बाप्पाच्या आगमनास काही दिवसांचा कालावधी शिल्लक असताना त्याच्या स्वागताची जय्यत तयारी सर्वत्र सुरू आहे. बाप्पाच्या स्वागताची तयारी करताना मूर्ती खरेदीपासून अनेकांचा श्रीगणेशा होतो. मूर्ती खरेदी करताना पीतांबर नेसलेली पेशवाई मूर्ती सर्वाना आवडते. मात्र त्यातही ‘भाव तसा देव’ या उक्तीनुसार अनेकांकडून कालानुरूप बदलत गेलेल्या गणेशाच्या विविध रूपांना प्राधान्य दिले जात आहे. यंदा बाजारपेठेत गणेशमूर्तीवर पेशवाईचे गारुड आहे. मागील वर्षांच्या तुलनेत दरही काही अंशी कमी असल्याने व्यापारी तसेच बाप्पाच्या भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
५ सप्टेंबरला गणपती बाप्पा वाजत गाजत घरात विराजमान होणार आहे. त्याचा आगमनाचा दिवस लक्षात घेता वेगवेगळ्या मूर्ती बाजारपेठेत दाखलही झाल्या आहेत. शहरात पेण, पनवेल, कोकणसह अन्य ठिकाणाहून मूर्ती येतात. तर नाशिकमधूनही काही मूर्तिकारांच्या मूर्ती परदेशी जातात. मागील वर्षी कुंभमेळ्यामुळे गणेशमूर्तीच्या वाहतुकीस काही अंशी र्निबध घालण्यात आले होते. त्यामुळे बाजारपेठेत मूर्तीचे प्रमाण कमी राहिले. याचा परिणाम मूर्तीच्या किमतीवर झाला.
अगदी छोटय़ा मूर्तीसाठी भाविकांना २०० रुपये मोजावे लागले. यंदा मात्र चित्र पालटले आहे. वाहतुकीवरील र्निबध उठल्याने वेगवेगळ्या ठिकाणाहून गणेशाच्या मूर्ती बाजारपेठेत दाखल झाल्या आहेत. कच्चा माल, इंधनाचे दर, कारागिरी याचे दर कमी असल्याचा परिणामही किमतीवर झाला. वेगवेगळ्या ठिकाणाहून मूर्ती आल्याने प्रदेशानुरूप त्यात विविधता असून मागील वर्षांच्या तुलनेत किमती दहा ते वीस टक्क्यांनी उतरल्या असल्याचे वृंदावन आर्टच्या ज्ञानेश्वर रोकडे यांनी सांगितले. मात्र मूर्तीची कारागिरी आणि कौशल्यावर या किमती अवलंबून असल्याचे ते आवर्जून सांगतात. मूर्तीचे दर साधारणपणे उंची व कलाकुसरीनुसार २०० रुपयांपासून २५ हजार रुपयांपर्यंत आहेत.
श्री विश्वास कलादालनचे संदीप विश्वास यांनी हाच मुद्दा पकडत मूर्तीच्या वैविध्यतेकडे लक्ष वेधले. बाजारपेठेवर यंदा पेशवाईचे गारुड असून लालबागच्या राजानंतर बाजीराव, पेशवाई पद्धतीच्या गणरायाला विशेष मागणी आहे. यानंतर गोविंदरूप, बालाजी, स्वामी समर्थ वेशातील, दगडुशेठ हलवाई यासह अन्य रूपातील गणेशमूर्ती पाहावयास मिळतात. बच्चे कंपनीमध्ये बाप्पाचे असलेले प्रस्थ पाहता, त्यांच्यासाठी खास दुचाकीवर विराजमान, सायकलस्वार, मृदंगावर ताल धरणारा गणराय यासह बैलगाडी चालविणारा गणपती अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे. मूर्तीमध्ये वैविध्यता असली तरी ती आकर्षक दिसावी यासाठी मूर्तिकारांनी अंतिम हात फिरल्यानंतर खास मूर्तीवर कुंदनचे काम करण्यात येत आहे. प्रत्येकाला गणरायाला आभुषणाने सजविता येते असे नाही. यासाठी रत्नजडित, हिरेजडित असा गणराय कुंदन कलाकुसरीच्या सहकार्याने सजत आहे. या कारागिरीचा आर्थिक बोजाही ग्राहकांना सहन करावा
लागत आहे. मूळ किमतीच्या दुप्पट किंवा तिप्पट रक्कम या
कलाकुसरीसाठी मोजावी लागते. मात्र मूर्तीची आकर्षकता पाहून ग्राहक किमतीकडे कानाडोळा करत असल्याने साईराज आर्ट्सच्या राकेश मोरे यांनी सांगितले.