डॉ. म. के. ढवळीकर यांनी गणेशाची मूळ कथा उलगडली

शैव आणि वैष्णव या पंथांप्रमाणेच गणपतीची उपासना करणारा गाणपत्य हा पंथ आहे. सुखकर्ता आणि दु:खहर्ता अशा गणपतीविषयी केवळ भारतातील सर्वानाच उत्सुकता आहे असे नाही. तर, हिंदूू, बौद्ध आणि जैन या तीन धर्मासह गणेश हा आशिया खंडाचाच सर्वमान्य असा लोकप्रिय देव आहे, अशा शब्दांत ज्येष्ठ पुरातत्त्व अभ्यासक डॉ. म. के. ढवळीकर यांनी गणेशाची मूळ कथा सोमवारी उलगडली.

मानवी देहाला हत्तीचे तोंड ही गणपतीविषयीची आख्यायिका परंपरेनुसार सांगितली जाते. पण, पवित्र हत्ती हेच गणेशाचे मूळ रूप आहे. गज ते गण, गण ते गणेश आणि गणेश ते महागणेश अशा स्वरूपातील गजानन हा हिंदूू दैवतसंप्रदायामधील महत्त्वाचा देव आहे. मुळात विघ्नकर्ता असलेला गणेश पूजा केल्यावर विघ्नहर्ता होतो. त्यामुळे गाणपत्य संप्रदाय निर्माण झाला. त्याच्या लोकप्रियतेमुळे हिंदूू धर्माबरोबरच गणेशाला बौद्ध आणि जैन धर्मातही स्थान मिळाले आणि गणपतीचा साऱ्या आशिया खंडात प्रसार झाला, असे ढवळीकर यांनी सांगितले. या विषयावरच त्यांचा ‘गणेश : द गॉड ऑफ एशिया’ हा ग्रंथ गेल्या वर्षी प्रकाशित झाला आहे.

अफगाणिस्तानमध्ये काबूल नदीच्या खोऱ्यात राहणाऱ्या ‘हास्तिक’ जमातीचे हत्ती हे कुलचिन्ह. भारतीय उपखंडाच्या वायव्येकडील प्रदेशात हत्तीशी निगडित कपिशा (बेग्राम) आणि पुष्करावती (चारसाढा) या गावांच्या नावांवरून येथे हत्ती हा पवित्र प्राणी समजला जात असावा असे वाटते. तक्षशिला येथे शहराच्या मध्यभागात एका मंडपात ठेवलेल्या हत्तीची लोक पूजा करीत असत. अलेक्झांडर हा इसवी सन पूर्व ३२६ मध्ये भारतात आला होता, तेव्हा त्यानेही त्या हत्तीची पूजा केली होती. अ‍ॅलेक्झांडर याचे शिरस्त्राणही हत्तीच्या शिरांचे होते, याची खूण त्याच्या नाण्यांमध्ये दिसते. नंतरच्या इंडो-ग्रीक राजांनी त्याला मानवी रूप दिले. हम्र्यूस राजाच्या नाण्यांवर ते दिसते, असे ढवळीकर यांनी सांगितले.

कुषाणकाळात (इसवी सन १० ते ३००) गणेशाच्या मूर्ती टाक स्वरूपात कोरविण्यात आल्या आणि गुप्त काळात (इसवी सन ३०० ते ६००) त्याला देवत्व प्राप्त झाले. गणेशजन्माच्या कथा रचल्या गेल्या. तो शिवाच्या गणांचा अधिपती म्हणून गणपती झाला. कार्यात यश मिळावे म्हणून गणेशाला आवाहन करण्यात येऊ लागल्याने तो विघ्नहर्ता झाला, असे सांगून ढवळीकर म्हणाले, इसवी सन पाचव्या शतकात प्रतिकूल पर्यावरणामुळे वारंवार दुष्काळ पडू लागला. त्यामुळे शेतीचे उत्पन्न घटले. व्यापार मंदावला आणि भारतीय मंडळी स्थलांतर करू लागली. ते जेथे जेथे गेले, तेथे तेथे त्यांनी विघ्नहर्त्यां गणेशाला सोबत नेले.

चीनमधील तुन् हुआंग लेण्यांमध्ये प्राचीन गणपती इसवी सन ५२६ मधील आहे. जपानमध्येही गणेशाची मंदिरे आहेत. इंडोनेशियामध्ये १५ फूट उंचीचा महागणपती आहे. श्रीलंका, बोर्निया, कंबोडिया येथेही गणपतीची मंदिरे आहेत.