पुण्याच्या धर्तीवर मीराभाईंदर महापालिकेचा अनोखा प्रयोग; विसर्जनानंतरच्या गाळाचा उपयोग खतासाठी

पर्यावरणाच्या रक्षणासाठी कृत्रिम तलांवाची योजना प्रत्यक्षात उतरली नसली तरी घरगुती गणपतींसाठी पर्यावरणपूरक विसर्जन योजना राबविण्याचा निर्णय मीरा-भाईंदर महानगरपालिकेने घेतला आहे. या योजनेनुसार गणेशभक्तांना मूर्तीचे घरच्या घरीच विसर्जन करणे शक्य होणार आहे. पुण्यात हा प्रयोग यशस्वी ठरला असल्याने महानगरपालिका त्याची मीरा-भाईंदरमध्ये अंमलबजावणी करणार आहे.

गणेशमूर्तीसाठी वापरण्यात येणारे प्लॅस्टर ऑफ पॅरिस अर्थात कॅल्शियम सल्फेट हे पाण्यात सहजासहजी विरघळत नाही. गणेशमूर्ती विसर्जित केल्यानंतर वर्षांनुवर्षे त्या पाण्यात तशाच रहातात. यात पर्यावरणाला धोका निर्माण होतोच, शिवाय मूर्तीसाठी वापरण्यात आलेल्या रासायनिक रंगांमुळे जलसृष्टीलाही मोठी हानी पोहोचते. यासाठी कमिन्स इंडिया लिमिटेड यांनी राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सहकार्याने गणेशमूर्तीच्या पर्यावरणपूरक विसजर्नाचा उपाय शोधून काढला आहे. प्लॅस्टर ऑफ पॅरिसचे बेकरीत वापरण्यात येणाऱ्या खाण्याच्या सोडय़ात अर्थात अमोनियम बाय काबरेनेटमध्ये शास्त्रीय पद्धतीने विघटन करणे सहज शक्य असल्याचे राष्ट्रीय प्रयोगशाळेतील संशाधकांनी शोधून काढले आहे. याचाच उपयोग करून कमिन्स इंडिया या संस्थेने गणेशमूर्तीच्या विसर्जनाची पद्धत विकसित केली आहे. पुण्यात हा प्रयोग यशस्वी ठरला आहे. त्यामुळे मीरा-भाईंदरमध्ये त्याची अंमलबजावणी करण्याच्या दिशेने महापालिका प्रयत्नशील आहे. विसर्जनासाठी लागणाऱ्या या रसायनाची किंमत साधारणपणे १४ ते १५ रुपये किलो असून  महापालिका ते कमिन्स इंडियाकडून विकत घेणार आहे आणि गणेश भक्तांना ते मोफत उपलब्ध करून देणार आहे. महापालिकेच्या सर्व प्रभाग कार्यालयात ते उपलब्ध असेल.

कशी आहे विसर्जन पद्धत?

  • मूर्तीच्या उंचीची बादली घेऊन त्यात मूर्ती पूर्ण बुडेल एवढे पाणी घ्यायचे.
  • त्यात साधारणपणे मूर्तीच्या वजनाएवढा खायचा बेकरी सोडा (अमोनियम बाय काबरेनेट) घालून मिश्रण चांगले ढवळून घ्यायचे.
  • गणेशमूर्तीवरील निर्माल्य तसेच सजावटीच्या वस्तू बाजूला करून मूर्ती त्यात विसर्जित करायची.
  • दर दोन ते तीन तासांनी मिश्रण ढवळायचे.
  • ४८ तासांत मूर्ती पूर्णपणे पाण्यात विरघळते.
  • बादलीत स्थिर झालेले पाणी म्हणजे अमोनियम सल्फेट हे उच्च प्रतीचे खत असून त्याचा बागेतील झाडांसाठी उपयोग करता येतो.
  • या मिश्रणातून तयार होणाऱ्या वायूचा अजिबात त्रास होत नाही.

मीरा-भाईंदरमध्ये दरवर्षी १५०००हून अधिक घरगुती गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यात येते. त्यांनी पर्यावरण रक्षणासाठी ही पद्धत अवलंबावी. सध्या घरगुती गणेशमूर्तीसाठी ही पद्धत राबविण्याचा प्रयत्न असला तरी सार्वजनिक गणेशमूर्तीसाठीदेखील त्याचा उपयोग करण्याचा प्रयत्न आहेत.

-गीता जैन, महापौर, मीरा-भाईंदर