21 February 2019

News Flash

‘अर्बन हाट’मध्ये गणेश मेळा

हस्तकले पासून कलात्मक गृहोपयोगी वस्तुंचा बाजार येथे थाटण्यात आला आहे.

कलात्मक गृहोपयोगी वस्तूंची उपलब्धता

संस्कृती आणि कलेची परंपरा जोपासना करणाऱ्या गणेश मेळा सीबीडी बेलापूर येथील ‘अर्बन हाट’ मध्ये सुरू झाला आहे. हस्तकले पासून कलात्मक गृहोपयोगी वस्तुंचा बाजार येथे थाटण्यात आला आहे. महिला बचत गटातील वस्तुंना बाजारपेठ मिळवून देण्याबरोबरच भारतीय संस्कृतीचे दर्शन या मेळ्यातून होत आहे. सोमवारी गणरायाचे आगमन होत आहे; परंतु मखर सजावटीसाठीची लगबग अद्यापही सुरू आहे. अशा आकर्षक मखरीसाठी लागणारे साहित्य येथे मांडण्यात आले आहे. यासाठी फुलाच्या शोभेच्या वस्तू, झुंबर विक्रीसाठी आहेत. देशभरातील खेडय़ापाडय़ांमधील लोकजीवनाचा स्पर्श झालेली हस्तकला आणि त्यातून  तयार करण्यात आलेल्या वस्तू खरेदीसाठी नागरिकांची झुंबड उडाली आहे.

यात शिल्पकला, हातमाग, हस्तकला यांचा समावेश आहे. चिमुकल्यांसाठीच्या आकर्षक कपडय़ांची बाजारपेठ येथे आहे. खेळण्यातील हत्ती आणि घोडय़ांचा यात समावेश आहे. महिलांसाठी हातमागावरील साडय़ा, पंजाबी वस्त्रप्रावरणे, पोती, कुडता, पायजमा यांची उपलब्धता येथे आहे. करवंटय़ापासून बनवलेली गणेशमूर्ती, ‘टाकाऊपासून टिकाऊ’ या संकल्पनेतून शोभेच्या अनेक वस्तू बनविण्यात आल्या आहेत.

महिला बचत गटाच्या माध्यमातून घरगुती पाककला, मालवणी, कोल्हापुरी जेवणाचा आस्वाद घेण्याची संधी येथे खवय्यांना आहे. खमंग शाकाहारी पदार्थाचीही रेलेचल येथे आहे. महिलांनी मसाल्याचे पदार्थही विक्रीसाठी आहेत. यात सोरटे, लसूण आणि शेंगदाणा चटण्यांचा समावेश आहे. नारळाच्या छिलक्यापासून बनलेल्या शोभेच्या वस्तू हे येथील आकर्षण आहे.

यात पादत्राणांचा समावेश आहे. महाराष्ट्रासह मध्यप्रदेश, ओडिसा, आंध्रप्रदेश, झारखंड, बंगाल, उत्तर प्रदेश, कर्नाटक, राजस्थान छत्तीसगड, पश्चिम बंगालमधील कारगिरांनी बनवलेल्या वस्तू येथे आहेत.

First Published on September 3, 2016 1:01 am

Web Title: ganpati festivals exhibition in navi mumbai