डॉल्बीला पूर्ण फाटा देत शुक्रवारी सांगली-मिरजेसह जिल्ह्यात आदिनायक गणेशाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. श्रींच्या स्वागत मिरवणुकांमध्ये यंदा ढोल, ताशांचा गजर मोठय़ा प्रमाणात पाहण्यास मिळाला. मिरवणुकीमुळे शहरातील प्रमुख मार्गावर वारंवार वाहतूक कोंडीला तोंड द्यावे लागले. सांगलीतील मारूती रोड, गणपती पेठ, पुष्पराज चौक, विश्रामबाग गणेश मंदिर, मिरजेतील सराफ कट्टा, लक्ष्मी मार्केट आदी मार्गावर वाहतूक बंद करण्यात आली.

बुध्दिदेवता, सुखकर्ता गणेशाचे आज मोठय़ा उत्साहात स्वागत करण्यासाठी गणेशभक्तांची सकाळपासूनच रस्त्यावर गर्दी दिसत होती. सांगलीतील पुष्पराज चौक, विश्रामबाग १०० फुटी, मारूती मंदिर आदी ठिकाणी श्रींच्या मूर्ती विक्रीसाठी मांडण्यात आल्या होत्या. यंदा जीएसटी करामुळे मूर्तीच्या दरात वाढ झाली आहे. मात्र उत्साहापुढे दरासाठी फारसी घासाघीस केली जात नव्हती.

घरगुती गणेशोत्सवासाठी सकाळपासून वर्दळ होती. मूर्तीसाठी आरास करणाऱ्या वस्तूंचीही मोठय़ा प्रमाणात खरेदी करण्यासाठी रस्त्यावर गर्दी होती.  घरातील गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना केल्यानंतर कार्यकर्त्यांनी सार्वजनिक मंडळाच्या मूर्ती आणण्यासाठी लगबग सुरू केली. सजविलेल्या ट्रॅक्टर ट्रॉली, वाहनातून मूर्ती वाजतगाजत नेण्यात येत होत्या. सायंकाळी स्वागत मिरवणुकीची धांदल प्रमुख मार्गावर सुरू होती. मिरवणुकीमध्ये झांज पथक, बेंजो, बॅण्ड, ढोल-ताशा यांचा दणदणाट दुपारपासून सुरू होता.

चित्रशाळेजवळ एकाचवेळी अनेक मंडळाचे कार्यकत्रे जमल्याने गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरयाचा गजर मोठय़ा प्रमाणात होत होता. बहुसंख्य मंडळाकडून कार्यशाळेतच गणेशाची आरती करून मूर्ती सजविलेल्या वाहनात ठेवली जात होती. एका मंडळाची आरती होईपर्यंत दुसऱ्या मंडळाच्या कार्यकर्त्यांना प्रतीक्षा करावी लागत होती. सांगली शहरात सुमारे ३५० आणि मिरज शहरात ४०५ मंडळांनी सार्वजनिक गणेशाची स्थापना केली असून आज केवळ श्रींची प्रतिष्ठापना एवढेच काम केले असून अद्याप देखावे तयार करण्याचे काम हाती घेतलेले नाही. देखावे पाहण्यासाठी गणेशभक्तांना सोमवारनंतर उपलब्ध करून दिले जाण्याची चिन्हे आहेत.

मिरज संस्थानच्या गणेशमूर्तीचे किल्ला भाग येथून मिरवुणकीने स्वागत करण्यात आले. यावेळी पारंपरिक वेषातील गणेशभक्त लक्ष वेधून घेत होते. संस्थान गणेशाची चांदीच्या पालखीतून मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीमध्ये मिरजेचे संस्थानिक पटवर्धन यांचे वारसदार गोपाळराजे पटवर्धन, बाळराजे पटवर्धन आदींसह मान्यवर सहभागी झाले होते.  सांगलीतील सुप्रसिध्द गणेशमंदिराला विद्युत रोषणाई करण्यात आली असून रात्रीच्या अंधारात हे मंदिर लक्ष्यवेधी ठरत आहे. सांगलीतील संस्थानचा गणेशोत्सव पाच दिवसाचा असून मंगळवारी शाही मिरवणुकीने गणेशाचे विसर्जन करण्यात येणार आहे. दरम्यान, तासगावमध्ये उद्या शनिवारी रथोत्सव साजरा होत असून सात मजली रथ आज बाहेर काढण्यात आला. ५०० मीटर अंतरावर असलेल्या काशी विश्वेश्वरा मंदिरापर्यंत हा रथ गणेशभक्त दोरीच्या मदतीने ओढत नेतात. यावेळी रथावर खारिक खोबऱ्याची उधळण भक्तांकडून केली जाते. यासाठी पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला असून आज उपअधीक्षक अमर निंबाळकर यांनी बंदोबस्ताची पाहणी करून आवश्यक त्या सूचना दिल्या. रथोत्सवाच्या मार्गावर उद्या सकाळपासून वाहतूक बंद ठेवण्यात आली असून सांगलीहून विटय़ाकडे जाणाऱ्या वाहनासाठी कॉलेज कॉर्नरवरून बायपास माग्रे भिलवडी नाका ते बस स्थानक या मार्गाचा वापर करावा लागणार आहे.