23 February 2019

News Flash

गणेशाच्या स्वागतासाठी बाजारपेठ फुलली

मुंबईसह उपनगरात गणेशोत्सवाची लगबग सध्या सुरू झाली आहे.

गणेशभक्तांची सजावट खरेदीला सुरुवात

दहीहंडी पाठोपाठ गणरायाच्या आगमनाची चाहूल लागल्याने मुंबईतील बाजारपेठा आकर्षक सजावटीच्या साहित्याने बहरून गेल्या असून सजावटीसाठीच्या झालर पडदे, कंठी, मखर, भक्ती गीतांच्या सीडी, दिव्यांच्या माळा आदींच्या खरेदीसाठी गर्दी उडत आहे. विशेषत दादर येथील रानडे रस्ता, छबिलदास रस्ता हे सजावटीच्या साहित्य विक्रीने फुलून गेल्याने येथे खरेदीसाठी नागरिकांची झुंबड उडाल्याचे चित्र दिसते आहे.

मुंबईसह उपनगरात गणेशोत्सवाची लगबग सध्या सुरू झाली आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे न्यायालयाच्या निर्णयामुळे नाराज असली तरी घरगुती गणेशोत्सवासाठी नागरिक मात्र उत्साहाने खरेदीला रस्त्यावर उतरले आहेत. मुंबईतील लालबाग, मस्जिद बंदर, दादर सारख्या भागात मुंबई, ठाण्यातील गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांची आणि घरगुती गणेशमुर्ती बसवणाऱ्यांची मोठय़ा प्रमाणात बाजारात रीघ लागली आहे.

लालबागमध्ये झालरी व झेंडे..

लालबाग भागात गणपतीच्या सजावटीसाठी कारागीर स्वत: हाताने आकर्षक झालरी तयार करत आहे. याची किंमत ६०० रुपयांपासून ते ३००० रुपयांच्या घरात आहे. झालरी टिकल्यांपासून बनवलेल्या, नक्षीकाम केलेल्या, व्हेलवेट अशा अनेक प्रकारात उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे रंगबेरंगी कापड देखील येथे २०० रुपयांपासून मिळत आहेत. तसेच मिरवणूकीसाठी लागणाऱ्या भगव्या झेंडय़ांची देखील मोठय़ा प्रमाणात येथे विक्री होते. यात शिवाजी महाराजांचे अर्धमुख चित्र असलेला झेंडय़ाची सर्वांत जास्त मागणी आहे. यात मोठय़ा झेंडय़ाची किंमत ३०० रुपये आहे. याचप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारचे दिवे, तोरणे, जादुई नळ अशा वेगवेळ्या शोभेच्या वस्तू बाजारात आल्या आहेत. त्यांची किंमत बाजारात ५० रुपयांपासून ते ३५०० रुपयांपर्यंत आहे. गणपतीसाठी कंठीमाळ, मोत्यांचे हार, बाजूबंध, गौरीसाठीच्या माळा, मुकूट, रंगीबेरंगी खडय़ाचे हार, मुकुट, मोत्याची बीगबाळी, चुनरी, छोटे उंदीर, जास्वंदाची फुले, मोदक अशा अनेक वस्तूही येथे विक्रीला असून हातांनी बनवलेल्या या वस्तूंना विशेष मागणी आहे. या कंठी बाजारात १३० रुपयांपासून ते २००० रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. दरम्यान, गणेशोत्सव जवळ आल्याने बाजारात आम्ही मागणी प्रमाणे झालर, भगवे फेटे, झेंडे अवघ्या १० दिवसांत गणेशभक्तांसाठी उपलब्ध करुन देत आहोत, सध्या मंडळांपेक्षा चाकरमानी खरेदीसाठी जास्त येत असल्याचे मयुरेश ड्रेसवाला या दुकानाचे मयुरेश शेरला यांनी सांगितले. बाप्पाच्या आभूषणाप्रमाणे आम्ही गणेश भक्तांसाठीही वेगवेगळी आभूषणे तयार केली आहेत. यात रुद्राक्ष माळ, चंद्रकोर, रुद्राक्षमाळा, बाळी असे अनेक साहित्य तयार केले आहेत, असे लालबागच्या प्रती क्रिएशनच्या प्रिती परब यांनी सांगितले.

मखर खरेदी दादरमध्येच

थर्माकोलचे मखर पर्यावरणाला हानिकारक असले तरी आकर्षक असल्याने आजही या मखरांना ग्राहकांची सर्वाधिक पसंती दिसून येत आहे. यासाठी गणेशभक्त मात्र दादरमधील छबिलदास रस्त्यावर ग्राहकांची गर्दी होत असून येथे थर्माकॉलच्या मखराचे किमान १० ते १५ स्टॉल उभे करण्यात आले आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून या मखरांच्या निर्मितीला कारागिरांना सुरुवात केली असून प्रचलित अध्यात्मिक टिव्ही मालिकांमधील गाजलेल्या व्यक्तीरेखांच्या आकाराचे तसेच नेहमीच्या मंदिरांऐवजी महलाच्या आकाराचे मखर येथे दिसून आले. या स्टॉलमध्ये जय मल्हार, शंकर व गणपतीचा मुखवटा, मोठी आकर्षक सिंहासने यांना मागणी असून १ हजार रूपयांपासून ८ हजारापर्यंत येथे मखर विक्रीस उपलब्ध आहेत. दहीहंडीपूर्वी स्वस्त असणाऱ्या या मखरांच्या किमती मात्र दहीहंडी नंतर किमान १ हजार रूपयांनी वाढल्या आहेत. तसेच, आपल्या जुन्या ग्राहकाला फोन व एसएमएस करून तसेच व्हॉट्सअ‍ॅपवर मखरांचे फोटो पाठवून पुन्हा आकर्षित करण्याचा प्रयत्न येथील विक्रेते करताना दिसले.

First Published on September 1, 2016 2:40 am

Web Title: market ready for ganpati festivals