गणेशोत्सवात दरवर्षी लक्षवेधक, भव्य-दिव्य सामाजिक, वैज्ञानिक देखावे अनेक मंडळांकडून सादर केले जातात. पण केवळ तेवढय़ावरच न थांबता अंध, अनाथ, सैनिक, पोलीस अशा समाजातील विविध घटकांसाठी उपक्रम राबविणाऱ्या शुक्रवार पेठेतील सेवा मित्र मंडळाने एक नवा आदर्श निर्माण केला आहे. गणेशोत्सवात सामाजिक, प्रबोधनात्मक देखाव्यांबरोबरच वर्षभरात तब्बल ३६ लहान-मोठे उपक्रम या मंडळाकडून नियमितपणे राबविले जातात. समाजाचे आपण काही तरी देणं लागतो, या भावनेतून गणेशोत्सवाच्या व्यासपीठाचा वापर करून राबविलेल्या या मंडळाचे अनेक उपक्रम नावाजले आहेत.

शुक्रवार पेठेतील सेवा मित्र मंडळाकडून सन १९९९ पासून सामाजिक उपक्रमांना प्रारंभ झाला. अनाथ मुलांसाठी ‘मामाच्या गावची सफर,’, अंध मुलींची सहल, अंध मुलींच्या लग्नाचा कार्यक्रम, जवानांसाठी सद्भावना उपक्रम, चित्रकला स्पर्धा, समाजातील उपेक्षित घटकांतील व्यक्तींचा सन्मान असे नानाविध उपक्रम मंडळाकडून हाती घेण्यात येत असल्याची माहिती मंडळाचे कार्यकर्ते शिरीष मोहिते यांनी दिली.

piyush goyal
कर्तबगारीने ‘तेजांकित’ झालेल्यांचा गौरव!
piyush goyal
लखलखत्या तरुण तेजांकितांचा आज गौरव; केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री पियूष गोयल प्रमुख अतिथी
Appointment of financial institution
विरार-बोळींजमधील घरांच्या विक्रीसाठी वित्तीय संस्थेची नियुक्ती
Bajaj Group commits Rs 5000 crore to CSR activities
कौशल्य प्रशिक्षणावर ५,००० कोटी खर्च करण्याची बजाज समूहाची घोषणा

अनाथ मुलांसाठी मामाच्या गावाची सफर या उपक्रमाअंतर्गत शंभर ते सव्वाशे अनाथ विद्यार्थ्यांना तीन दिवस या सफरीचा आनंद मिळतो. उंट, घोडे, बग्गी, विविध खाद्यपदार्थ, पुण्याची छोटी सहल, मान्यवरांच्या भेटी अशा अनोख्या पद्धतीने ही सफर साजरी करण्यात येते. गेल्या अठरा वर्षांपासून हा उपक्रम अखंडितपणे सुरु असून अंध मुलींची सहलही दरवर्षी आयोजित करण्यात येते. विशेष म्हणजे गेल्या दोन वर्षांपासून अंध मुलींची लग्नं लावण्याचा उपक्रमही मंडळाकडून हाती घेण्यात आला आहे. मेंदी कार्यक्रम, साखरपुडा, बॅण्ड, वधू-वरांच्या कपडे खरेदीचा खर्च या मंडळाकडून उचलण्यात येतो. शुक्रवार पेठ हा भाग मिश्र लोकवस्तीचा आहे. त्यामुळे जवानांसाठी सद्भावना रॅलीही आयोजित करण्यात येते. समाजातील सर्व घटकातील लोकांचा सहभाग हे या रॅलीचे वैशिष्टय़ आहे. याशिवाय परिसरातील नागरिकांच्या घरातील नळ दुरुस्तीचा कार्यक्रमही मंडळाकडून सुरु आहे. मंडळाचे अध्यक्ष वैभव वाघ, उपाध्यक्ष सचिन चव्हाण, कार्याध्यक्ष अ‍ॅड. नितीन झंझाड, उपकार्याध्यक्ष गणेश सांगळे, उमेश कांबळे, सचिन ससाणे, विक्रम मोहिते हे पदाधिकारी वर्षभर हे उपक्रम राबवितात.

विधायक उपक्रमांबरोबरच दरवर्षी नावीन्यपूर्ण देखावे सादर करण्याची या मंडळाची परंपरा आहे. यंदाचा ‘हरविलेले बालपण’ हा देखावा लहान मुलांनीच सादर केला आहे. त्यापूर्वी ‘कुमारी माता’, ‘अन्नाची नासाडी’, ‘वाघ बचाव’ असे वैविध्यपूर्ण सामाजिक आणि प्रबोधनात्मक देखावे मंडळांकडून सादर करण्यात आले होते. त्यापैकी अन्नाची नासाडी देखाव्याअंतर्गत शहर आणि परिसरातील औद्योगिक कंपन्यांमध्ये अन्नाची नासाडी न करण्यासंदर्भात पोस्टर्स लावण्यात आली. त्याचा अपेक्षित परिणामही दिसून आला. शार्प या कंपनीकडून या उपक्रमाची दखल घेण्यात आली. तर, एरंडाच्या बियांपासून बायोडिझेलचे प्रात्यक्षिक करून त्याद्वारे तयार झालेल्या विजेवर काही वर्षांपूर्वी गणेश उत्सव साजरा करण्यात आल्याचे शिरीष मोहिते यांनी सांगितले.