प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तीमुळे होणाऱ्या प्रदूषणाबाबत सरकारपासून सर्वसामान्यांपर्यंत सर्वच जण ओरड करीत असताना इयत्ता नववीमध्ये शिकणाऱ्या एका विद्यार्थ्यांने कागदाच्या लगद्यापासून गणेशमूर्ती साकारून पर्यावरण रक्षणाचा मंत्र जपण्यासाठी खारुताईचा वाटा उचलला आहे. या पर्यवरणस्नेही गणेशमूर्तीच्या प्रचार आणि प्रसाराबाबत पालिकेने मात्र हात आखडता घेतला आहे.

गिरगावमधील विल्सन स्ट्रीटजवळ राहणारा आणि सेंट झेव्हिअर्स बॉइज अ‍ॅकॅडमीमध्ये नववीत शिकणाऱ्या अथर्व देवळेकर लहानपणी मातीपासून गणेशमूर्ती साकारत असे. मातीकामाच्या छंदाची त्याचे वडील अरुण देवळेकर यांनी प्रसिद्ध मूर्तिकार अविनाश पाटकर यांना कल्पना दिली. पाटकर कागदाच्या लगद्यापासूनच मूर्ती साकारतात. अथर्वलाही त्यांनी गेल्या वर्षीपासून गावदेवीमधील कार्यशाळेत मूर्ती घडविण्याचे धडे देण्यास सुरुवात केली. कागदाचा लगदा कसा बनवायचा, त्यापासून मूर्ती कशी साकारायची, रंगकाम कसे करायचे या सर्वाचे प्रशिक्षण घेतले. कार्यशाळेत गणेशमूर्ती कशी साकारली जाते याचे वर्णन त्याने आपल्या बहिणी आदिती आणि आयुशीला सांगितले. दोघींनीही मूर्तीकामातील उत्सुकतेतून कामाला सुरुवात केली. गेल्या वर्षी या तिघांनी आपल्या घरची गणेशमूर्ती साकारली आणि ती सर्वानाच भावली.  काही महिन्यांमध्ये या भावंडांनी आई अपेक्षा यांच्या मदतीने घरीच गणेशमूर्ती साकारण्यास सुरुवात केली.  चौघांनी मिळून कागदाच्या लगद्यापासून २५ गणेशमूर्ती साकारल्या आहे. एक-दीड फूट उंचीच्या  मूर्तीसाठी आकर्षक  पर्यावरणस्नेही रंगांचा वापर केला आहे.

अधिकाऱ्यांची नकारघंटा

गणेशमूर्तीच्या प्रदर्शनासाठी मंडप उभारण्यास परवानगी मिळावी यासाठी देवळेकर कुटुंबाने पालिका कार्यालयात अनेक वेळा खेटे घातले. परंतु नव्या मूर्तिकारांना रस्त्यावर मंडप उभारणी करण्यास परवानगी नसल्याचा नियम पुढे करत अधिकाऱ्यांनी नकारघंटा वाजविली. एरवी पर्यावरणस्नेही गणेशोत्सवाच्या गप्पा मारणाऱ्या पालिकेने तीन लहान मुलांच्या पर्यावरणस्नेही गणेशमूर्तीच्या प्रसारासाठी नियमावर बोट ठेवले. सध्या गिरगावातील एका दुकानात या गणेशमूर्ती उपलब्ध करण्यात आल्या आहेत. यापैकी दोन गणेशमूर्ती अमेरिकेलाही रवाना झाल्या आहे

कागदी लगद्यापासून मूर्ती अशी साकारते..

कागदाचे बारीक तुकडे पाण्यामध्ये भिजवत ठेवायचे. नरम झालेला कागद मिक्सरमध्ये दळून बारीक करून घ्यायचा. त्यात गोंद मिसळून गव्हाच्या पिठाच्या कणकीप्रमाणे ते मळून घ्यायचे. हा लगदा चपातीप्रमाणे लाटून तो गणेशमूर्तीच्या साच्यात थापून त्यावर कागद चिकटवायचा. लगदा सुकल्यानंतर तो साच्यापासून वेगळा करायचा. त्यानंतर साकारलेल्या मूर्तीला अन्य अवयव जोडायचे आणि मूर्तीचा ओबडधोबडपणा घालविण्यासाठी पॉलिश पेपरने घासायची. त्यातून सुबक मूर्ती साकारल्यानंतर रंगकाम केले जाते.