20 February 2019

News Flash

भांडुपमध्ये पर्यावरणपूरक गणेशमूर्तीची दशकपूर्ती

गेले नऊ वर्षांपासून जपलेले पर्यावरण प्रेम दहाव्या वर्षीही कायम असून अनेकांसाठी ते आदर्श ठरले आहे.

कागदी लगद्यापासून साकार झालेल्या गणेश मूर्ती

उत्सवातील पर्यावरणाचा ऱ्हास थांबविण्यासाठी आता तरुणांनी पुढाकार घेतला आहे. अशाच भांडुप येथील दोन उच्चशिक्षित तरुण कलाकारांनी कागदाच्या लगदापासून श्री गणेश मूर्ती बनविल्या असून या मूर्तीना गणेश भक्तांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. गेले नऊ वर्षांपासून जपलेले पर्यावरण प्रेम दहाव्या वर्षीही कायम असून अनेकांसाठी ते आदर्श ठरले आहे.  पर्यावरणाला घातक प्लॅस्टर ऑफ पॅरीसच्या मूर्तींना पर्याय म्हणून लगद्यापासून बनविलेल्या मूर्ती बाजारपेठेत आणल्या आहेत.

भांडुप पश्चिम येथील गणेश नगरमध्ये भूषण कानडे आणि त्याचा मित्र महादेव आंगणे पर्यावरणपूरक गणपती घडवण्याचा ध्यास जोपासत आहेत. भूषणचे वडील मनोहर कानडे यांचा हा ५० वर्षांपेक्षा जास्त असा मूर्ती कलेचा व्यवसाय आहे. त्यांच्या चित्रशिल्प आर्ट कार्यशाळेत महादेव आंगणे हा भूषणचा मित्र त्याला नोकरी सांभाळून मदत करतो. रद्दी कागदाच्या लगद्यापासून मूर्ती बनवण्याची कला शिकल्यावर दोघांच्या मनात पर्यावरणाला पूरक गणेश मूर्तीचाच व्यवसाय करण्याचा विचार आला. त्यांच्या कार्यशाळेत एक फूटापासून अडीच फुटापर्यंतच्या मूर्ती आहेत. यावर्षी एक सहा फुटाचीही मूर्ती त्यांनी घडवली आहे. या मूर्ती साधारणपणे एक ते दीड किलो वजनाच्या असून बारा-तेरा वर्षांचा मुलगा त्या सहज उचलू शकतो, इतका त्या वजनाने हलक्या आणि काही तासात त्या पाण्यात विरघळतात. मूर्तीचे साचे ते स्वत तयार करतात हे विशेष.

या मूर्तीत ९७ टक्के कागद वापरण्यात येतो. तर खडूची पावडर, वनस्पतीचा डींक आणि केवळ २ टक्के रासायनिक मिश्रण असलेला सोनेरी रंग मुकुटाला आणि आभूषणांना दिला जातो. १०० मूर्तीपकी ४० मूर्तीची नोंदणी झाली आहे. गेल्या वर्षी या कार्यशाळेतील एक मूर्ती दक्षिण आफ्रिकेला आणि दोन गुजरातपर्यंत गेल्या होत्या. भूषणने केमिकल इंजिनीअरची पदवी घेतली असली तरी पर्यावरणाबाबत तो सजग आहे. उत्सवी जगात लोक स्वस्तात मिळणाऱ्या पीओपीच्या मूर्ती आणून पर्यावरणाची हानी करीत असतात, अशी खंत त्याने व्यक्त केली. सध्या या कलेसाठी जागेची समस्या भेडसावत असल्याची व्यथाही त्याने मांडली.

First Published on September 3, 2016 2:46 am

Web Title: environmental free ganpati idol in bhandup