18 February 2019

News Flash

Ganesh Utsav 2017 : माहेरचा गणपती : ‘बाप्पा’सोबत माझी ओळख व्हायची आहे- सोनाली कुलकर्णी

हरवलेला गणेश उत्सव परत मिळावा हीच आशा

सोनाली कुलकर्णी

गल्लीबोळातील अबालवृद्धांपासून ते अगदी कलाविश्वात कार्यरत असलेल्या कलाकारांनाही गणेशोत्सव आपलासा वाटतो. गणेशोत्सव प्रत्येकासाठी बऱ्याच कारणांनी महत्त्वाचा असतो. अशाच कारणांपैकी एक म्हणजे माहेरचा गणपती. कोणत्याही विवाहित महिलेच्या आयुष्यात माहेरची खास ओढ असते. त्यात लग्नापूर्वी साजऱ्या करण्यात आलेल्या सणांच्या आठवणी तर आणखीन खास असतात. मराठीतील आघाडीची अभिनेत्री सोनाली कुलकर्णीनेही तिच्या माहेरच्या आठवणींना उजाळा दिला.

‘माझ्या आयुष्यात गणेशोत्सवाला फार महत्त्वाचं स्थान आहे. आता माहेरच्या उत्सवाविषयी सांगायचं झालं तर आम्ही त्यावेळी पुण्यात राहायचो. पुण्याच्या श्रमसाफल्य सोसायटीत अगदी लोकमान्य टिळकांनी ज्या पद्धतीने गणेशोत्सवाची सुरुवात केली, त्याच पद्धतीने उत्सव साजरा केला जायचा. लहान वयात बऱ्याच कामांमध्ये आम्ही सगळेच हातभार लावायचो. मग मांडव घालणं असो की नाटकात काम करणं असो, प्रत्येक गोष्टीत आमचा सहभाग असायचाच. सोसायटीच्या गणपतीसोबतच आमच्या घरीसुद्धा पाच दिवसांचे गौरी- गणपती असायचे. त्यानंतर अनंत चतुर्दशीला विष्णूची पूजाही व्हायची. त्या दिवसांतलं वातावरणंच वेगळं असायचं. आनंद आणि अनुभवांसोबतच एकमेकांचे स्वभाव, आठवणी यांचीही  देवाणघेवाण व्हायची.

त्यावेळी साजरा होत असलेल्या उत्सवामुळेच माझ्यातील कलाकारही घडत होता, असं म्हणायला हरकत नाही. कारण प्रेक्षक आणि कलाकार अशा दोन्ही भूमिका या उत्सवावेळीच मी सर्वप्रथम अनुभवल्या. एक कलाकार म्हणून आपली कला इतरांपर्यंत कशी पोहोचवायची आणि प्रेक्षक म्हणून कोणत्याही कलाकाराला कशी दाद द्यायची याची शिकवण मला याच उत्सवामुळे मिळाली.

वाचा : भजन, खटखटे लाडू आणि अमाप उत्साह..

आता बऱ्याच गोष्टी भूतकाळात गेल्या आहेत. त्याचप्रमाणे गणेशोत्सव ही संकल्पनासुद्धा कुठेतरी हरवत चाललीये, असे मला वाटते. गेल्या काही वर्षांमध्ये अनेकजण गणरायाचा उल्लेख ‘बाप्पा’ म्हणून करताहेत. पण, हा ‘बाप्पा’ माझ्यासाठी फार नवीन आहे. त्याची आणि माझी फारशी ओळख नाहीये, असं म्हणायला काहीच हरकत नाही. मी पुण्यात होते तेव्हा मानाच्या पाच गणपतींपासून मंडईचा, हिराबागचा आणि डेक्कनचा गणपती आवर्जून पाहायचे. मिरवणुकांमध्ये होणारा ढोलांचा आवाज आणि ती झिंगसुद्धा मी अनुभवली आहे. पण, आता कुठेतरी या उत्सवाचा चेहरामोहराच बदलला आहे, असं वाटतं. त्याचवेळी याला आळा घालण्याची गरज आहे, असंही मनात येतं. कटकट, वाहतूक कोंडी या पलीकडच्या गणेशोत्सवाची माझ्या मुलीला मला ओळख करुन द्यायचीये. मला स्वत:लासुद्धा हा उत्सव पुन्हा जगण्याची इच्छा आहे.

वाचा : माहेरचा गणपती : चैतन्य, भरभराट आणि उत्साहाची उधळण करणारा माझा नवसाचा बाप्पा- अक्षया गुरव

माझ्यासाठी फार महत्त्व असणाऱ्या या उत्सवाचा मी मनमुराद आनंद लुटते. सासरचं सांगावं तर इथे गणपतीची प्रतिष्ठापना करण्याची प्रथा नाहीये. पण, मी मुंबईत राहायला आल्यापासून गणपतीच्या एका मूर्तीची दरवर्षी प्रतिष्ठापना करते. दहा दिवस साग्रसंगीत पूजा करते आणि मुख्य म्हणजे माझ्या मुलीच्या साथीने सुरेख सजावटही करते. वेली, पुस्तकं, पाण्याचे कप, बिया अशा अनोख्या गोष्टींचा वापर करत आम्ही सजावट करतो. या उत्सवाचं महत्त्वं आणि उत्साह दिवसेंदिवस वाढतच आहे. पण, त्याचं स्वरुप काहीसं बदललं आहे. त्यामुळे आता हा हरवलेला गणेशोत्सव मला परत मिळावा हीच आशा आहे.’

शब्दांकन- सायली पाटील
sayali.patil@loksatta.com

First Published on August 28, 2017 8:25 am

Web Title: ganapati utsav 2017 ganeshotsav 2017 happy ganesh chaturthi 2017 bollywood and marathi celebrities ganesh celebration and decoration marathi actress sonali kulkarni on celebrating this festival