सजावटीच्या साहित्याला मोठी मागणी

प्रत्येकाचे आराध्य दैवत असणाऱ्या गणरायाचा उत्सव काहीच दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्याच्या आगमनाच्या तयारीत प्रत्येक जण गुंतले आहेत. गणेशोत्सवाची तयारी सर्वत्र सुरू असून, बाप्पाच्या सजावटीच्या साहित्याने बाजारपेठ सजली आहे. गणेशोत्सवाच्या पाश्र्वभूमीवर बाजारपेठेत आरास सजावटीला लागणाऱ्या चमकी, सजावटीचे साहित्य, आकर्षक मखरी दाखल झाल्या आहेत. सजावटीच्या साहित्याच्या किमतीमध्ये सुमारे २० ते २५ टक्क्यांनी वाढ झाली असल्याचे वसईतील दुकानदारांनी सांगितले.

अवघ्या १५ दिवसांनी बाप्पांचे आगमन होणार असल्यामुळे साहित्य खरेदी करण्यासाठी बाजारात गणेशभक्तांची लगबग दिसून येत आहे. वसईतील झेंडा बाजार, आनंदनगर येथे फुले मार्केट, विरार मार्केट सजावाटीचे साहित्य खरेदी करण्यासाठी ग्राहकांची मोठी गर्दी होत आहे. संपूर्ण परिसर आकर्षक चमकी व मखरींनी व्यापलेला आहे. दरवर्षी अनेक प्रकारचे मखर बाजरात येतात. बाजारात विविध प्रकारांमध्ये मखरी उपलब्ध असून गणेशोत्सव काळात फुलांच्या मखरींना मागणी वाढली आहे.

किमतीत किरकोळ वाढ

थर्माकोलच्या मखरी बाजारात १३०० रुपयांपासून सुरुवात असून ते ६५०० रुपयांपर्यंत उपलब्ध आहे. प्लॅस्टिक फुले २५ ते २५० रुपये, हार ३० ते २५० रुपये, छोटी कलात्मक झाडे ५० ते ५०० रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. या वर्षी सजावटीच्या साहित्याच्या किमतीत किकोळ वाढ झाली असली तरी मागणीमध्ये वाढ होत आहे.

ऑर्डरप्रमाणे मखर तयार केले जात असल्याने या मखरींना मोठय़ा प्रमाणावर मागणी आहे.

-मिंटू बेरा, छोटू फ्लॉवर्स.