पेशव्यांचे प्रधान श्रीमंत नाना फडणवीस यांचा स्त्रीलंपटपणा हेरून उत्तर प्रदेशातून आलेला, स्थानिकांत उपरा असलेला घाशीराम सावळदास हा कनौजी ब्राह्मण आपली पोटची कन्या नानांना देऊन बदल्यात पुण्याची कोतवाली (पोलीस कमिशनरचे पद) मिळवतो. कोतवाली मिळाल्यावर घाशीरामला सत्तेची ताकद कळत जाते. तो आपला वचक पुणे शहरावर बसवतो आणि परवान्यांचं राज्य आणतो. नियम कडक झाल्याने पुण्याच्या त्यावेळच्या ‘नाइट लाईफ’वर गदा येते. ब्राह्मणांच्या रात्रीच्या चंगळीला लगाम बसतो. जनतेला अप्रिय असणाऱ्या नियमांच्या अंमलबजावणीचा अतिरेक होत जातो. घाशीरामला सत्तेची चव कळून त्याची नशा येऊ लागते. तो उपरा म्हणून त्याची स्थानिकांत झालेली अवहेलना त्याला बेचैन करते. त्यात त्याची मुलगी दिसेनाशी होते आणि गर्भपाताने तिचा मृत्यू झाल्याचे घाशीरामला कळते. त्याने तो बेभान होत जातो. पेशव्यांच्या बागेतली फळं चोरली या किरकोळ चोरीची शिक्षा म्हणून दक्षिणेकडून आलेल्या बावीस ब्राह्मणांना कोठडीत टाकण्याचा हुकूम देतो. शिपाई त्या बावीस ब्राह्मणांना अतिशय अरुंद आणि छोटय़ा कोठडीत रात्रभर डांबतात. हवा न मिळाल्यामुळे घुसमटून ते सर्व ब्राह्मण त्या रात्रीत मरतात. पुण्यात गहजब होतो. ब्राह्मण श्रीमंत नानांकडे चालून जातात. न्याय मागतात. जनता चालून आल्याने अस्वस्थ झालेले, घाबरलेले नाना घाशीरामच्या वधाचा हुकूम देतात. त्यांनाही घाशीराम डोईजड झालेलाच असतो. खवळलेले ब्राह्मण घाशीरामाला दगडांनी ठेचून मारतात. त्याचा वचक संपतो. नियम शिथिल होतात आणि पुण्यातलं ‘नाइट लाईफ’ पूर्ववत सुरू राहते..
आमच्या थिएटर अ‍ॅकॅडेमीचा ‘घाशीराम कोतवाल’चा शेवटचा प्रयोग होऊन (६ डिसेंबर १९९२) आता २३ र्वष झाली आहेत. म्हणून जरा उजळणीसाठी वर थोडक्यात सांगितलीय ती या नाटकाची गोष्ट! थोडं विषयांतर करायचं झालं तर अलीकडेच दिवंगत झालेले नरसोबाच्या वाडीचे प्रख्यात लोकप्रिय कीर्तनकार ह. भ. प. दत्तदासबुवा घाग आपल्या निरुपणात ‘थोडक्यात सांगणे’
यावर भागवत पुराणातल्या एका श्लोकाचा दाखला देत असत. ते म्हणायचे की, सध्या सगळ्यांनाच सगळं कमी वेळात हवंय. आपल्या परंपरेत अख्खं श्रीकृष्णचरित्रसुद्धा एका श्लोकात बसवता येतं बघा-
आदौ देवकिदेविगर्भजननं, गोपीगृहे वर्धनं
मायापूतनजीवितापहरणं गोवर्धनोद्धारणम्।
कंसच्छेदनकौरवादिहननं कुंतीसुतंपालनम्
एतद्भागवतं पुराणकथितं श्रीकृष्णलीलामृतम् ।।
घागबुवांचं रसाळ निरुपण असलेली कीर्तनाची डीव्हीडी आमचे विद्यार्थी वाचिक अभिनयाच्या अभ्यासासाठी बघत असतात, म्हणून त्यांनी म्हटलेला हा श्लोक आठवला. तेंडुलकरांनीदेखील आपल्याला काय म्हणायचंय तो आशय अत्यंत कमीत कमी शब्दांत, केवळ ३६ पानांत लोककलांच्या कोंदणात रेखीवपणे बसवला होता. नाटकात सत्ताधीशांचा भ्रष्टाचार आणि समाजातील हिंसा अशा राजकीय- सामाजिक आशयाला रेखीव, जेव्हढय़ास तेव्हढे आणि नाच-गाण्यांनी युक्त असे करमणुकीचे कोंदण क्वचितच मिळते. असो.
तर मुद्दा म्हणजे नाटकाचा मुहूर्त जवळ आलेला होता. सुरांत गाणारे कलाकार निवडणे अगत्याचे होते. जब्बारच्या अभ्यासवर्गाचे सदस्य कामाला लागलेले होते. रमेश मेढेकर, सुरेश बसाळे (१९४३-२००६) हे एस. पी. कॉलेजच्या सांस्कृतिक गटाचे म्होरके. त्यांनी चंद्रकांत काळे आणि मोहन गोखले (१९५४-१९९९) यांना आधीच आणलेले होते. मोहन गोखलेच्या घरासमोर अकोल्यावरून गणित विषयात बी. एस्सी. होण्यासाठी आलेला आनंद मोडक (१९५१-२०१४) खोली घेऊन राहत होता. तोही आला. ७२ साली झालेला भारताच्या स्वातंत्र्याचा रौप्यमहोत्सवही काही गाणारे ब्राह्मण मिळण्यास उपयुक्त ठरला. तो असा की- पुणे विद्यापीठातर्फे दिल्लीला १५ ऑगस्टसाठी विद्यार्थ्यांचे एक सांस्कृतिक पथक गेले होते. त्याचे प्रमुख होते आमचे अण्णा राजगुरू. (१९२८-२०१३) आणि गेलेल्या पथकात होते चंद्रकांत काळे, दीपक ओक (१९५१-१९९४), श्रीकांत गद्रे आणि अन्य. दिल्लीहून आल्यावर हे तिघेही ब्राह्मणांत जमा झाले. बी. जे. मेडिकल कॉलेजच्या ऑफिसमध्ये काम करणाऱ्या नंदू पोळला जब्बार घेऊन आला. नंदूनं सोबत ऑफिसमधला त्याचा मित्र अरविंद धोंगडे याला आणलं. पुण्याच्या प्रसिद्ध आपटे प्रशालेचा एक संस्थापक शिक्षक श्रीराम रानडे हा राष्ट्र सेवादलाच्या कलापथकात शाहिरी ढंगाने गात असे. अण्णाच्या ओळखीनं तो आला. येताना सोबत निळू फुले यांचा कॉलेजमध्ये शिकणारा, कथक शिकलेला धाकटा भाऊ सुभाष फुले याला घेऊन आला. त्यावेळी नवीन निघालेल्या मॉडर्न कॉलेजच्या पुरुषोत्तमच्या टीममधून उदय लागू दाखल झाला. प्रकाश रानडे त्याच्या नीलकंठ प्रकाशनच्या अड्डय़ावरून त्याचा आतेभाऊ मंदार भोपटकर आणि जीवलग मित्र प्रवीण गोखले यांना घेऊन आला. बीएमसीसी कॉलेजतर्फे दिल्लीला गेलेला दीपक ओकने त्याच्या पुरुषोत्तम करंडकमध्ये केलेल्या ‘डियर पिनाक’ या एकांकिकेच्या गँगमधून सतीश घाटपांडे आणि अविनाश लिमये (१९५२-२०१४) यांना आणलं. अण्णाच्या मदतीला अरविंद ऊर्फ तात्या ठकार (१९३५-२०१४) हा पूर्वीपासून होताच. सवाई गंधर्व संगीत महोत्सवाच्या संयोजन टीममध्येही तात्या असायचा. या दोघांच्या मेहनतीवर ‘घाशीराम’च्या निर्मितीचा आमचा डोलारा उभा राहिला. तात्याच्या ओळखीने आमचा स्टडी ग्रुप दरवर्षी महोत्सवात चकटफू घुसून तीन दिवस पहाटेपर्यंत गाणं ऐकत उंडारत असे. तात्या त्याचा मित्र दिलीप मिटकर याला घेऊन आला. ‘अशी पाखरे येती’मधला बंडा- दिलीप जोगळेकर हा अभिनव कला महाविद्यालयात आर्किटेक्चरचा कोर्स करत होता. त्याने येताना त्याचा वर्गमित्र साहित्यिक राजा मंगळवेढेकरांचा मुलगा दिलीप याला आणलं. ‘घाशीराम’ची वेशभूषा त्यानं केली. आणि पुढे आमच्या ‘मिकी आणि मेमसाहेब’, ‘शनवार-रविवार’, ‘अतिरेकी’ यांसारख्या अनेक नाटकांची नेपथ्यरचना दिलीपने केली. दीपक ओकचा मित्र श्रीकांत गद्रे हा त्यावेळी महाराष्ट्रीय कलोपासकच्या ‘कालाय् तस्मै नम:’ या चिं. त्र्यं. खानोलकरांच्या नाटकाच्या टीममध्ये होता. तो भरत नाटय़मंदिरात नृत्याच्या वर्गासही जात असे. त्याचे नृत्याचे गुरुजी होते कृष्णदेव मूळगुंद (१९१३-२००४) आणि त्यांच्या पत्नी मंगलताई. ६८ मध्ये पुरुषोत्तम करंडक स्पर्धेत रमेश टिळेकर (१९४६-१९९५) याने दिग्दर्शित केलेली ‘खलित्यांची लढाई’ या तेंडुलकरांच्या एकांकिकेला करंडक मिळाला तेव्हा रमेश पुण्याच्या आयएलएस कॉलेजमध्ये लॉ करत होता. नंतर तो दोन र्वष मॉस्कोच्या १९६० साली स्थापन झालेल्या पॅट्रिस लुमुम्बा युनिव्हर्सिटीमध्ये केंद्र शासनाच्या शिष्यवृत्तीवर उच्च शिक्षणासाठी गेला. ७०-७१ मध्ये परतल्यावर त्याची वकिली आणि कम्युनिस्ट पार्टीचं काम असं दोन्ही सुरू झालेलं होतं. ६५-७५ दरम्यान बऱ्याच डाव्या विचारांच्या पुढाऱ्यांची मुलं उच्च शिक्षणासाठी मॉस्कोला जात असत. त्यामध्ये नगर जिल्ह्यातल्या अनेक प्रगतिशील शेतकऱ्यांची मुलं-मुलीदेखील असत. तिकडे ही मुलं शेती, मेडिसिन, डेन्टिस्ट्री, व्हेटर्नरी सायन्स यासारख्या पदव्या घेऊन येत असत. त्यांना रशियन भाषा प्राथमिक स्तरावर शिकावी लागे. रमेशलाही रशियन भाषा बऱ्यापैकी अवगत होती. हिंदी-रुसी भाई-भाईचे राजकारण त्यावेळी जोरात होते. रमेशबरोबर पूर्वीपासून स्टडी ग्रुपमध्ये असणारा त्याचा मित्र सुनील कुलकर्णी होता. एकदा मी आणि समर नखाते भांडारकर रस्त्याने सायकली हातात घेऊन रमतगमत गप्पा मारत येत असताना समोरून एक गोरा, देखणा तरुण गळ्यावर मफलर बांधून सायकलवरून येत एका पानाच्या टपरीजवळ थांबला. त्याला पाहून समर जवळजवळ ओरडलाच- ‘अरे, तो बघ गायक येतोय. हा आमच्याच बॅचला फिल्म इन्स्टिटय़ूटमध्ये साऊंडचा डिप्लोमा करतोय.’ त्याला संध्याकाळी ‘महिला निवास’वर बोलावलं. तो पं. नागेश खळीकरांचा शिष्य. त्याने ऑडिशनला अभिषेकीबुवांचे कुसुमाग्रजरचित गाणे म्हटले- ‘सर्वात्मका सर्वेश्वरा..’ त्याच्या आवाजावर सगळे खूश. तो तरुण म्हणजे नंतर पाश्र्वगायक झालेला आमच्या रमणबागेचा माजी विद्यार्थी रवींद्र साठे! त्याच्यात आणि अभिषेकीबुवांच्या दिसण्यात आणि आविर्भावांत बरंच साम्य होतं. म्हणून मग सगळे त्याला ‘बुवा साठे’ म्हणू लागले. बाकीचेही कुणाकुणाच्या ओळखीनं दाखल झाले. त्यामध्ये विठ्ठल पवार, शंकर कुलकर्णी, राजीव साठे असे बरेच होते.
खरं तर ‘घाशीराम’मध्ये प्रमुख पात्र असं एकच.. ते म्हणजे ‘समूह’! हा ब्राह्मण समूह किती मोठा ठेवायचा याचा निर्णय घ्यायचा होता. समूहात तीन पात्रं- ती म्हणजे नाना, घाशीराम आणि सूत्रधार. जब्बारने नंतर तालमी सुरू झाल्यावर एका सूत्रधाराचे तीन केले- म्हणजे एक सूत्रधार आणि दोन त्याचे परिपाश्र्वक! रंगमंचावरच्या झुलत्या ब्राह्मणांच्या रांगेमधून प्रसंगानुसार एकेक पात्रं बाहेर येतात आणि आपल्या प्रसंगातील संवाद झाले की पुन्हा लयीत झुलणाऱ्या रांगेत विलीन होतात असा प्रकार होता. तेंडुलकरांनी अजून एक पात्र मात्र अत्यंत खुबीने रचलं होतं. ते म्हणजे एका इंग्रज अधिकाऱ्याचं! या पात्राची एन्ट्री मोक्याच्या ठिकाणी होते. म्हणजे उदाहरणार्थ पहिल्या अंकात गणपतीउत्सवाची मिरवणूक, नाना घाशीरामाला कोतवाल म्हणून जाहीर करतात तो प्रसंग. दुसऱ्या अंकात नानांचं सातवं लग्न, वरात आणि शेवटी घाशीरामच्या वधानंतर. संपूर्ण नाटकात एखाद् वाक्य उच्चारणाऱ्या या पात्राच्या केवळ अचूक प्रासंगिक आणि तटस्थ दर्शनाने नाटककाराला आपल्या नाटकातला आशय किती अबोलपणे अधोरेखित करता येतो, याचा हा अभ्यासक्रमच होता. कारण शेवटी १८१८ मध्ये पेशवाई बुडाली आणि इंग्रज आले. आनंद काळे या इंग्रजाचं काम सुरुवातीच्या काही प्रयोगांत करीत असे.
नाटकात स्त्री-भूमिका अशा फारशा नव्हत्या. घाशीरामची मुलगी ललितागौरी, लावणी नाचणारी गुलाबी, नानांची सातवी नवरी आणि समूहात ब्राह्मणी म्हणून वावरणाऱ्या चार-पाच स्त्रिया. पण मुख्य कोरस सगळा पुरुषांचा होता. स्त्री-कलाकार मिळवण्यात अण्णा राजगुरू आणि वहिनी अनिता राजगुरू यांचा पुढाकार असे. ललितागौरीचं काम मिळालेली शनवारपेठेतच राहणारी स्वरूपा नारके (आता खोपकर) ही राजगुरू वहिनींची मॉडर्न हायस्कूलची विद्यार्थिनी. ती अभिनव कला महाविद्यालयात कमर्शियल पेंटिंगचा कोर्स करत होती. प्रसिद्ध गायिका ज्योत्स्ना भोळे या तिच्या मावशी. ती कथक शिकलेली. गाणंही होतं. पुढं ८५ मध्ये विजया मेहतांनी ‘कलावैभव’साठी केलेल्या एलकुंचवारांच्या ‘वाडा चिरेबंदी’ नाटकात तिनं कोकणस्थ अंजलीची भूमिका केली. अन्य ब्राह्मणी म्हणून पूर्वी पी. डी. ए. निर्मित कानेटकरांच्या ‘दोन ध्रुवांवर दोघे आपण’ (१९६३) या नाटकात बालकलाकार म्हणून गाजलेली वैजयंती ओक, नानांची सातवी नवरी म्हणून रंजना नगरकर, पूर्वी पी. डी. ए.च्या ‘संगीत शारदा’मध्ये काम केलेली शैला गदककर, सोबत रमेश टिळेकरची पत्नी ज्योती आणि विद्या प्रकाश रानडे, तसेच लावणीनृत्य करणारी गुलाबीच्या भूमिकेत सुषमा जगताप असे प्रत्यक्ष मंचावर एकूण २५ पुरुष, ६ बायका आणि अन्य वादक, तंत्रज्ञ धरून ४०-४५ कलाकारांचा संच जमा झाला. रमेश मेढेकर गाणं आणि तबला शिकलेला. त्याने कसबा पेठेतून पखावजसाठी त्याचे इंजिनीयर मित्र श्रीकांत राजपाठक, तसेच हार्मोनियमसाठी श्याम बोंडे, ढोलकीवर अशोक गायकवाड आणि सुंद्री-शहनाईसाठी प्रसिद्ध शहनाईवादक व अशोकचे काका पं. प्रभाशंकर गायकवाड या मंडळींना आणलं. कसबा पेठेतली व्यावसायिक साथसंगत करणारी ही मंडळी. रंगभूषेसाठी आमचा नेहमीचा ‘अवघाची संसार’, ‘लाखाची गोष्ट’, ‘पाठलाग’सारख्या गाजलेल्या शंभरच्या वर चित्रपटांची रंगभूषा केलेला, १९५२ पासून पीडीएच्या सोबत असलेला, राजा परांजपे यांना गुरू मानणारा बुजुर्ग निवृत्ती दळवी होताच. पण नृत्याचं काय करायचं? कोरीओग्राफी कोण करणार?
या प्रश्नाचं उत्तर मिळण्यासाठी आपल्याला ऑडिशन्समधून जे २५ ब्राह्मण मंचावर नक्की झाले त्यापैकी श्रीकांत ऊर्फ भगत गद्रे याच्याकडे जावे लागेल. तेव्हा सगळ्यांचंच वय थोडं उंडारण्याचं होतं. पण भगतचं ते वय दीर्घकाळ टिकलं. त्याची गंमत म्हणजे तो नक्की काय करतो, हे कुणालाच उमगत नसे. पण त्याचा बिनधास्तपणे सर्वत्र संचार असे. कोठेही तो घुसत असे. कित्येक दिवस आमचा समज होता की तो हॉटेल व्यवसायात असून केटरिंगमध्ये त्याला रस आहे. ज्या सारसबागेजवळच्या ‘हॉटेल विश्व’मध्ये आम्ही कधी भेटत असू, त्याच्या गल्लय़ावर तो बिनधास्त बसलेला असे. काऊंटरवरचा मालक त्याच्याशी सतत बोलत असे. भगत काऊंटरवर असला की वेटर्स आम्हाला खास व्यक्ती समजत असत. तो आत भटारखान्यात जाऊन कधी कधी डोसेही स्वत: करत असे. हे सगळं तो इतक्या सहजपणे करायचा, की वाटे हाच जणू त्या हॉटेलचा मालक आहे. सर्व नाटय़संस्थांशी त्याचा जिव्हाळा. एकांकिका कोणत्याही कॉलेजची जरी असली, तरी बॅकस्टेजला हाच! असं त्याचं अजातशत्रू व्यक्तिमत्त्व होतं. गाणं त्याला उत्तम समजत असे. सवाई गंधर्व महोत्सवात तो कोणत्याही मोठय़ा गायकाशी आत्मविश्वासाने संगीतावर चेहरा गंभीर ठेवून गप्पा मारताना दिसे. कर्वे रोडवरच्या अनिल पानवालासारख्या अनेक अड्डय़ांवर त्याची उठबस असे. पुढे कॉम्प्युटर आल्यावर त्याला त्यात विलक्षण गती आली आणि त्याने ग्राफिक्स डिझाइन तसेच कमर्शियल प्रिंटिंगचा यशस्वी उद्योग केला. तर या अड्डय़ांवर नाटकामधला एखादा नवखा चेहरा हेरून त्याची फिरकी घेण्यात हा तरबेज. त्याच्या फिरक्या दोन-तीन दिवस सलग चालत असत. उदाहरणार्थ म्हणजे त्या होतकरू नटाचा आणि भगतचा संवाद असा होई..
भगत : अरे, बरं झालं भेटलास. तुला जब्बारनी भेटून जायला सांगितलंय.
होतकरू नट (खूश होऊन) : म्हणजे डॉ. जब्बार पटेलांनी?
भगत : येस सर! ‘घाशीराम कोतवाल’ नाटकात एक रोल आहे. बहुधा घाशीरामचा. तू असं कर- आधी केस अगदी बारीक कापून ये. आणि धोतर नेसता येतं?
होतकरू नट : नाही.
भगत : मग शिकून घे. कुणाला काही बोलू नकोस. आणि एक तरी हिंदी गाणं पाठ कर.
होतकरू नट (संकोचून) : मला गाता नाही येत.
भगत : हेच तुमचं चुकतं. आम्हाला तरी कुठं येतंय? न घाबरता मोठय़ानी म्हणायचं.
होतकरू नट : पण कुठलं म्हणू?
भगत : कुठलं म्हणशील..? अं.. ठरलं! ‘प्यार किया तो डरना क्या..’ अं! काय? हेच म्हण! काय? ‘मुगले आझम’? आणि हो, डोक्याला टोपी घालून ये. आणि नाचावंही लागेल! काय?
होतकरू नट : हो.. मग.. कधी येऊ?
भगत : उद्या संध्याकाळी ६.३० ला ये. जब्बार उशिरा येतो. तोपर्यंत आळेकर तुझ्याकडून तयारी करून घेईल. न लाजता मोठय़ानं गाणं झालं पाहिजे. काय? मग ये उद्या!
..आता दुसऱ्या दिवशी तालमीच्या ठिकाणी तो होतकरू नट धोतर नेसून, केस भादरून, वर टोपी घातलेला- आपल्या भसाडय़ा आवाजात ‘प्यार किया तो डरना क्या, जब प्यार किया तो डरना क्या..’ हे गाणं म्हणत असताना काय हलकल्लोळ झाला असेल याची कल्पना एव्हाना तुम्हाला आली असेलच. असा हा भगत!
भरत नाटय़मंदिरात तो नृत्यही कधीतरी शिकला होता. म्हणजे नृत्य शिकला कमी; पण त्याचा गाजावाजा उत्तम! एकूण सर्वाशी त्याचा लडिवाळ संवाद चाले. त्यामुळे ‘घाशीराम’ची कोरीओग्राफी कोण करणार, म्हटल्यावर त्याने एक दिवस भावे स्कूलमधले ड्रॉइंग टीचर, नर्तक कृष्णदेव मुळगुंद आणि त्यांची पत्नी मंगलताई यांना तालमीलाच घेऊन आला. मुळगुंदसर एकदम साधे. इतके साधे, की भगत गद्रे त्यांना म्हणाला की, ‘सर, जरा नमुना दाखवा.’ त्यानं असं म्हणताक्षणी साठीला आलेले मुळगुंदसर सोबत मंगलताईंना घेऊन तरुणांना लाजवील इतक्या ऊर्जेनं नाचायचे, की ते बघून आम्हीच दमायचो. अगोदर काहीही न ठरवता विलक्षण लयीत हलणारी, अनेक नृत्यशैलींचं मिश्रण असणारी त्यांची ती देहबोली आम्हाला थक्क करून सोडीत असे. ते उदयशंकर यांना मनोमन गुरू मानीत. ते कधी कोणाकडे पद्धतशीर असे नृत्य शिकलेले नव्हते. पण सर्व प्रकारची नृत्ये त्यांना येत असत. कथक, भरतनाटय़म् या दोन प्रमुख शैली तर त्यांना उत्तम येत असतच; पण अन्य नृत्यशैलीदेखील तितक्याच आत्मविश्वासाने ते करून दाखवीत. त्यांची सगळी हयात तरुण मुलामुलींना नृत्यदिग्दर्शन करण्यात गेलेली. भारतभर ते अनेक नृत्यमहोत्सवांतून फिरलेले. त्यांचं स्वत:चं नृत्य सर्व परंपरागत नृत्यशैलींचं मिश्रण असलेलं, मजेदार, पण ऊर्जामय नृत्यनाटय़ असे. कोणताही नृत्य प्रकार त्यांना वज्र्य नव्हता. त्यामुळे त्यांच्या नृत्यात एक प्रकारची आधुनिक समकालीनत्वाची जाणीव नकळत आलेली होती. आणि ही बाब जब्बारला फार महत्त्वाची वाटली आणि त्याने नृत्य-दिग्दर्शक म्हणून त्यांना पक्के केले. एका बाजूला भास्कर चंदावरकर यांच्यासारखा संगीताचे वैश्विक भान असलेला बुद्धीनिष्ठ संगीतकार आणि दुसऱ्या बाजूला कोणतीही नृत्यशैली वज्र्य न मानणारा, विविध शैलींची एकत्रित उत्स्फूर्त आणि तात्काळ घुसळण करून दाखवणारा नृत्य-दिग्दर्शक असा मेळ जुळून आलेला.
आता कलाकारांच्या दृष्टीनं सर्वात कळीचा मुद्दा म्हणजे- कोण कुठली भूमिका करणार? एव्हाना वाचकांच्या लक्षात आलंच असेल, की स्त्रियांच्या काही भूमिका कोण करणार, हे मी वरती फोडलेलंच आहे. पण रंगमंचावरच्या झुलणाऱ्या ब्राह्मणांच्या रांगेत समूह म्हणून कोण दिसणार, आणि समूहात घाशीराम कोतवाल, नाना फडणवीस, सूत्रधार, परिपाश्र्वक अशा भूमिका कोणाच्या वाटय़ाला येणार? ‘अशी पाखरे येती’मधलं काम बघून तेंडुलकर म्हणत होते की, घाशीरामची भूमिका जब्बारने करावी. पण तो तयार नव्हता. त्याचं कारण- त्याचा उत्तम चाललेला दवाखाना. पण मग पुढची सलग वीस र्वष कुणाच्या मानगुटीवर कुठलं पात्र बसलं आणि का, या सगळ्याचा विचार करायला आपल्याकडे फक्त पंधरा दिवस उरलेत. तेव्हा म्हणा-
श्रीगणराय नर्तन करी, आम्ही पुण्याचे बामन हरी
बामन हरी नर्तन करी, श्रीगणराय फेर की धरी..
वाजे मृदंग चढेची रंग, त्रिलोक दंग हो त्रिलोक दंग…
सतीश आळेकर – satish.alekar@gmail.com