News Flash

मति दे मज लाघवी

गणेश उपनिषदात त्याचे महत्त्व वर्णिले आहे. सर्वाच्या नित्य परिचयाचे गणपती अथर्वशीर्ष आहे.

भारतीय संस्कृतीत श्रीगणेशाचे महत्त्वाचे स्थान आहे. तो विघ्नहर्ता आहे म्हणून त्याची पूजा कोणत्याही मंगलकार्यात होते. तो बुद्धीचा दाता आहे. त्याच्या कर्तृत्वाला सीमा नाही. गणेश उपनिषदात त्याचे महत्त्व वर्णिले आहे. सर्वाच्या नित्य परिचयाचे गणपती अथर्वशीर्ष आहे. यात गणपतीचे महत्त्व सांगितले आहे. वैदिक काळात सुमारे आठ हजार वर्षांपूर्वी गणपती हे नाव येते. सुमारे दोन हजार वर्षांपासून गणपतीची पूजा भारतात चालत असावी. कदाचित गणपतीचा आकार बदलत असावा. यादृष्टीने विविध उल्लेख वेदकाळात मिळतात. ‘ऋग्वेदात गणानां त्वा गणपतीं हवामहे..।’ हे प्रख्यात सूक्त आहे. शुक्ल यजुर्वेदात याचा उल्लेख येतो. हा गणपती गणांचा अधिपती आहे. तत्तिरीय संहितेत गणपती म्हणजे पशुपती. उपनिषदात गणपतीच्या सगुण रूपाचे रूपांतर ओमकाररूपात झाले आहे. हे परब्रह्माचे सुंदर रूप आहे. इथे विविध पारमाíथक रूपके गणपतीवर केलेली आहेत. गणेशपुराणात अनेक संदर्भ वैशिष्टय़पूर्ण आहेत. यात गणेशसंप्रदायाची विविध माहिती आहे. यात गणेश सहस्रनाम दिले आहे.

ज्ञानाच्या उपासनेतून गणेश प्रसन्न होतो. त्याच्या मूर्तीचा आकार ज्ञाननिष्ठ आहे. त्याच्या डोळय़ांत उपनिषदांची प्रभा आहे. त्याचे कान श्रवणाच्या वेदांची पाने आहेत. त्याचे मस्तक सत्याचे स्वरूप आहे. त्याचे आसन ओंकाराचे अधिष्ठान आहे. त्याचा एक हात सदैव नव्यानव्या अक्षरांसाठी अधीर आहे. दुसरा हात निसर्गाला जपण्यासाठी तत्पर आहे. म्हणून त्याच्या हातात पूर्णयोगी कमळ आहे. असुरी प्रवृत्तीचा नाश करण्यासाठी त्याच्या हातात परशू तयार आहे. त्याचा आणखी एक हात सहकार्यासाठी तत्पर आहे. त्याचे चार हात म्हणजे चार प्रकारची कर्तव्ये आहेत. ज्ञान, चिंतन, कर्तव्य, अभय ही चार कर्तव्ये सांगितली आहेत. त्याने ज्ञानाचा केलेला अंगीकार सार्थ आहे. म्हणून गणपती अथर्वशीर्षांत ‘ओम गं गणपतये नम:’ हे ज्ञानाचे महत्त्वाचे सूत्र दिले आहे. याचा अर्थ ज्ञानातून विज्ञानाकडे आणि विज्ञानातून आत्मज्ञानाकडे गेले पाहिजे. हा प्रवास विद्या आणि कला यांच्या सहवासातून होतो. आपण कोणतीही विद्या घ्या किवा कोणतीही कला घ्या. त्यात एकाग्रता असली तरच ती आपलीशी होते. ही एकाग्रता ध्यानातून येते. ध्यानातून अभ्यास येतो. अभ्यासातून क्रियाशीलता अंगी बाणली जाते. यातून अभ्यास नवीन होतो. आपल्याला नवीन होण्याचा आनंद वाटतो. हा आनंद संवादातून आपण सहजपणे इतरांना देतो. याला मोदक देणे म्हणतात. गणेशाला मोदक प्रिय आहेत. मोदकाला पाच कळय़ा असतात. म्हणजे पंचेन्द्रियांच्या एकीकरणातून हा आनंद मोदकाचा आकार घेतो. हे ज्ञान एकवीस प्रकारे देता येते आणि घेता येते. पाच ज्ञानेंद्रिये, पाच कम्रेन्द्रिये = दहा. गुणिले मन + बुद्धी= दोन. वीस + वृत्ती= एकवीस. एकवीस मोदकाची पाळ गणेशाला नवेद्य म्हणून दाखवावयाचे असते.

गणपतीची मानसपूजा प्रसिद्ध आहे. ती अवघड आहे म्हणून लोक सगुण पूजा करतात. मनातील जळमटे निघून जावीत किंवा ती दूर व्हावीत म्हणून गणेशाला दूर्वा वाहतात. पंचखाद्याचा नवेद्य दाखवितात. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध ही इंद्रिये शुद्धरूपाने गणपतीला अर्पण करावयाची म्हणून हे पंचखाद्य असते. कोणत्याही ज्ञानाला मुळात बठक असावी लागते म्हणून गणपती नेहमी आसनस्थ आहे. त्यातून तो असे सुचवितो, ज्याचे ध्यान स्थिर असते त्याचे ज्ञान स्वच्छ असते. त्याला कशाचेही भय नसते. म्हणून गणपतीच्या आसनाची प्रतिमा पूजा करताना आपल्या मनात शुद्ध भावना निर्माण करावयाची असते. ही शुद्ध भावना ज्या तिथीला येते, तिला चतुर्थी म्हणतात. चतुर्थी याचा अर्थ ज्ञानविज्ञानातून आत्मसंवाद हा आहे. म्हणून गणेश चतुर्थी ही चतुर्थी महत्त्वाची मानतात.

महाराष्ट्रात सार्वजनिक गणेशोत्सव १८९३ साली सरदार कृष्णाजी काशिनाथ खाजगीवाले यांनी सुरू केला. तेव्हापासून हा उत्सव मोठय़ा प्रमाणात सुरू झाला. लोकमान्य टिळकांनी या उत्सवाचे महत्त्व स्पष्ट करताना म्हटले, ‘‘कर्तबगारी व करारीपणा प्रत्येकाने दाखविला पाहिजे. राष्ट्रीय गुण अंगी बाणावयाचे असतील तर शिस्त पाहिजे, एकी पाहिजे, प्रत्येक माणसाने आपला हेका सोडून भोवतालच्या लोकांशी मिळतेजुळते वागण्यास शिकले पाहिजे. जुटीने कसे वागावे, शिस्त उत्पन्न करून ती कशी पाळावी, आत्मसंयमन कसे करावे हे गणपती उत्सवापासून शिकता येते.’’ हा उद्देश अर्थपूर्ण होता म्हणून या उद्देशाने लोकमान्यांनी या उत्सवाला महत्त्व दिले. समाजात चतन्य निर्माण करण्यासाठी हा उत्सव होता म्हणून त्या काळात कीर्तने, व्याख्याने, प्रवचने, राष्ट्रीय मेळे असे विविध सुसंस्कृत कार्यक्रम होत सामान्य माणसांशी विद्वानांचा संपर्क येण्याचे गणेशोत्सव हे उत्कृष्ट व्यासपीठ होते.  त्यामुळे गणेशोत्सव म्हणजे ज्ञानाची आणि कलेची पर्वणी होय.

मराठी संतांमध्ये ज्ञानेश्वरांपासून समर्थ रामदासापर्यंत सर्वानी गणेशाचे वर्णन केले आहे. साधू मोरयागोसावी, चिंतामणी महाराज, श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामी, कवी मुक्तेश्वर, कवी श्रीधर, सरस्वती गंगाधर, मध्वमुनिश्वर, कवी मोरोपंत, शाहीर प्रभाकर, शाहीर राम जोशी, शाहीर होनाजी बाळा यांनीही गणेशाचे वर्णन केले आहे.  समर्थ रामदासांनी गणेशाला आपल्यासाठी मनापासून केलेली सुंदर प्रार्थना लक्षणीय वाटते. ती आपल्या पठणात सक्रिय राहिली तर बाहेरचे आवाज बंद होऊन मनातले आवाज एकमेकांना साहाय्य करतील. अशी बुद्धी श्रीगणेशाने द्यावी. ही गणेशाच्या चरणी दोन हात जोडून प्रार्थना.

डॉ. यशवंत पाठक yashavantpathak82@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 8, 2016 4:03 am

Web Title: article on ganesh chaturthi
Next Stories
1 अवघ्या संकुलाचा पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा वसा
2 गणेशोत्सवातील संस्कृती-दर्शन : बुद्धीदेवतेच्या आराधनेसाठी अभ्यासाला सक्तीची विश्रांती
3 Sonali Kulkarni:’माझा बाप्पा माझ्यासारखा एकटा होता’
Just Now!
X