर्यंत २२,३८,३२६ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी १ लाखांवर व्यक्तींचा मृत्यू केवळ २०१६ मध्ये झाला. सन २०१६ मधील सशस्त्र संघर्षांची एकूण किंमत १४.३ ट्रिलियन डॉलर होती. हे प्रमाण जागतिक अर्थव्यवस्थेच्या १२.६ टक्के इतके होते.

सचिन दिवाण

sachin.diwan@expressindia.com