18 March 2019

News Flash

श्रीगणेश विश्वव्यापी देवता

श्रीगणेश ही आदिदेवता मानली गेली आहे. कोणत्याही मंगल कार्याची सुरुवात गणेश पूजनानेच होते

श्रीगणेश ही आदिदेवता मानली गेली आहे. कोणत्याही मंगल कार्याची सुरुवात गणेश पूजनानेच होते. या दैवताबद्दल सर्वाच्याच मनात खूप कुतूहल असते. गणेशाची विविध रूपे, त्याच्या जन्माविषयीच्या विविध पुराणकथा, त्याचे अतुलनीय पराक्रम, त्याचे विघ्नहारक, मंगलदायक म्हणून सर्वामध्ये मान्य झालेले रूप, त्याची जगन्मान्यता याविषयी माहिती करून घेण्याची सर्वाचीच इच्छा असते.

गणेश दैवतविषयक वाङ्मय संस्कृतमध्ये फार मोठय़ा प्रमाणावर आहे. त्यात गणेशपुराण आणि मुद्गलपुराण हे दोन प्राचीन ग्रंथ महत्त्वाचे आहेत. अठरा महापुराणांपैकी पद्म, भविष्य, वराह, लिंग, शिव, गरुड, ब्रह्म, ब्रह्मवैवर्त, स्कंद, अग्नी आणि नारद या अकरा महापुराणांमध्ये गणेशविषयक उल्लेख आलेले आहेत.

गणेशाचा प्रत्येक युगात अवतार झाला आहे आणि त्या त्या युगात तो भिन्न भिन्न नावाने ख्यात आहे. गणेश शब्दब्रह्म ओंकाराचे प्रतीक आहे. गणेशाची प्राचीनता वेदकाळाइतकी मागे जाते. गणपती हे नाव वैदिक वाङ्मयात आलेले आहे. गणपती या शब्दाचा स्पष्ट उल्लेख ज्यात आहे असे ऋग्वेदाचे प्रसिद्ध सुक्त म्हणजे ‘गणानां त्वा गणपति..’ होय. शुक्ल यजुर्वेदात ‘नमो गणेभ्यो गणपतिभ्यश्च वो नम:’ असा अनेक गणपतींचा उल्लेख असलेला मंत्र आहे.

गणेशाचा प्रत्येक युगात अवतार झाला आहे आणि त्या त्या युगात तो भिन्न भिन्न नावाने ख्यात आहे. कृतयुगात तो कश्यपपुत्र विनायक आहे तर त्रेतायुगात तो शिवपुत्र असून मयूरेश्वर या नावाने विख्यात आहे. द्वापारयुगातही तो शिवपुत्र असून तो ‘गजानन’ आहे. कलियुगात धूम्रकेतू या नावाने त्याची प्रसिद्धी होईल. गणेशाची विविध रूपे आहेत. संत ज्ञानेश्वरांनी ‘हे शब्दब्रह्म अशेष’ असे याचे वर्णन केले आहे. समर्थाना त्याचे ‘सगुण रूपाची ठेव’ महालावण्य लाघव असे दर्शन घडले आहे. श्री मोरया गोसावींना ‘पाहता त्रिभुवनी हो। दुजा न देखो नयनी।’ असे वाटले आहे तर गोसाविनंदनांना तो अभ्यवरदा वाटला आहे, असा हा गणेश सर्वव्यापी आहे.

गणेशमूर्ती हा अतिशय गहन आणि विस्तीर्ण असा विषय आहे. आपल्यासमोर प्रचलित परंपरागत गणेशमूर्ती आहे ती चतुर्भुज, लंबोदर, गजमुख अशी. हे ध्यान अथर्वशीर्षांतील वर्णनाशी जुळणारे आहे. वैदिक कालापासून आजपर्यंत या मूर्तीची असंख्य रूपे सापडतात. अंगुष्ठ मात्र मूर्तीपासून पुरुष- दीड पुरुष उंचीपर्यंत सर्व आकार-प्रकारच्या मूर्ती सापडतात. शाडूच्या मातीपासून सुवर्णापर्यंत, काळा, जांभा पाषाण, गार, गंडकी शिळा, पांढरा-हिरवा संगमरवर, सोने, चांदी, कासे, पितळ, तांबे हे धातू, प्रवाळ, माणिक, पाचू इ. रत्ने, शमी- मांदार व इतर काष्ठ असे शेकडो प्रकार गणेशमूर्तीत आहेत. डाव्या सोंडेची व उजव्या सोंडेची हे मूर्तीतील दोन महत्त्वाचे भेद आहेत.

दोन, चार, सहा, आठ, बारा, चौदा आणि अठरा हातांच्या गणेशमूर्ती आहेत. त्यातील चार हातांची ही सार्वत्रिक आढळणारी आहे. दोन हातांच्या गणेशमूर्ती प्राचीन समजल्या जातात. गोकर्ण, इडगुंजी आणि चांदवडजवळ रेणुकादेवीच्या डोंगराच्या पायाशी द्विभुज गणेशमूर्ती आहेत.

याशिवाय कंबोडिया, जावा, बाली, चीन, जपान, सिलोन इथेही दोन हातांच्या मूर्ती आहेत. सुप्रसिद्ध आधासा येथील शमीविघ्नेशाची मूर्ती अष्टभुज आहे.

गणेशाचे एकमुखी हे सार्वत्रिक ध्यान आहे. चतुर्मुखी क्वचितच आढळते. अशी गणेशमूर्ती इंडोचायनामध्ये सापडली आहे. पंचमुखी गणेशमूर्ती बऱ्याच आढळतात. त्रिशुंड गणपती ही मूर्ती पुण्यातील एकमेव दिसते.

गणेशाच्या नृत्यमूर्तीही प्रामुख्याने दक्षिणेकडे आढळतात. म्हैसूरमध्ये होयसळेश्वर मंदिरात असलेली गणेशाची नृत्यमूर्ती अतिशय मनोहर आहे.

अशा विश्व्यापी, विविधरूपी गणेशाची उपासना केवळ भारतात नव्हेतर भारताबाहेर जगातल्या इतर देशांतही पसरल्याचे आढळून येते. उपलब्ध माहितीनुसार नेपाळ, ब्रह्मदेश, लंका, चीन, जपान, अफगाणिस्तानापासून थेट दक्षिण अमेरिकेतील मेक्सिकोपर्यंत गणेशमूर्ती अस्तित्वात असल्याचे आढळून येते. भारतीय संस्कृतीचा प्रभाव पश्चिमेला तुर्कस्तान, उत्तरेला चीन आणि ईशान्येला जपानपर्यंत पसरलेला आहे. परदेशामध्ये अनेक ठिकाणी गणेशाची मंदिरे आहेत. वस्तुसंग्रहालयांमध्ये विविध प्रकारच्या प्राचीन गणेशमूर्ती आहेत. गणेश हे दैवत फक्त हिंदूंपुरतेच मर्यादित नसून सर्व जगात त्याचा प्रभाव आहे. या सर्व देशात गणेशाची रूपे कशी होती, कशी आहेत हे अभ्यासण्यासारखे आहे. फार पूर्वी भारतातून या देशात व पलीकडे थेट चीन व चिनी तुर्कस्तान वगैरे भागात वैदिक संस्कृतीचा प्रचार झाला होता. आपल्या धर्माबरोबरच त्यांनी आपल्या मूर्तीचीही ओळख तिकडच्या लोकांना करून दिली. अलीकडे उत्खननातून ज्या शिला- प्रतिमा किंवा चित्रे इ. सापडतात त्यावरून हे स्पष्ट दिसून येते.

प्राची चिकटे , संपादक, श्री गणेशकोश

First Published on September 9, 2016 4:28 am

Web Title: the significance of lord ganesha