News Flash

गणपती इले रे..

कोकणी माणसांच्या दृष्टीने वर्षांतील दोन महत्त्वाच्या सण-उत्सवांपकी गणपती उत्सवाची सध्या जोरदार धामधूम आहे. गणपती इले रेचा घोष दुमदुमत आहे. पुण्या-मुंबईसह  राज्याच्या अन्य भागांमध्ये, विशेषत: मोठय़ा

कोकणी माणसांच्या दृष्टीने वर्षांतील दोन महत्त्वाच्या सण-उत्सवांपकी गणपती उत्सवाची सध्या जोरदार धामधूम आहे. गणपती इले रेचा घोष दुमदुमत आहे.

पुण्या-मुंबईसह  राज्याच्या अन्य भागांमध्ये, विशेषत: मोठय़ा शहरांमध्ये उत्सवांचे स्वरूप दीपवून टाकणारे असते. कोकणात मात्र याच्या नेमकी उलट परिस्थिती असते. येथे घरगुती गणपतींना प्राधान्य असते. घरातील उत्सव पार पडल्यानंतर सार्वजनिक उत्सवाकडे लक्ष दिले जाते आणि त्याचे प्रमाणही अत्यल्प असते. आकडेवारीच्या भाषेत बोलायचे तर,  जिल्ह्य़ात १ लाख ६७ हजार ५४३ घरगुती, तर फक्त ११२ सार्वजनिक गणेशांची प्रतिष्ठापना होणार आहे. बाहुबलीची प्रतिकृती असलेल्या गणेशासह अनेक मूर्तीचे आकर्षण या वेळी आहे.

कोकणातील सर्वाधिक लाडके दैवत गणरायाचे शुक्रवारी आगमन होत असून बहुसंख्य घरांमध्ये गौरी-गणपतीचा सण उत्साहाने साजरा केला जातो आणि गौरीबरोबरच गणपतींचेही विसर्जन होते. दररोज सकाळी साग्रसंगीत पूजा आणि संध्याकाळी सामूहिक आरत्यांमुळे या काळात सर्वत्र वेगळेच वातावरण असते. ग्रामीण भागात जाखडी नाच, टिपऱ्या, अलीकडे अस्तंगत होत चाललेला नाचत गोफ विणण्याचा प्रकार,  वाडय़ांवर घरोघर जाऊन केल्या जाणाऱ्या सामूहिक आरत्या इत्यादीमुळे येथील उत्सवाला धार्मिकतेपेक्षा कौटुंबिक-सामाजिक-सांस्कृतिक स्वरूप जास्त असते.   पर्यावरणस्नेही  गणेशोत्सव होण्यासाठीही ग्रामीण भागापासून शहरातील घरांमध्ये प्रयत्न सुरू आहेत. ध्वनिप्रदूषण टाळण्यासाठी स्पीकर-डॉल्बीला बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे पारंपरिक वाद्यांना अधिक महत्त्व आले आहे. घरामध्ये आरतीसाठी ढोलकी हवी म्हणून, ढोलकीची चामडी, पाती बदलण्यापासून, नवीन ढोलकी आणण्यापर्यंत गणेशभक्त धावपळ करीत आहेत. रत्नागिरी शहरामध्ये २६ सार्वजनिक गणेशोत्सव असून, त्यात रत्नागिरीचा राजा, श्री रत्नागिरीचा राजा व शांतीनगरचा राजा या मंडळांची आरास व भव्यता हे आकर्षण असते. पाऊणशे वर्षांची परंपरा असलेल्या टिळक आळी गणेशोत्सव मंडळांसारखी सामाजिक उपक्रम राबवणारी मंडळे मोजकीच  आहेत. तसेच या २६ मंडळांपकी जवळजवळ निम्मी मंडळे सरकारी कार्यालयांची आहेत. तसेच घरगुती गणपतींच्या विसर्जनानंतर सोयीनुसार या गणपतींचे वाजतगाजत विसर्जन होते.

जादा फेऱ्यांचे नियोजन

दरम्यान, गणेशोत्सवासाठी रेल्वे आणि एसटीतर्फे जादा गाडय़ांची सोय करण्यात आली असून मुंबईत कामधंद्यानिमित्त असलेले चाकरमानी संपूर्ण एसटी आरक्षित करून आपापल्या गावी पोचले आहेत. या काळात मुंबई-गोवा महामार्गावर पडणारा वाहतुकीचा ताण लक्षात घेऊन रत्नागिरी जिल्ह्य़ात १५, तर सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात १० ठिकाणी पोलीस दलातर्फे मदत केंद्रे सुरू करण्यात आली असून पुढील दहा दिवस ती २४ तास चालू राहणार आहेत. महामार्गावर सर्वत्र असलेल्या प्रचंड खड्डय़ांमुळे अनेक ठिकाणी, विशेषत: रायगड जिल्ह्य़ात वाहतूक कोंडीचे प्रकार घडत आहेत. कोकण रेल्वेसह पश्चिम व मध्य रेल्वेनेही उत्सवातील विशिष्ट दिवशी मिळून तब्बल अडीचशे जादा फेऱ्यांचे नियोजन केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 25, 2017 1:52 am

Web Title: ganapati utsav ganesh utsav 2017
Next Stories
1 श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचा जगभरात लौकिक
2 गणरायांसाठी सावंतवाडीची बाजारपेठ फुलली
3 ‘लोकसत्ता ऑनलाइन’च्या पेजवर असा अपलोड करा तुमच्या घरच्या बाप्पाचा फोटो
Just Now!
X