अमेरिकेचे माजी अध्यक्ष ड्वाइट डी. आयसेनहॉवर यांच्या इशाऱ्याप्रमाणे जग आज पुन्हा ‘मिलिटरी-इंडस्ट्रिअल कॉम्प्लेक्स’च्या कच्छपी लागले आहे. त्यातून केव्हा ना केव्हा युद्धाचा भडका उडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आता शस्त्रांची संहारकता इतकी वाढली आहे की त्यांनी जगाचा अनेक वेळा संपूर्ण विनाश होऊ शकेल. त्यामुळेच अल्बर्ट आइनस्टाइन यांनी म्हटले होते – ‘तिसरे महायुद्ध कोणत्या शस्त्रांनी लढले जाईल हे मला माहिती नाही. पण चौथे महायुद्ध नक्कीच काठय़ा आणि दगडधोंडय़ानी लढले जाईल.’

शस्त्रांनी आजवर अपरिमित संहार घडवला हे खरे. मात्र शस्त्रांच्या विकासामुळे मानवाचे केवळ वाईटच झाले आहे असेही मानण्याचे कारण नाही. युद्धासाठी विकसित केलेले बरेचसे तंत्रज्ञान आज नागरी जीवनात उपयोगी ठरत आहे. त्याला ‘टॅक्टिकल टू प्रॅक्टिकल’ असा बदल म्हणतात. आज आपण ज्या मोबाइल फोनवर इतके अवलंबून आहोत त्याच्या मुळाशी असलेली कॉम्प्युटरची मायक्रोचिप ही शीतयुद्धात अमेरिकेच्या आंतरखंडीय क्षेपणास्त्रांचे नियंत्रण आणि दिशादर्शन करण्यासाठी बनवली गेली होती. मोबाइल फोनमधील डिजिटल कॅमेऱ्यांचे मूळ अमेरिकेच्या हेरगिरी करणाऱ्या कृत्रिम उपग्रहांवरील कॅमेऱ्यांमध्ये आहे. अवकाशातून शत्रूच्या तळांची छायाचित्रे घेतल्यानंतर ती जमिनीवर पाठवण्यासाठी फिल्म वापरावी लागू नये म्हणून डिजिटल कॅमेरे तयार झाले. मोबाइलमध्ये आज आपण जी ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम (जीपीएस) नावाची कृत्रिम उपग्रहांवर आधारित यंत्रणा वापरतो ती प्रत्यक्षात अमेरिकी क्रूझ क्षेपणास्त्रांच्या दिशादर्शनासाठी तयार झाली होती. इंटरनेटचा उगम अमेरिकेच्या विविध संरक्षण प्रयोगशाळांमध्ये गोपनीय माहितीच्या देवाण-घेवाणीसाठी झाला होता. लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर यांचे हलके पण मजबूत सुटे भाग तयार करण्यासाठी निर्माण झालेली कार्बन-कार्बन कॉम्पोझिट मटेरिअल्स आज कार, खेळाची उपकरणे आणि मानवाचे कृत्रिम अवयव तयार करण्यासाठी वापरात येत आहेत. अण्वस्त्रांनी जगाच्या विनाशाचा धोका निर्माण केला असला तरीही उद्याच्या ऊर्जा सुरक्षिततेचा आधारही अणुशक्तीतच पाहायला मिळतो.

शस्त्रे स्वत: नि:पक्षपाती (न्यूट्रल) आहेत. शस्त्रे विध्वंस घडवत नाहीत. शस्त्रे धारण करणारी माणसे विनाश घडवतात. त्या अनुषंगाने फ्रान्सचे माजी (१९१७ ते १९२०) पंतप्रधान जॉर्जेस क्लेमेन्सो यांचे वचन महत्त्वपूर्ण आहे – ‘वॉर इज टू सीरियस अ मॅटर टू बी लेफ्ट टू जनरल्स.’ त्यामुळे शस्त्रांवर आणि परिणामी सैन्यावर नागरी प्रशासनाचे नियंत्रण असणे हितावह आहे. अर्थात त्या नागरी सरकारचीही विवेकबुद्धी शाबूत असणे अभिप्रेत आहे. युद्धखोर वृत्तीला चालना देणे हे कोणाचेच उद्दिष्ट असू शकत नाही. मात्र शांततेच्या, संपन्नतेच्या आणि मानवतेच्या रक्षणासाठीही शस्त्रसज्जतेला पर्याय नाही, हे सत्य आहे. या महत्त्वाच्या विषयाकडे भारतात आजवर अक्षम्य दुर्लक्ष करण्यात आले आहे. त्याची फळे भोगूनही अद्याप परिस्थितीत फारसा फरक पडलेला नाही. त्याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठीच हा लेखनप्रपंच. त्यात अनवधानाने त्रुटी किंवा चुका राहिल्या असल्यास क्षमस्व. शस्त्रवापराबाबत विवेक बाळगल्यास वसंत बापट यांच्या कवितेतील आशावाद पथदर्शी ठरू शकतो –

सदैव सैनिका पुढेच जायचे,

न मागुती तुवा कधी फिरायचे..

..नभात सैनिका प्रभात येऊ दे,

खगांसवे जगा सुखात गाऊ दे,

फुलाफुलांवरी सुवर्ण शोभू दे,

जगास शांतता सुहास्य लाभू दे,

न पाय तोवरी तुझे ठरायचे,

सदैव सैनिका पुढेच जायचे.

 

– सचिन दिवाण

sachin.diwan@expressindia.com