28 September 2020

News Flash

दागिन्यांनी अलंकृत ‘तयार’ गौरींना पसंती

गौरी बसविण्याच्या आणि तिच्या पुजण्याच्या निरनिराळ्या पद्धती आहेत.

गौरीपूजेसाठी लागणाऱ्या साहित्याच्या खरेदीसाठी बाजारात गर्दी होत आहे.

घरोघरी आज गौरींचे आगमन

मुखवटा, मुखवटय़ाला साजेशी नथ, गळ्यातील हार, मंगळसूत्र, बांगडय़ा आदी दागदागिन्यांची स्वतंत्रपणे खरेदी करून घरच्या घरीच गौराईला सजवण्या नटवण्याचे दिवस आता मागे पडू लागले आहेत. रोजच्या व्यापातून वेळ नसल्याने आणि आकर्षक पर्याय उपलब्ध झाल्यामुळे बाजारात उपलब्ध असलेल्या अलंकृत गौरी घेण्याला महिलावर्गाची यंदा पसंती मिळत आहे. इतकेच नव्हे तर गणपतीप्रमाणे दुकानातूनच नटलेल्या गौरीला थेट वाजतगाजत घरी नेण्याची प्रथाही रूढ होऊ पाहते आहे.

गणेशोत्सवात गौरींच्या मुखवटय़ांपासून तिची ‘रेडी टू वेअर’ साडी, विविध प्रकारचे आकर्षक अलंकार असा साजशृंगार बाजारात उपलब्ध होतो. गौरीच्या मुखवटय़ाला विकतच्या दागिन्यांनी अथवा घरच्या दागिन्यांनी मढविणे हा घरातील स्त्रियांचा आवडीचा कार्यक्रम. स्त्रिया हे काम अत्यंत प्रेमाने आणि हौसेने करतात. अनेक कुटुंबांमध्ये गौरीकरिता दरवर्षी एक खरा दागिनाही घडविला जातो. परंतु, काळ बदलला तसा या साजशृंगाराकरिताही वेळ मिळेनासा झाला. म्हणून दुकानातच साजशृंगार करून मढविलेल्या गौरीच्या प्रतिमा उपलब्ध करून देण्यात येत आहे.

एकाच छताखाली पूर्ण सजलेली गौराई मिळत असल्याने ती विकत घेऊन घरी जाऊन केवळ तिची स्थापना करणे इतकेच काम भाविकांना उरले आहे. काही ठिकाणी तर अशा तयार गौरीची दुकानातून घरापर्यंत वाजतगाजत मिरवणूकही काढली जाते. ‘पूर्णपणे सजविलेल्या गौरींना मागणी सुरू झाली आहे. मुंबईभरातूनच नव्हे तर कॅनडा, ऑस्ट्रेलियाहून देखील या अलंकृत गौरींना मागणी आहे, असे दादरमधील साडीघरचे गौतम राऊत यांनी सांगितले.

विविध पर्याय

गौरी बसविण्याच्या आणि तिच्या पुजण्याच्या निरनिराळ्या पद्धती आहेत. गौरीचा मुखवटा, हात, पाय असे अवयवाचे भाग बाजारात उपलब्ध आहेत. ते जोडून बसलेल्या किंवा उभ्या गौरी मांडल्या जातात. त्यांना सजवून, नटवून पूजा मांडली जाते. बाजारात गौरीच्या लाकडी, प्लॅस्टर ऑफ पॅरिस, कापडी आणि फायबरच्या अशा विविध प्रकारच्या गौरीचे मुखवटे, अवयव उपलब्ध आहेत. शिवाय गौरीकरिता ‘रेडी टू वेअर’ नऊवारी आणि सहावारी साडय़ाही आहेत. ग्राहकांच्या पसंतीनुसार दागिनेदेखील उपलब्ध करून दिले जातात.

बाजारपेठ बहरली

गौरी पूजनासाठी आवश्यक असलेल्या विविध रान फुला-फळांनी बाजार बहरला आला आहे. गौरीला नैवेद्य दाखविण्याचेही प्रत्येक समाजागणिक वेगवेगळे प्रकार आहेत. अनेक ठिकाणी विविध प्रकारच्या पानांनी सूप सजवून त्यात फळे, गोड, तिखट पदार्थाचा नैवेद्य दाखविला जातो. त्यासाठी लागणारी पाने, विविध रानभाज्या, रानफुले, काकडीची पाने, सुपारी आदींनी बाजार बहरला आहे. दादरमध्ये डहाणू-पालघरवरून आलेल्या आदिवासी स्त्रियांकडे या वस्तूंच्या खरेदीकरिता सोमवारी झुंबड उडाली होती.

५५ हजारांच्या गौरी

‘शिवण’ या लाकडापासून बनविण्यात आलेल्या गौरी वर्षांनुवर्षे टिकतील असा दावा केला जातो. त्यांची किंमत साधारण ५५ हजार रुपयांपर्यंत आहे. लाकडी असूनही मूर्तीच्या शरीराखालील भाग दुमडता येतो. त्यामुळे भाविकांना आपल्या आवडीनुसार गौरी उभ्या अथवा बठय़ा अवस्थेत मांडता येतात. या शिवाय अर्धशरीराच्या पीओपी आणि कापडी मूर्ती ५५० रुपये व फायबरच्या मूर्ती १९ हजारापर्यंत उपलब्ध आहेत. तसेच घटाला लावण्यासाठीचे मुखवटे २५० ते १००० रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 29, 2017 3:20 am

Web Title: arrival of goddess gauri in homes today
Next Stories
1 पर्यावरणस्नेही विसर्जन!
2 उत्सवी धिंगाण्यात गाण्यांचा बाज बदलला
3 लालबागच्या गणपती दर्शनाला तारकामंडळ
Just Now!
X