असं म्हणतात देव चराचरांत वसलेला आहे. तो कोणत्याही रूपात माणसासमोर उभा राहतो. चौसष्ट कलांचा अधिपती गणपतीचीही अनेक रूपे आहेत. मात्र, ही सर्व रूपे पारंपारिक व धार्मिक आहेत. सामाजिक रूपातही गणपती आपल्याला दर्शन देऊन आपल्यात सामाजिक जाणीव निर्माण करू शकतो! ही संकल्पना थोडी नवीन वाटते ना!

ही संकल्पना राबवली आहे लोअर परळच्या ‘पंचगंगा सार्वजनिक उत्सव मंडळा’ने. या मंडळाने गणपतीची तब्बल १०८ रूपे तयार केली आहेत. या १०८ रूपांना परंपरेसोबतच सामाजिक संदेशाचीही जोड आहे. या मंडळाचे कला दिग्दर्शक ‘सुमीत पाटील’ यांच्या डोक्यात ही संकल्पना आली. समाजातील अशा काही दुर्लक्षित घटकांना आणि विषयांना घेऊन त्यांनी हे गणपती तयार केले.

संपूर्ण जगाच्या सुरुवातीचा काही काळ म्हणजे अश्मयुग. दगडात देव शोधणाऱ्या माणसाला दगडाचा देव ही संकल्पसंपूर्ण जगाच्या सुरुवातीचा काही काळ म्हणजे अश्मयुग. नासुद्धा त्याच काळाने दिली असावी म्हणूनच त्या काळाचं प्रतिनिधित्व करणारा दगडात कोरलेला होळकर शैलीमधील गणपती खास कर्नाटकहून मागवून तो विराजमान करण्यात आला आहे. याच गणपती बाप्पाच्या गोष्टी लहानपणी आपल्याला जे आजी-आजोबा सांगायचे ते मात्र वृद्धाश्रमात असतात. अशाच ‘आनंदवन’ आणि ‘शांतिवन’मधील काही आजी-आजोबांनी मिळून एक गणपती तयार केला आहे. ‘आजीबाईच्या बटव्या’मध्ये जे काही आयुर्वेदिक औषधी पदार्थ असायचे त्या सगळ्यापासून याची निर्मिती करण्यात आली आहे. त्याचसोबत येथे ‘नाण्यांचा गणपती’देखील आहे. लहानपणापासून जे एक एक नाणं जमवून मुलांना मोठं केलं तीच पुढे वृद्धाश्रमात टाकून गेलीत. याच नाण्यांना श्रीस्वरूपात आणणारा बाप्पा ‘किंमत सांगणारा देव’ म्हणून शोभून दिसतो. महाराष्ट्रात ‘स्वतंत्रापूर’ नावाचे ठिकाण आहे, जेथे गुन्हेगारी पाश्र्वभूमीच्या बायका एकत्र राहतात. पण त्यांनाही मन असतं. त्या स्त्रियांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ‘बांगडय़ा-टिकल्यापासून’ केलेला गणपतीही विशेष आहे. वारली समाजाचं प्रतिनिधित्व करणारा आदिवासी वाद्यांपासून साकारलेला गणपती असो किंवा कर्णबधिर मुलांनी केलेला ‘भोंग्या’पासूनचा गणपती असो, प्रत्येक गणपती त्या त्या समाजघटकाबद्दलचा उपहासात्मक संदेश आपल्याला देतोय, असा भास होत राहतो. प्रत्येक गणपती स्वतंत्र सामाजिक संदेश देतो. मग तो ‘भ्रष्टाचार थांबवा’ दाखवणारा ‘खुर्चीचा गणपती’ असो किंवा ‘वाहतुकीचे नियम पाळा’ असं सांगणारा ‘हेल्मेटधारी गणपती.’ ‘सेलिब्रिटी बाप्पा’सुद्धा अशा वेळेस सामाजिक संदेश देण्यास सरसावतो. मराठीतील दिग्दर्शक विजू माने यांनी चित्रपटांची पायरसी थांबवा म्हणणारा सीडीचा गणपती तयार केला आहे तर विनोदी कलाकार ‘कुशल बद्रिके’ने ‘हसा आणि हसवत राहा’ म्हणणारा गणराय तयार केलाय.

गणपतीची ही अनेकविध रूपं पाहिली की हरखून जायला होतं आणि आपल्या आजूबाजूला असणाऱ्या प्रत्येक गोष्टीत गणरायाचं दर्शन घडतं. या संदर्भात या कला दिग्दर्शक सुमीत पाटील म्हणतो, ‘‘समाजात असे अनेक दुर्लक्षित घटक आहेत जे आपल्याला उघडपणे दिसूनसुद्धा आपण त्याकडे डोळसपणे दुर्लक्ष करतो. त्यासाठी ‘बाप्पा’ हे एक माध्यम आहे. म्हणूनच आम्ही ‘बाप्पा लक्ष असू द्या,’ असं साकडं घालतोय.’’

गणरायाची अशी अनेकविध सामाजिक रूपं पाहताना आपल्यातलं सामाजिक कुरूपपण आपोआप गळून पडतं आणि भावनांनी रूपवान होण्यास मदत होते.