आभूषणांनी सजलेल्या मूर्तीना उरणमध्ये वाढती मागणी
गणेशोत्सव काही दिवसांवर आल्याने गणेशमूर्ती साकारणाऱ्या कारखान्यातून मूर्तीवर अखेरचा हात फिरवला जाऊ लागला आहे. उरणच्या करंजामध्ये एका कारखान्यात सजावटीसह आकर्षक मूर्ती तयार केल्या जात आहेत. यात गणेशभक्तांच्या मागणीनुसार सुबक मुकट, भरजरी पितांबर, हिरे, माणिक, मोतींच्या दागिन्यांची सजावट करून या मूर्ती तयार केल्या जात आहेत. त्यामुळे मूर्तीच्या किमतीत आकारानुसार एक ते दीड हजार रुपये अधिक खर्च येत आहे. अशा मूर्तीना गणेशभक्तांकडून मागणी वाढली आहे.
गणेशोत्सवात गणेशमूर्तीच्या सजावटीचे काम वेगळे करावे लागते. त्यासाठी प्रत्येकजण आपापल्या आवडी निवडीनुसार बाजारातून दागिने मुकुट आणून मूर्तीची सजावट करतात. मात्र मागील काही वर्षांपासून उरण तालुक्यातील डुकरे यांच्या गणपती कारखान्यात शाडू मातीच्या मूर्तीसह तिची आकर्षक सजावटही करण्यात येते. त्यासाठी खास मागणी असल्यास मूर्तीला मातीचा पितांबर न करता, भरजरी कापडाचा पितांबर तयार नेसविला जातो. तसेच सोंडेवर हिरे मोती, बाजू बंध, तोडे, मुकुटावर नक्षीकाम करून त्याची सजावट केली जाते. श्रीगणेश कला मंदिरचे मालक शंकर डुकरे यांनी ५२ वर्षांपूर्वी या कारखान्याची सुरुवात केली. या कारखान्यात शंभर टक्के शाडू मातीच्याच पर्यावरणस्नेही मूर्ती तयार केल्या जातात. संपूर्ण सजावट केलेल्या मूर्तीना मुंबई, ठाणे, नागोठणे, मानखुर्द आदी ठिकाणांवरून जास्त मागणी आहे. तर मातीच्या मूर्तीबरोबरच याची मागणी केल्यास केवळ १ हजार ते दीड हजार रुपयांचीच वाढ होत असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.