गणेशोत्सवासाठी पर्यावरणपुरक मखरांना मागणी वाढत असतानाच चित्रकारांनी रंगवलेल्या पडद्यांच्या मखराची परंपराही कायम आहे. उरण तालुक्यात आजही चित्रकारांकडून कापडावर निसर्गचित्र काढून घेतली जात आहेत. हे पडदे मखर म्हणून तसेच चलचित्रासाठी वापरले जात आहेत.

एकीकडे गणेशोत्सवातील झगमगाट, डोळे दिपवणारी रोषणाई, थर्माकोलचे मखर यामुळे उत्सवाचे स्वरूप बदलले असले तरी दुसरीकडे आजही सजावटीची परंपरा कायम ठेवली जात आहे. उरणमधील चित्रकारांकडून दहाबाय आठ इंचाचे पडदे तयार करून घेतले जात आहेत. यात निसर्गचित्र, महल आदी चित्रांना मागणी असल्याची माहिती चित्रकार सुभाष जोशी यांनी दिली. सध्या अशा प्रकारचा पडदा तयार करण्यासाठी लागणारे कापड तसेच पाण्याचे रंग २५ टक्क्य़ांनी महाग झाले आहेत. त्यामुळे या पडद्यांची किंमत वाढली आहे. तीन ते साडेतीन हजार रुपयांत एक पडदा तयार केला जात आहे. परंतु हा पडदा तीन ते चार वर्षे वापरात येत असल्याने दरवर्षीचा सजावटीचा खर्च वाचत असल्याचे उरणमधील गणेश भक्त आत्माराम ठाकूर यांनी सांगितले. मोठीजुई या गावात आजही गणेशोत्सवात घरोघरी अशा सजावटीच्या स्पर्धा भरविण्यात येत असल्याची माहिती रमाकांत पाटील यांनी दिली. उरण तालुक्यातील अनेक गावांतील घरांत बांबूच्या काठय़ा वापरून त्याच्यावर नक्षीकाम केले. रंगीबेरंगी कागदाची सजावट करण्याची परंपरा होती. ती सध्या बंद पडू लागली आहे. कागदावर कोरीव काम करणाऱ्या कारागिरांची संख्या रोडावली आहे.