शारीरिक क्षमतेत स्वत:पेक्षा वरचढ असलेल्या जंगली श्वापदांनी घेरलेल्या जगात मानवाने तयार केलेले आत्मरक्षणाचे साधन म्हणून शस्त्रांच्या कहाणीला सुरुवात झाली आणि आज ती माणसाच्याच विनाशाची गाथा बनू लागली आहे. प्रत्येक नवीन आणि अधिक घातक शस्त्र तयार झाले की वाटत होते – बस्स, आता हे शेवटचे शस्त्र. याहून जास्त विध्वंसक काही असणार नाही. मग त्याच्या भीतीने पुढील युद्ध होणार नाही हा आशावादही येत असे. पण तो फोल ठरवत प्रत्येक शतकाने मोठे संग्राम पाहिले आहेत. जीवित आणि वित्ताची अपरिमित हानी सोसली आहे. जेत्यांना त्यांच्या अटींवर शांतता हवी असते. आणि पराजिताला हिशेब चुकता करायची आणखी एक संधी हवी असते. पिचलेल्या मनाला आणि मनगटाला पुन्हा आत्मसन्मनाची आस असते. मग कधी चोरून तर कधी उघड, भाते पुन्हा फुलतात. तापलेल्या लोखंडावर घणाघात होतात. शस्त्रे घडतात. अस्मितेला धार चढते आणि माणसे पुन्हा रणांगणावर उभी ठाकतात.

अमेरिकी गृहयुद्ध, क्रिमियन युद्ध यानंतर पहिले महायुद्ध होणार नाही असे अनेकांना वाटत होते. नॉर्मन अँजेल यांनी १९०९-१० साली ‘द ग्रेट इल्युजन’ या पुस्तकात तसा दावा केला होता. शस्त्रे इतकी संहारक बनली होती की युद्धाची किंमत कोणालाच परवडणारी नव्हती. देश एकमेकांवर खूप अवलंबून होते. जर्मनी आणि फ्रान्स यांच्यात पारंपरिक वैर असले तरीही मोठा व्यापार होत होता. युद्धाची शक्यता अनेकांना वाटली नव्हती. पण एका लहानशा पिस्तुलाने युद्धाची ठिणगी पडली आणि त्या भडक्यात लाखो माणसे होरपळून गेली. त्यानंतर केवळ दोन दशकांनी जगाने पुन्हा सलग सहा वर्षे महायुद्ध आणि नरसंहार भोगला. त्यानंतरही वाटले होते की, झाले तेवढे पुरे झाले, आता पुन्हा नाही. पण शीतयुद्धात शस्त्रास्त्रस्पर्धा शिगेला पोहोचली. सोव्हिएत युनियनच्या पतनानंतर वाटले होते की, आता त्या महाभयंकर अस्त्रांची गरज नाही.

त्यानंतर मोठी युद्धे झाली नसली तरी ‘लो इंटेन्सिटी कॉन्फ्लिक्ट्स’ आणि ‘असिमिट्रिक वॉरफेअर’ने शस्त्रांची गरज अबाधित ठेवली आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर संयुक्त राष्ट्र, युरोपीय महासंघ, जागतिक बँक, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी यांच्या रूपात झालेले जगाचे एकीकरण थांबून आता पुन्हा विघटनवाद उफाळून येत आहे. राष्ट्रवादाने उचल खाल्ली आहे. अणुबॉम्बच्या हल्ल्याच्या मरणयातना भोगल्यावर जपानने सेनादले केवळ आत्मरक्षणार्थ असतील, हल्ल्यासाठी नव्हेत; अशी तरतूद राज्यघटनेत केली होती. आता ती रद्द करून जपान पुन्हा शस्त्रसज्ज बनत आहे. जगाची कोठारे पुन्हा नवनव्या शस्त्रांनी शिगोशीग भरत आहेत.

अमेरिकेचे माजी अध्यक्ष ड्वाइट डी. आयसेनहॉवर यांनी १७ जानेवारी १९६१ रोजी त्यांच्या निरोपाच्या भाषणात अमेरिकेला इशारा दिला होता की, देशाने ‘मिलिटरी-इंडस्ट्रिअल कॉम्प्लेक्स’च्या तालावर नाचता कामा नये. सीमेपार सतत एक धोका दाखवत राहायचे, त्याचा नायनाट करण्यासाठी सदैव शस्त्रसज्ज राहायचे. त्या नादात शस्त्रनिर्मिती उद्योग फोफावतो आणि त्याचे राज्यकर्त्यांशी साटेलोटे तयार होऊन देशाची धोरणेच युद्धखोर बनू लागतात. आयसेनहॉवर यांच्या इशाऱ्यानंतर पुढल्याच वर्षी क्युबातील क्षेपणास्त्र संकटाच्या रूपाने जग विनाशाच्या उंबरठय़ावर उभे होते.

मार्टिन ल्यूथर किंग ज्युनिअर यांनी म्हटले होते – ‘अवर सायंटिफिक पॉवर हॅज आऊटरन अवर स्पिरिच्युअल पॉवर. वुई हॅव गायडेड मिसाइल्स अ‍ॅण्ड मिसगायडेड मेन.’

सचिन दिवाण

sachin.diwan@expressindia.com