21 February 2019

News Flash

गणेशोत्सवाच्या माध्यमातून शैक्षणिक संस्थेला मदत

गणेशोत्सवामध्ये शैक्षणिक संस्थेला मदत करण्याचा विधायक उपक्रम मंडळातर्फे राबविण्यात येत आहे.

शनिवार पेठ मेहुणपुरा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्टतर्फे आपुलकीची दिवाळी उपक्रमांतर्गत शाहू मोडक प्रतिष्ठानच्या अध्यक्षा प्रतिभा शाहू मोडक यांच्या हस्ते गरजू विद्यार्थिनींना कपडे देण्यात आले.

गणपती हे बुद्धीचे दैवत. त्यामुळे गरज असलेल्या शैक्षणिक संस्थेला मदत करण्याचा शिरस्ता शनिवार पेठ मेहुणपुरा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्टने सुरू केला आहे. त्याचबरोबरीने लोकमान्य टिळक यांना अभिप्रेत असलेला गणेशोत्सव साजरा करताना मंडळाने विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून समाजाशी नाळ जोडली आहे.

मेहुणपुरा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे १९९१ पासून राष्ट्रीय, सामाजिक, वैज्ञानिक आणि शैक्षणिक विषयांवरील देखावे सादर केले जात आहेत. मंडळ ध्वनिवर्धकाचा वापर करीत नाही. बंदिस्त मंडपामध्ये सादर केलेला देखावा पाहण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना त्या देखाव्याची माहिती देणारे समालोचन ऐकविले जाते. मंडपाबाहेर आवाज जात नाही हे मंडळाच्या देखाव्याचे खास वैशिष्टय़ असते. त्यामुळे रात्री दहानंतर ध्वनिवर्धक सुरू ठेवता येत नसला तरी मंडळाचा देखावा गणेशभक्तांसाठी पहाटेपर्यंत सुरू असतो. यंदा मंडळाने ‘स्मार्ट सिटी’अंतर्गत लक्ष्मी रस्ता आणि नदीपात्रातील रस्ता कसा होऊ शकतो हा देखावा साकारला आहे. मंडळाचे यंदा १२२ वे वर्ष असून सचिन शिंदे हे मंडळाचे अध्यक्ष आहेत. अनंत कावणकर उपाध्यक्ष असून पराग ठाकूर सचिव आहेत. नितीन पिसे, अशोक भगत आणि गिरीश सरदेशपांडे यांच्यासह मंडळाचे युवा कार्यकर्ते विविध उपक्रम यशस्वी होण्यासाठी सक्रिय सहभाग घेतात. गणेशोत्सवामध्ये महिलांचे अथर्वशीर्ष पठण हा उपक्रम गेली १५ वर्षे राबविण्यात येत आहे. शहराच्या विविध भागात वास्तव्यास गेलेल्या मंडळाच्या जुन्या कार्यकर्त्यांचा सहकुटुंब स्नेहमेळावा एक दिवस आयोजित केला जातो. त्या दिवशी या ज्येष्ठ कार्यकर्त्यांच्या हस्ते आरती केली जाते. सर्वानी आणलेल्या प्रसादाचे सेवन म्हणजे भोजनच होत असते.

गणेशोत्सवामध्ये शैक्षणिक संस्थेला मदत करण्याचा विधायक उपक्रम मंडळातर्फे राबविण्यात येत आहे. यंदा रास्ता पेठ येथील उंटाडे मारुती मंदिराजवळील पूर्व प्राथमिक शाळेला अर्थसाह्य़ करण्यात येणार आहे. धुणी-भांडी करणाऱ्या महिलांची मुले या शाळेत शिकत आहेत. शाळेमध्ये विविध सुविधा देण्यासाठी हा निधी प्रदान करण्यात येणार आहे. आपटे प्रशालेचे मूक-बधिर विद्यालय  आणि सर्वसाधारण मुलांबरोबरच विशेष मुलेही शिक्षण घेत असलेल्या कर्वेनगर येथील अभिनव शाळेस यापूर्वी निधी देण्यात आला होता. शहरातील स्वयंसेवी संस्था आणि गणेश मंडळांच्या सहकार्याने श्रीवत्स संस्थेतील मुलांसमवेत वसुबारस सण साजरा करण्यात येतो. यामध्ये मंडळातर्फे श्रीवत्स संस्थेबरोबरच एका संस्थेस अर्थसाह्य़ केले जाते. मंडळातर्फे सीमेवरील जवानांना राखीपौर्णिमेनिमित्त राख्या आणि मकर संक्रांतीनिमित्त तिळगूळ पाठविला जातो.

विधायक या गणेश मंडळांच्या संस्थेतर्फे शनिवारवाडा येथे दिव्याची प्रार्थना हा उपक्रम राबविला जातो. मेहुणपुरा मंडळ या उपक्रमात सहभागी होत किमान दहा विद्यार्थ्यांना नवे कपडे देत आहे. श्री कसबा गणपती मंदिर येथे वीरपत्नी आणि वीरमाता यांच्यासमवेत भाऊबीज उपक्रमामध्ये मंडळाचा सक्रिय सहभाग असतो. देवदासी महिलांसमवेत भाऊबीज साजरी करताना या भगिनींना साडी-चोळी, बांगडय़ा, दिवाळी अंक आणि मिठाई दिली जाते. मंडळ लहान मुलांसाठी दहीहंडी हा उपक्रम राबवीत आहे.

First Published on August 30, 2017 11:04 am

Web Title: educational institutions get help through the ganesh festival
टॅग Ganesh Chaturthi