ज्या शहरात टाळ मृदंग आणि हरिनामाचा जयघोष होतो, अशा पंढरपुरात गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरयाच्या जयघोषाने पंढरी नगरी दुमदुमून निघाली. शहर आणि तालुक्यात मोठ्या उत्साहात सार्वजनिक गणेश मंडळांनी श्रींची स्थापना केली. तर, घरगुती आणि श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरातही सालाबादप्रमाणे यंदाही गणेशोत्सव आनंदात साजरा केला जात आहे.

१४ विद्या, ६४ कलांचा अधिपती, विघ्नहर्ता असे अनेक उपाधीने प्रसिद्ध असलेल्या गणरायाचे स्वागत सर्वत्र आनंदात आणि जल्लोषात होत आहे. पंढरपूर येथेही गणेशाचे आगमन मोठ्या उत्साहात करण्यात आले. शहरातील स्टेशन रोड, नाथ चौक, भोसले चौक, अर्बन बँक  या ठिकाणी श्रींची मूर्ती घेण्यासाठी गर्दी दिसून येत होती. तसेच गणपतीसाठी लागणारे साहित्य, वस्त्रे, विद्युत रोषणाई खरेदी करण्यासाठी बाजारपेठा फुलून गेल्या होत्या. अनेक जणांनी गुरुवारी सायंकाळीच गणेश मूर्ती खरेदी केल्या. आपल्या लाडक्या गणरायाला घरी आणत असताना मोरया मोरया. गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष केला जात होता. बाप्पाला घरी आणल्यावर दारापाशी औक्षण करून आणले गेले. शुक्रवारी सकाळपासून घरगुती गणेशाची स्थापना घरोघरी करण्यात आली, तर दुसरीकडे सार्वजनिक गणेश मंडळांचे पदाधिकारी आपल्या लाडक्या बाप्पाला घरी नेण्यासाठी ट्रॅक्टर, ट्रकना नारळाच्या झाडाच्या फांदया, रंगबेरंगी माळा यांनी पूर्णपणे सजविण्यात आले होते. तसेच लेझीम,ढोल-ताशा वाजत गाजत गणेशाच्या आगमनाचे स्वागत करताना दिसून आले. तर सायंकाळपर्यंत अनेक सार्वजनिक गणेश मंडळांनी श्रींची स्थापना केलेली दिसून आली.

पंढरपूर तालुक्यात १० ठिकाणी एक गाव एक गणपती बसविण्यात आला आहे. तर तालुक्यात जवळपास ३४० सार्वजनिक गणेश मंडळांची नोंद करण्यात आली आहे. भाळवणी येथे सार्वजनिक गणेश मंडळ आणि लओक्ष्भागातून वाचनालय सुरु करणार आहेत. तर अनेक गावातील गणेश मंडळं सीसीटीव्ही बसविणार असल्याची माहिती ग्रामीण पोलीस ठाण्याचे प्रमुख कृष्णदेव खराडे यांनी सांगितले. तर शहरात सुमारे १५० हून अधिक सार्वजनिक गणेश मंडळे असून जवळपास २५ सार्वजनिक गणेश मंडळे सीसीटीव्ही बसविणार आहेत. दरम्यान, सालाबाद प्रमाणे याही वर्षी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीमध्ये मोठ्या उत्साहात गणेशाची स्थापना करण्यात आली.

मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी संजय तेली यांच्या हस्ते श्रींची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. जवळपास १२ दिवस बाप्पांचे वास्तव्य राहणार असून येत्या मंगळवारी गौरींचेही आगमन होणार आहे.  गणपती बाप्पा मोरया..मंगल मूर्ती मोरयाच्या जयघोषाने पंढरी नगरी दुमदुमून निघाली.