20 March 2019

News Flash

नेदरलॅंड्समध्ये थाटामाटात साजरा झाला गणेशोत्सव

'गणेशोत्सव' साजरा करण्याची संधी मिळणे ही एक आनंदाची पर्वणीच

सौजन्य - डॉ. विश्वास अभ्यंकर

परदेशस्थ भारतीयांसाठी आणि विशेषतः मराठी माणसांसाठी ‘गणेशोत्सव’ साजरा करण्याची संधी मिळणे ही एक आनंदाची पर्वणीच असते. नेदरलँड्स मराठी मंडळाने देखील नेदरलँड्समधल्या मराठी तसेच भारतीय, डच व सुरिनामी-भारतीयांसमवेत १० सप्टेंबरला गणेशोत्सव साजरा केला. सर्व प्रथम पारंपरिक ढोल-ताश्यांच्या गजरात दिमाखदार मिरवणुकीतून ‘श्रीं’चे आगमन झाले. नेदरलँड्समध्ये शिक्षण-व्यवसायानिमित्त स्थायिक मुली व स्त्रियांनी सादर केलेले ‘बर्ची नृत्य’ या मिरवणुकीचे खास आकर्षण ठरले. त्यानंतर पूजा व आरती झाल्यानंतर, ‘नेट न्यूट्रॅलिटी’ विषयक चर्चासत्र भरविण्यात आले आणि त्याचबरोबर लहान मुले व मोठ्या माणसांसाठी खेळ घेण्यात आले. पुरुषांसाठी मेंदी स्पर्धा व स्त्रियांसाठी ‘ठिपक्यांच्या रांगोळी’ची स्पर्धा घेण्यात आली. उत्सवाचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे लहान मुलांसाठी मातीच्या गणेश मूर्ती बनविण्याची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. विविध गुणदर्शन व इतर सांस्कृतिक कार्यक्रमांतर्गत जल-पुनर्भरण प्रकल्पासाठी भरीव कामगिरी केल्याबद्दल विनोद कदम यांना पहिल्या ‘रश्मिन’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

एइनदोवनमध्येही गणेशोत्सव उत्साहात

लाडक्या गणपती बाप्पांचे एइनदोवन नेदरलॅंडसमध्येसुद्धा प्रथमच पण थाटामाटात आगमन झाले. या कार्यक्रमाचे आयोजन चर्चच्या सभागृहात करण्यात आले होते. स्वागतासाठी अगदी छोटी मुले, वयोवृद्ध नागरिक आणि डच पाहुणे सर्व उत्साहाने सामील झाले. भरपूर मनोरंजनाचे कार्यक्रम, गाणी व गप्पा यांत सर्व रंगून गेले. रंगबेरंगी नववारीतल्या स्त्रिया व पारंपरिक वेशभूषेतील पुरुषांनी परिसर फुलून गेला होता.
ganpati

netherlands-2

First Published on September 22, 2016 2:48 pm

Web Title: netherlands marathi mandal celebrates ganesh utsav 2016