बदलापूरमध्ये तृतीयपंथीयांकडे गणेशोत्सवाची दोन दशकांची परंपरा

सर्व जात, पंथ, धर्मीयांनी एकत्र आणणाऱ्या गणेशोत्सवाचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत आहे. बदलापूरमध्येही त्याची प्रचीती आता येऊ लागली आहे. येथील तृतीयपंथीय श्रीदेवी यांच्या घरीही श्रीगणेशोत्सव उत्साहात साजरा होत आहे. ‘गणपती हाच आमचा रक्षणकर्ता’ हा मनोभाव ठेवून गेल्या २० वर्षांपासून श्रीदेवी यांच्या घरी श्रीगणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठा परंपरेप्रमाणे मोठय़ा उत्साहात केली जात आहे.

शासकीय निर्णयानुसार सर्वाना समान हक्क असला तरी प्रत्यक्षात मात्र अजूनही तृतीयपंथियांना समाज जवळ करताना दिसत नाही.  मात्र असे असले तरी बदलापुरातील श्रीदेवी आणि तिच्या सहकाऱ्यांनी एक पाऊल पुढे येत ज्या समाजाने नाकारले, त्या समाजाच्या उत्सवास आपलेसे केले आणि त्या समाजानेही या तृतीयपंथियांना या उत्सवाने आपलेसे केले आहे.

बदलापुरात अवघ्या दहा बाय दहा फुटांच्या खोलीत राहणाऱ्या श्रीदेवी या गेल्या २० वर्षांपासून गणपतीची आराधना करतात. विशेष म्हणजे परिसरातील भाविक, व्यापारी यांसह मुंबई, ठाणे, नवी मुंबई येथील तृतीय पंथीय समाजातील अनेकजण इथे दर्शनासाठी येत असतात.

घर जरी लहान असले तरी गणपतीला येणाऱ्या भाविकांचा पाहुणचार करण्यात कोणतीही कमतरता ठेवत नसल्याचे श्रीदेवी आवर्जून सांगतात. गणेश चतुर्थीच्या दिवशी रात्री १२ वाजताच गणपतीची प्राणप्रतिष्ठा केली जाते.

तसेच यल्लमा देवीची पूजाही केली जाते. आरतीसाठी आजूबाजूला राहणारी मंडळीही न चुकता हजर असतात. दीड दिवसाच्या गणपती काळात आमच्या परिवारातील सगळे जण एकत्र येऊन एकमेकांना भेटत असल्याने हा  उत्सव आमच्यासाठी खूप आनंदाचा असल्याचे श्रीदेवी यांचे सहकारी स्वाती यांनी सांगितले.

समाज आमच्याकडे एका वेगळ्या नजरेने पाहतो. आमच्यातही असुरक्षिततेची भावना आहे. गणपती हाच आमचा रक्षण करता असून आम्ही त्याच्याकडे सुरक्षित आयुष्यासाठी प्रार्थना करतो, असे श्रीदेवी सांगतात.